Home Featured मडकईकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाविरोधात एसीबी हायकोर्टात

मडकईकरांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याच्या आदेशाविरोधात एसीबी हायकोर्टात

0

अर्जात आदेश रद्दची मागणी; 1 जुलैला सुनावणी

माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याविरोधात लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याच्या जिल्हा न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात भ्रष्टाचारविरोधी विभागाने (एसीबी) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली आहे. एसीबीने जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करण्यासाठी फौजदारी पुनरीक्षण अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर येत्या 1 जुलैला सुनावणी होणार आहे.

काही महिन्यांपूर्वी पणजीत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांची भेट घेतल्यानंतर माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांनी आपल्या फाईल्स मंजूर करून घेण्यासाठी एका मंत्र्याला पंधरा ते वीस लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. मडकईकर यांनी केलेल्या आरोपामुळे सत्ताधारी भाजपमध्ये बरीच खळबळ माजली होती. अखेर, राजकीय दबावामुळे मडकईकर यांनी सदर भ्रष्टाचाराचा आरोप गैरसमजातून केला होता, असे स्पष्टीकरण केले होते. या प्रकरणात एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. एसीबीने मडकईकर यांची जबानी नोंदवून प्रकरण बंद केले होते.
मडकईकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी आणि गुन्हा नोंदवावा, या मागणीसाठी काशिनाथ शेट्ये व इतरांनी उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. गेल्या 9 जून रोजी जिल्हा न्यायालयाने एसीबीला मडकईकर यांच्याविरोधात लाचखोरीच्या आरोपांप्रकरणी गुन्हा नोंदविण्याचा आदेश दिला होता.

एसीबीने या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नसून, जिल्हा न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एसीबीने आपल्या अर्जात जिल्हा न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने प्रतिवादींना त्यांची बाजू मांडण्याची सूचना केली असून, या प्रकरणाची सुनावणी 1 जुलै रोजी होणार आहे.