मांडवी परिवारला काणकोण टी-२० चषक

0
129

एकतर्फी सामन्यात मांडवी परिवारने माशे क्रिकेट क्लबचा ८ गड्यांनी पराभव करत आठवी काणकोण टी-२० क्रिकेट स्पर्धा जिंकली. पोळे स्पोटर्‌‌स क्लबने आयोजित या स्पर्धेचा अंतिम सामना काल रविवारी निराकार मैदानावर खेळविण्यात आला.
प्रथम फलंदाजी करताना माशेने २० षटकांत ८ गडी गमावून १२१ धावा केल्या.

त्यांच्याकडून संतोष सतरकर याने सर्वाधिक ४६ धावांचे योगदान दिले. मांडवीकडून संदेश वेळीप सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना मांडवीने सामनावीर महेंद्र वेळीप याच्या नाबाद ६४ धावांच्या बळावर १६व्या षटकांत विजय संपादन केला. विजेत्या मांडवी परिवारने २५ हजार रुपये व चषकाची कमाई केली. उपविजेत्या माशे सीसीला १५ हजारांवर समाधान मानावे लागले. बक्षीस वितरण समारंभाला गोवा क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. वेंकटेश प्रभुदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक ः माशे २० षटकांत ८ बाद १२१ (संतोष सतरकर ४६, शौनक पैंगीणकर १७, विनेश सतरकर १२, अभिलाष रायकर १०, संदेश वेळीप ३, बाबू चव्हाण व विश्‍वदीप देसाई प्रत्येकी २ बळी, उदय शेट १ बळी) पराभूत वि. मांडवी १६ षटकांत २ बाद १२३ (महेंद्र वेळीप नाबाद ६४, शिवम वारिक ३७, दुर्गेश प्रभुगावकर व प्रतीक सतरकर प्रत्येकी १ बळी), वैयक्तिक बक्षिसे ः सामनावीर व सर्वोत्तम फलंदाज ः महेंद्र वेळीप (मांडवी), सर्वोत्तम गोलंदाज ः प्रसाद धुरी (पाळोळे), स्पर्धावीर ः दुर्गेश प्रभुगावकर (माशे).