हात झटकले!

0
129

गोव्यातील भाजपप्रणित सरकारचे एक मंत्री आणि गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी सत्तेतील सहयोगी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या दिशेने एक क्षेपणास्त्र भिरकावले आहे. राज्यातील खाण बंदीमुळे त्या भागातील जनता त्रस्त असून सरकारने त्वरित त्या प्रश्नी तोडगा न काढल्यास आगामी लोकसभा निवडणूक भाजपला महागात पडेल आणि त्यावेळी गोवा फॉरवर्डच्या पाठिंब्याबाबतही फेरविचार करावा लागेल असा इशारा सरदेसाई यांनी दिला आहे. सरदेसाई यांचे हे स्फोटक वक्तव्य एखाद्या खोचक प्रश्नावरील बेसावध प्रतिक्रिया म्हणून आलेले नाही. रीतसर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे, त्यामुळे त्यांनी ते पुरेशा गांभीर्याने केले आहे असे मानणे व भाजपलाही ते पुरेशा गांभीर्याने घेणे भाग आहे. खरे तर सत्ताधारी भाजप आणि गोवा फॉरवर्ड गेल्या निवडणुकीनंतर एकत्र आल्यापासून त्यांच्यात तणातणीचे प्रसंग फारसे आलेले नाहीत. किमान समान कार्यक्रमावर सरकारचा कार्यभार सुरळीतपणे आजवर सुरू आहे. मग आताच असे एकाएकी काय घडले की सरदेसाईंनी भाजपवर अशी जाहीर तोफ डागावी? त्याचे उत्तर गोवा फॉरवर्डच्या विस्ताराच्या प्रयत्नांमध्ये मिळते. काही मतदारसंघांमध्ये आपला प्रभाव वाढवण्यामागे गोवा फॉरवर्ड लागलेला आहे. मये मतदारसंघ हा त्यापैकीच एक. तेथे गोवा फॉरवर्डने आपल्या राजकीय हालचाली सुरू करताच भाजपचे तेथील आमदार प्रवीण झांट्ये बिथरणे स्वाभाविक होते. त्यांनी सरदेसाईंना उद्देशून ‘युतीचा धर्म पाळावा’ असे सुनावले होते, त्यामुळे सरदेसाईंचा संयम सुटलेला दिसतो. या सरकारचे आपण किंगमेकर आहोत, हे सरकार आपल्या पाठिंब्यावर चाललेले आहे आणि आपल्या पक्षाच्या पाठिंब्याविना राज्यात सरकार घडू शकत नाही या अहंकारातून त्यांची ही दर्पोक्ती प्रकटली आहे. खाण बंदी आणि त्यानंतरच्या घटनाक्रमातून खाणक्षेत्रामध्ये निर्माण झालेला असंतोष वाढत चालला आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्या असंतोषाचा रोख केवळ भाजपाकडे वळवण्याचा चतुर प्रयत्न सरदेसाई यांच्या या वक्तव्यामागे जरी दिसत असला तरी सरकारचे तेही एक महत्त्वपूर्ण घटक असल्याने खाण प्रश्न सोडवणुकीतील सरकारच्या अपयशापासून सरदेसाईंना स्वतःची अगर स्वतःच्या पक्षाची सुटका करून घेता येणार नाही. ज्या अर्थी ते या सरकारचे घटक आहेत, त्या अर्थी सरकारच्या चांगल्या अथवा वाईट कामगिरीचे श्रेय अगर अपश्रेय यांचे माप त्यांच्याही पदरी पडणारच. त्यापासून ते आपले हात झटकू शकत नाहीत आणि केवळ भाजपावर दोषारोप केल्याने सावही ठरू शकत नाहीत. केंद्रात भाजपचे सरकार असल्याने खाण प्रश्नी अध्यादेश काढणे ही भाजपची जबाबदारी आहे असे जर त्यांना वाटत असेल तर त्यासाठी त्या पक्षावर दबाव आणण्याचे पुरेसे राजकीय सामर्थ्य त्यांच्यापाशी निश्‍चित आहे. परंतु त्याची अशी जाहीर वाच्यता करण्याची काही आवश्यकता नव्हती. या जाहीर टीकेमागील उद्देश केवळ ‘मी नाही त्यातला’ हे दाखवण्याचाच आहे. सरकारच्या चार भिंतींआड ते भाजप नेत्यांपाशी तसा आग्रह धरू शकले असते, परंतु त्यांनी हे वक्तव्य जाहीररीत्या केले असल्याने त्यांचा उद्देश खाण प्रश्नाच्या अपश्रेयापासून स्वतःची व स्वतःच्या पक्षाची सुटका करून घेण्याचाच असल्याचे स्पष्ट होते. सरदेसाईंचा आव या सरकारची सूत्रे हलविणार्‍या वजिराचा जरी असला तरी प्रत्यक्षात भाजपच्या रणनीतीतील ते एक प्यादेच ठरलेले आहेत हे त्यांना अद्याप उमगलेले दिसत नाही. हे सरकार म्हणजे खरे तर सध्या दूरचित्रवाणीवर सुरू असलेल्या ‘बिग बॉस’ सारखे आहे. बिग बॉसच्या घरात सगळे वरवर पाहता एका कुटुंबासारखे दिसतात, एका घरात राहतात, एकत्र जेवतात, झोपतात; परंतु शेवटी प्रत्येकजण स्वतःसाठीच तेथे खेळत असतो. राज्यातील विद्यमान सरकार असेच आहे. भाजप काय, मगो काय, गोवा फॉरवर्ड काय किंवा अपक्ष काय, हे सगळे भले सत्तेसाठी सरकारच्या घरामध्ये एकत्र आलेले असले तरी प्रत्येकजण केवळ स्वतःसाठी खेळतो आहे. प्रत्येकाला दुसर्‍यावर कुरघोडी करून पुढे जायचे आहे. त्यासाठीच तर सारा अट्टहास आहे. गोवा फॉरवर्डला राज्याच्या राजकारणात आपले स्थान निर्माण करायचे आहे. त्यासाठी तो पक्ष आपली जागा शोधतो आहे. गेल्या निवडणुकीत भाजपच्या मतदारसंघांमध्ये त्यांनी आपले आमदार निवडून आणले, परंतु ते मतदारसंघ त्यांना भाजपने आंदण दिलेले नाहीत. भाजपा तेथे पुन्हा पाय रोवण्याचा प्रयत्न करणारच. त्याला काटशह म्हणून गोवा फॉरवर्डही भाजपच्या मतदारसंघांमध्ये जेथे संधी आहे तेथे शिरकाव करण्यासाठी पुढे होणारच. या खेळात वावगे काही नाही, परंतु ज्या समान उद्दिष्टांसाठी ही मंडळी एकत्र आलेली आहेत, सरकार चालवीत आहेत, त्यापासून त्यांनी दूर हटणे म्हणजे जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणारे आहे. ज्या सरकारचा आपण घटक आहोत, त्याच्याशी संबंधित गोष्टींपासून आपले हात त्यांना झटकता येणार नाहीत. त्याची जबाबदारी सरकारचा घटक म्हणून त्यांच्यावरही तितकीच येते आणि जनतेला तेही जबाबदेही राहतील. सत्ताही उपभोगायची आणि हातही झटकायचे हा दुटप्पीपणा चालणार नाही.