Home बातम्या कला अकादमीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करा

कला अकादमीचे संरचनात्मक लेखापरीक्षण करा

0

कला राखण मंचची मागणी; सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्यालयावर नेला मोर्चा

कला अकादमीच्या नूतनीकरणानंतरच्या दयनीय परिस्थितीवरून कला राखण मंचने काल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आल्तिनो पणजी येथील मुख्यालयावर मोर्चा नेत अधिकाऱ्यांना जाब विचारला. कला अकादमीच्या कामाचे संरचनात्मक लेखापरीक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
कला अकादमीच्या नूतनीकरणाबाबतची कागदपत्रे देण्यास साबांखाकडून टाळाटाळ केली जात आहे. कला अकादमीच्या बांधकामाच्या ऑडिटबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनंतरही साबांखाकडून कागदपत्रे देण्यास विलंब होत आहे, असे आरोप कला राखण मंचने केला.

कला राखण मंचकडून कला अकादमी प्रश्नी ‘सुपारी आंदोलन’ केले जात आहे. याच आंदोलनाचा एक भाग म्हणून साबांखाच्या मुख्यालयावर मोर्चा नेऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला. कला अकादमीच्या छताला गळती लागली आहे. कृष्णकक्ष (ब्लॅक बॉक्स) नीट वापरता येत नाही. कला दालनात (आर्ट गॅलरी) योग्य प्रकाश योजना नाही. वातानुकूलित यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे, अशा अनेक बाबी साबांखा अभियंत्याच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या
सरकार नियुक्त कृती दलाच्या पहिल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काही कागदपत्रे मागितली होती; परंतु त्यांनी ती कागदपत्रे दिलेली नाहीत. आता, संबंधित कामाबाबतची कागदपत्रे देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, असे मंचाचे निमंत्रक देविदास आमोणकर यांनी सांगितले.

कला अकादमीच्या प्रशिक्षण वर्गाच्या भिंती साऊंडप्रूफ नाहीत. व्हायोलिन शिकणाऱ्या मुलांच्या वर्गात चक्क पियानोचा आवाज ऐकू येतो. कला अकादमीच्या दयनीय अवस्थेमुळे कलाकार, विद्यार्थी आणि शिक्षक, नागरिक नाराज बनले आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे सिसील रॉड्रीगीस यांनी सांगितले.
कला अकादमीच्या संरचनात्मक ऑडिटची मागणी गेल्या कित्येक माहिन्यापासून केली जात आहे. बांधकाम खात्याने संरचनात्मक लेखापरीटणासाठी मार्च महिन्यात आयआयटी मद्रास यांना पत्र पाठविले आहे. तथापि, या पत्राचा पाठपुरावा करण्यात आला नाही. कला राखण मंच त्याचा पाठपुरावा करणार आहे, असे फ्रान्सिस कुएल्हो यांनी सांगितले.