Home बातम्या दहशतवादी अफझल गुरूचा मृतदेह ताब्यात द्या

दहशतवादी अफझल गुरूचा मृतदेह ताब्यात द्या

0

पीडीपीचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
जम्मू-काश्मीरमध्ये भाजपसोबत युती सरकार स्थापन केलेल्या मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपी पक्षाने काल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले असून संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा कटाचा सूत्रधार दहशतवादी अफझल गुरुचा मृतदेह देण्याची मागणी करीत नवा वाद निर्माण केला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत रविवारी मुफ्ती मोहंमद सईद यांनी जम्मू-काश्मिरात खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडलेल्या विधानसभा निवडणुकांचे श्रेय पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना असल्याचे वक्तव्य केल्याने खळबळ माजली होती. हे प्रकरण ताजे असतानाच काल पीडीपीच्या आठ आमदारांनी सुप्रीम कोर्टाच्या अफझलला फाशी देण्याच्या निर्णयाची खिल्ली उडवत दहशतवादी अफझलचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली आहे. मागणी करणार्‍या आमदारांमध्ये राजा मंजूर अहमद, मोहम्मद अब्बास वानी, यावर दिलावर वीर, ऍड. मोहम्मद युसुफ, एजाझ अहमद मीर, नूर मोहम्मद शेख या आमदारांचा समावेश आहे. दरम्यान, पीडीपी नेत्यांच्या या मागणीला उत्तर देताना भाजप नेते सुब्रह्मणम स्वामी यांनी नाराजी व्यक्त करत किमान समान कार्यक्रमाच्या विरोधातच जायची पीडीपीची इच्छा असेल तर भाजपला कलम ३७० बाबत पुनर्विचार करावा लागेल असे म्हटले आहे. यामुळे जम्मू – काश्मिरातील भाजप-पीडीपी युती अधिक काळ टिकणार नसल्याची शक्यता निर्माण झाली आहे.