हायर सेकंडरीच्या विद्यार्थ्यांस मारहाण प्रकरणी अटक

0
137

काही दिवसांपूर्वीच फर्मागुडीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून अन्य विद्यार्थ्यावर सुरी हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच काल वास्कोत बायणा येथील सरकारी हायर सेकंडरीतील १२ वीच्या एका विद्यार्थ्याला दुसर्‍या एका विद्यार्थ्याने मारहाण करून रक्तबंबाळ केल्याची घटना घडली. सदर मारहाण त्यांच्यातील वैयक्तिक कारणास्तव झाल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी सागर सारंग याला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकार सकाळी मधल्या सुट्टीच्या वेळी घडला. या उच्च माध्यमिक विद्यालयातील सागर सारंग याने वर्गमित्र गणपती हरिजन याला मधल्या सुट्टीत गाठून त्याला मारहाण केली. यात गणपती हरिजन याच्या डोळ्याला मार लागून तो रक्तबंबाळ झाला. बाहेर भर रस्त्यात सदर प्रकार घडत असलेला पाहण्यासाठी लोकांची तसेच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाली. सदर प्रकरण वास्को पोलिसांपर्यंत पोचल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्या जखमी विद्यार्थ्याला तेथीलच एका खासगी इस्पितळात दाखल केले. सदर मारहाण वैयक्तिक कारणावरून झाली.
दरम्यान, याविषयी सागर सारंग याच्या विरुद्ध वास्को पोलिसांनी तक्रार दाखल करून अटक करण्यात आली आहे. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रशांत भगत हे पुढील तपास करीत आहेत.