Home Featured हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात उद्धव अन्‌‍ राज ठाकरे एकत्र येणार

हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात उद्धव अन्‌‍ राज ठाकरे एकत्र येणार

0

महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीला विरोध करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच एकत्र येणार असून, मोर्चात सहभागी होणार आहे. ‘ना कुठला झेंडा, फक्त मराठीचा अजेंडा’ असे म्हणत दोन्ही बंधूंनी मोर्चाची घोषणा केली आहे. येत्या 5 जुलैला हा मोर्चा मुंबईतील गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत निघेल. या मोर्चात सर्व राजकीय पक्षांसोबतच साहित्यिक, कलाकारांनाही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पहिली ते चौथी हिंदी नको अशी भूमिका घेत या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला, तर 7 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीच्या एल्गार मोर्चाची घोषणा केली होती. हिंदीसक्तीविरोधात ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे काढण्याऐवजी एकत्रित एकच मोर्चा काढावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. यानंतर काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी ‘एक्स’ पोस्ट केली. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे स्पष्ट झाले.