हवा प्रदूषणाशी लढा…

0
155
  • राजेंद्र पां. केरकर

५ जूनला ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा केला जात असून यंदा संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेने लोकांना वाढत्या हवा प्रदूषणाशी लढा सामूहिकरीत्या द्यावा, असे जाहीर केलेले आहे. शुद्ध हवा, नितळ परिसर याद्वारे खरं तर आमचे जीवन सुंदर आणि समृद्ध करणे शक्य आहे. त्यासाठी काय केले पाहिजे?

प्राचीन काळापासून भारतीय लोकमानस निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडले होते. वडासारख्या विस्तीर्ण महावृक्षाला अबाधित राखून इथल्या सुवासिनींनी ज्येष्ठात वटपौर्णिमा साजरी केली. देवराईत निसर्गात वास करणार्‍या परमेश्‍वरी शक्तीची प्रचीती आल्याने त्यांनी पायका पान्न, देवादाणो, माऊलीची राय अशा नानाविध संकल्पनांद्वारे केवळ वृक्षवेलीच नव्हे तर त्यातले पशुपक्षी यांच्याबरोबर कृमीकीटकांनादेखील पूर्ण संरक्षण प्रदान केले.

आज माणसाचे जगणे धकाधकीचे झालेले असून कुठे केरकचरा आणि सांडपाणी यांच्या गैरव्यवस्थापनाने हवा, जल, माती प्रदूषणाची समस्या शिगेला पोहचलेली आहे तर कुठे अक्षम्य मानवी प्रमादांमुळे गोदावरीसारखी पवित्र मानलेली नदी पैठणसारख्या तीर्थक्षेत्री गटारगंगा झालेली आहे. काही ठिकाणी रासायनिक खते, जंतुनाशके, कीटक नाशके यांच्या वारेमाप वापरामुळे जगण्याचा आधार असणारे अन्नधान्य प्रदूषित झाल्याने लाखो लोकांचे जीवन नानाविध व्याधींनी रोगग्रस्त झालेले आहे. मांसाच्या लालसेनं ज्याप्रमाणे पोर्तुगीज हौशी शिकार्‍यांनी मॉरिशस देशातून डोडोसारख्या मांसल पक्ष्याला इतिहासजमा केलेलं आहे त्याचप्रमाणे कस्तुरीसाठी शिकार ठरलेले कस्तुरीमृग हिमालयाच्या प्रदेशांतून नामशेष होण्याच्या वाटेवर पोहचलेलं आहे. जगात वेगवान धावपटू म्हणून नावलौकिक मिळवलेला भारतीय चित्ता कधीच इथल्या लोकमानसाच्या स्मृतीतून गायब झालेला आहे.

भारतासरख्या पर्यावरणीय संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या राष्ट्रातून निसर्ग, पर्यावरण आणि वन्यजीव यांच्याशी असलेले अनुबंध क्षीण झाल्याने पर्यावरणाचा र्‍हास ही नित्याचीच बाब झालेली आहे. जगातील प्रभावी खनिज व्यावसायिक म्हणून दबदबा निर्माण केलेल्या अनिल अग्रवाल यांच्या वेदांतासारख्या बहुराष्ट्रीय कंपनीनं भारतात प्रवेश केल्यानंतर लोह, मँगनीज, बॉक्साईट, दगडी कोळसा यांच्या उत्खननासाठी ‘राष्ट्रीय संपत्तीचा विकासासाठी वापर’ हा निकष लावून खाणींना चालना दिलेली आहे. आदिवासी जमातींनी ज्या नियामगिरीला पवित्र डोंगर मानला, त्याच्या कणाकणात परमेश्‍वरी अंश अनुभवला, त्या पर्वतावर खनिज उत्खननाला मुभा देण्यात आली तेव्हा आदिवासी समाज नखशिखान्त हादरला. नियामगिरीवर खनिज उत्खनन म्हणजे आपल्याच अस्तिवावर गदा.. अशी त्यांची भावना झाली आणि त्यातून प्रफुल्ल सामंता यांच्या नेतृत्वाखाली लोकलढा निर्माण झाला. सामाजिक पातळीबरोबर न्यायालयीन लढा समर्थपणे उभा राहिला आणि त्यातून नियामगिरीचे अस्तित्व तग धरून आजही उभे राहिले. गोव्यात दक्षिणेला असलेला कावरेगाव लोह आणि मँगनीजच्या श्रीमंतीबरोबर जंगल आणि जलसंपत्तीची समृद्धी पूर्वापार मिरवत आहे. इथल्या जंगलनिवासी वेळिप-गावकरांचा ‘देवा डोंगर’ हा पावित्र्याचा अपूर्व ठेवा. पिढ्यान् पिढ्या देवाडोंगर आणि देवाच्या नावांनी राखून ठेवलेल्या देवराया यांच्या रक्षणातच आपल्या अस्तित्वाची मेख आहे हे त्यांनी जाणल्याने त्यांचे जीवापाड रक्षण करणे हा आपला लोकधर्म मानला. परंतु जेव्हा गोव्यात लोह आणि मँगनीज खनिजांच्या उत्खननाची स्पर्धा सुरू झाली त्यात इथल्या गावांना धुळधाण होण्याची परिस्थिती उद्भवली. त्यातून देवाडोंगराचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी लोकलढा उभा राहिला आणि त्यातून सध्यातरी वृक्षवेलींनी नटलेला हा डोंगर कावरे-मायणा गावांची अस्मिता म्हणून टिकलेला आहे.

सध्या सहकारी तत्त्वावर कावरे गावात खनिज उत्खनन करण्यासाठी स्थानिक नेते प्रयत्नरत आहे. सहकारी तत्त्वावरच बोलिविया या देशात चांदीच्या उत्खननासाठी खाण व्यवसाय सुरू झाला. परंतु तेथील पोटोशी पर्वतात चांदी आणि अन्य खनिजांचे उत्खनन करताना पर्यावरणीय मूल्यांकडे कानाडोळा झाल्याने त्याचे दुष्परिणाम इथल्या निसर्ग-पर्यावरणाबरोबर सर्वसामान्यांना भोगावे लागलेले आहे. गोव्यासारख्या राज्यात खाजगी खाण व्यावसायिकांनी गेल्या कित्येक दशकांपासून पर्यावरणीय नियम व अटींकडे त्यांना राजाश्रय लाभल्याने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत पिसुर्ले, उगे, शिरगावसारख्या गावांच्या अस्तित्वालाच आव्हान दिलेले आहे. कावरेचे डोंगर ज्या पद्धतीने यापूर्वीच खाण कंपन्यांनी निर्घृणपणे पोखरलेले आहे ते पाहता सहकारी तत्त्वावर खनिज उत्खनन करताना निसर्ग आणि पर्यावरणाच्या रक्षणाला प्राधान्य देऊन वर्तमान आणि आगामी काळात इथे हा व्यवसाय करणे शक्य आहे का? कावरेतील बारमाही अखंडपणे खळाळणारे जलस्रोत आपले गतवैभव राखतील का? शेती, बागायती, भाजीमळे यांचा वारसा टिकेल का? याबाबत विचार विनिमय करून पुढची पावलं कावरेत मारली पाहिजेत.

गोव्यासारख्या छोट्या राज्यात सध्याच्या स्थितीत खनिज उत्खननासाठी खूपच अत्यल्प वाव आहे. आज डिचोली तालुक्यातील मुळगावसारख्या गावाचा जलकोठार असलेली म्हातारघाटी, तिथे पोर्तुगीज अमदानीपासून चालू असलेल्या बेधुंद लोहखनिज उत्खननामुळे आपला वारसा झपाट्याने हरवत चाललेली आहे. गावातील नारायण देवाची तळी, धाईमाची तळी अशा असंख्य जलाशयांची आणि एकेकाळी गावाला सुजलाम् सुफलाम् करणारी जंगले असंख्य संकटांनी ग्रस्त झालेली आहेत. इथे पूर्वापार राहणार्‍या कष्टकर्‍यांच्या वर्तमान, भवितव्याची चिंता न करता डिचोलीतल्या सुर्ल गावात खनिज उत्खनन सुरू आहे. मुळगावात रामनाथाच्या स्वयंभू शिवलिंगाला साक्षी ठेवून जलसिंचनाची जशी पारंपरिक व्यवस्था इथल्या दूरदृष्टी असणार्‍या भूमीपुत्रांनी निर्माण केली होती, तद्वत् सिद्धेश्‍वराच्या आशीर्वादाने सुर्लवासियांनी सिंयाचा बांध सामूहिक शक्तीने उभारून जलसिंचनाच्या व्यवस्थापनातला आदर्श प्रस्थापित केला होता. बाराजण देवांच्या नावाने वृक्षवेलींनी नटलेल्या पवित्र वनाची राखण केली होती. आज या सार्‍या वैभवाला काडीची किंमत न देता सुर्लसारख्या गावातल्या निसर्गाला भकास करण्याबरोबर तिथल्या शेती-बागायतींना इतिहासजमा करण्याचे षड्‌यंत्र कार्यान्वित झालेले आहे.

निसर्ग, पर्यावरणाच्या रक्षणाला प्राधान्य देऊन विकासाचे प्रकल्प जोपर्यंत राबवण्यासाठी सरकार आणि समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत विकासाच्या नावाने राबवले जाणारे प्रकल्प गावागावांना भकास करणार आहे. सोन्याच्या लालसेपायी कर्नाटक राज्यातल्या कोलार आणि लोहासाठी बेल्लारीमध्ये जे उत्खनन झाले त्याने त्या प्रदेशांच्या अस्तित्वालाच कायमस्वरूपी मिटविण्याचे प्रयत्न केले. लोह, मँगनीजसारख्या खनिजांचे उत्खनन हे राष्ट्राच्या विकासाला जरी पूरक असले तरी जंगल, जलस्रोत, जैविक संपदा आणि त्यांच्यावर आधारलेले जीवन उध्वस्त करून साध्य केलेला विकास आम्हाला सुखाचे चार घास खाऊ देणार का?… याचा विचार आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी अपवादात्मक केल्याने आज देशाचा बराच मोठा भूभाग वाळवंट होण्याच्या वाटेवर आहे. मराठवाडा, विदर्भसारख्या प्रदेशातली शेती अत्यंत बेभरवशाची झाल्याने, शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण रोखणे शक्य झालेले नाही. प्रस्थापित शहरांसाठी आणि नव्याने उभारल्या जाणार्‍या शहरांसाठी गावांकडच्या नदी-नाल्यांना कायमस्वरूपी उध्वस्त करून उभारल्या जाणार्‍या धरणाचे पुरस्कर्ते जोपर्यंत सत्तास्थानी येत राहतील तोपर्यंत रंजलेल्या गांजलेल्यांना न्याय कोण देईल? विस्थापित कुटुंबांचे हिरावून घेतलेले जगण्याचे साधन कोण देईल?
भारताच्या अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्याचा विकासाचा दर ज्यादा आहे. इथल्या लोकांचा जगण्याचा स्तर देशभरात लक्षणीय आहे. असे असले तरी आज आपले राज्य अन्नधान्यांच्या, भाजीपाल्याच्या दृष्टीने बरेच परावलंबी आहे. शेती, बागायतीयोग्य जमिनीचे मोठ्या प्रमाणात रूपांतर होऊन तिथे गृहनिर्माण वसाहती, बंगले उभे राहात आहेत. खारफुटी, दलदलीच्या जमिनींना भराव घालून बुजवण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. डोंगरांना उघडेबोडके केले जात आहे. सागरी पर्यटनाखाली ख्यातनाम झालेल्या कोलवासारख्या गावाचा मूळ चेहरा हरवलेला असून नियोजनाअभावी उभ्या राहिलेल्या हॉटेल्स, बंगल्यातले सांडपाणी निचरा होण्याची व्यवस्था नसल्याने अशा आस्थापने ओहळ, नाल्यांना ग्रस्त करत आहेत. भारतभूमीच्या सिंधुतिरावर बसलेला गोवा- आपल्या मांगल्याचा ठेवा – हा लौकिक हरवत चालला आहे. जगातली, भारतातली, गोव्यातली आणि आपल्या गावातली पर्यावरणाची बिघडणारी परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची मानसिकता निर्माण करून त्या दृष्टिकोनातून लोकसहभागाद्वारे परिवर्तनास सिद्ध झाले पाहिजे.

यंदाच्या पर्यावरण दिनाचे लोकांना – हवा प्रदूषणाशी लढा – असे ब्रीदवाक्य आहे. प्राचीन काळापासून भारतीय लोकमानस निसर्ग आणि पर्यावरणाशी जोडले होते. वडासारख्या विस्तीर्ण महावृक्षाला अबाधित राखून इथल्या सुवासिनींनी ज्येष्ठात वटपौर्णिमा साजरी केली. देवराईत निसर्गात वास करणार्‍या परमेश्‍वरी शक्तीची प्रचीती आल्याने त्यांनी पायका पान्न, देवादाणो, माऊलीची राय अशा नानाविध संकल्पनांद्वारे केवळ वृक्षवेलीच नव्हे तर त्यातले पशुपक्षी यांच्या बरोबर कृमीकीटकांनादेखील पूर्ण संरक्षण प्रदान केले. खोतीगावातल्या केरीसारख्या गावातल्या आदिवासी समाजाने नदीच्या डोहातल्या समस्त जलचरांना पवित्र मानून, त्यांचे संरक्षण श्रद्धेने केले. वड, पिंपळ, घोटींग, आंबा अशा नानाविध वृक्षांना त्यांनी राष्ट्रोळी, आजोबाचा अधिवास असल्याचे मानून त्यांची राखण केली. इथल्या कष्टकर्‍यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचे स्नेहबंध निसर्ग आणि पर्यावरणाशी अतूट असल्याने त्यांनी वड-पिंपळासारख्या महावृक्षांवर बुलडोझर घालण्याचे धाडस केले नाही. नागपंचमीच्या दिवशी मृण्मयी धरित्रीची बालके समजून अळंब्यांना खुडण्यास धजले नाही. याला कारण त्यांची नाळ त्या काळी या माती आणि संस्कृतीशी रूतली होती.

सातवीण म्हणजेच सप्तपर्णी या वृक्षाची साल परंपरेनं आजीच्या वनौषधींवर आधारलेल्या बटव्यातला महत्त्वाचा घटक असल्याने या वृक्षाची विनाकारण हेळसांड होऊ नये म्हणून, त्याला इजा करू नये यासाठी त्याच्यावर भुताखेतांचे वास्तव्य असल्याचे मानले. गोव्यासारखे राज्य सागर किनार्‍यावर असल्याने आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणारे बदल, हवामानातले परिवर्तन यामुळे उद्भवणारी परिस्थिती यासाठी आखून दिलेली सागरी नियमन रेषा राखून ठेवण्याचे आपले सौजन्य आपण विसरत चाललो आहोत. गवेरेडे, बिबटे यांच्यासारखी जंगली श्‍वापदे वाढत्या शिकारीमुळे आणि त्यांचा नैसर्गिक अधिवास संकटात असल्याने लोकवस्तीत येऊन धुमाकूळ घालू लागलेली आहे. माणूस आणि निसर्ग यांच्यात असलेले पूर्वापार रेशमी बंध आज दुर्बल होत चालले आहेत आणि यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन साजरे करून त्याद्वारे लोकांना आपल्या परिसरातल्या निसर्ग-पर्यावरणाशी जोडा, आपल्या भोवतालच्या वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करा, निसर्गातल्या भव्यत्वाची, दिव्यत्वाची जाणीव ठेवा असे सांगण्याची पाळी आलेली आहे. गोव्यातल्या निसर्गदत्ता हिरव्या जंगलांचे, त्यातल्या जैविक संपदेचे, सागराच्या निळाईचे रक्षण करणे म्हणजेच आपल्या वर्तमान आणि भवितव्याला सुरक्षित ठेवणे याची जाणीव ठेवली पाहिजे. हवा प्रदूषणाविरुद्धचा लढा समर्थपणे द्यायचा असेल तर त्याच्या विरोधासाठी केवळ वल्गना करण्याऐवजी, त्यांचे कारण ठरलेल्या स्रोतांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या वाहनांनी हवा प्रदूषणाचा कहर मांडलेला आणि त्यासाठी गरज मोठी आहे तेव्हाच वाहनांच्या वापरावरती भर, सार्वजनिक वाहतुकीचा शक्य तेथे वापर करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. खनिज उत्खनन आणि खनिज मालाच्या वाहतुकीवेळी बर्‍याचदा धूळप्रदूषण होत असते. त्यासाठी त्या परिसरातल्या लोकांना धूळभत्ता देण्याऐवजी हवा प्रदूषण कसे कमी होईल यासाठी आवश्यक उपाययोजनेवर लक्ष दिले पाहिजे. हवा प्रदूषणामुळे कर्करोग, श्‍वसनविषयक आजारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे हे आम्ही विसरता कामा नये. शुद्ध हवा, नितळ परिसर याद्वारे खरं तर आमचे जीवन सुंदर आणि समृद्ध करणे शक्य आहे. या दृष्टीने प्रयत्न आमचे जगणे सुखी करेल.