काश्मीर प्रश्र्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न

0
555

एडिटर्स चॉइस
परेश प्रभू

—————-
ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक धर यांचा ‘कश्मीर ः ऍज आय सी इट, फ्रॉम विदिन अँड अफार’ हा ग्रंथ रूपा पब्लिकेशन्सतर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. स्वतः काश्मिरी पंडित असलेल्या धर यांनी इतिहास, संस्कृती, लोकजीवन, वर्तमान याचा वेध घेत काश्मीर प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा मौलिक प्रयत्न त्यात केला आहे. काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एक नवे दालन त्यातून खुले झाले आहे.
—————–

भारताचे निसर्गरम्य नंदनवन असलेल्या काश्मीरवर आजवर प्रचंड लेखन झाले आहे. काश्मीरचा इतिहास, तेथील संस्कृती, जनजीवन इथपासून ते काश्मीरमधील दहशतवाद आणि त्या समस्येच्या विविध कंगोर्‍यांचा आपापल्या परीने वेध वेळोवेळी या विविध लेखकांनी घेतलेला आहे. परंतु तरीही अशोक धर यांचे नवे कोरे पुस्तक ‘कश्मीर ः ऍज आय सी इट, फ्रॉम विदिन अँड अफार’ आपल्या हाती येते, तेव्हा काश्मीरसंबंधीच्या आजवरच्या लेखनाचे सार या एकाच ग्रंथामध्ये जणू सामावले आहे असा प्रत्यय येतो. काश्मीरच्या इतिहास, परंपरा, संस्कृतीपासून काश्मीर समस्येचा आणि संभाव्य शक्यतांचा सांगोपांग उहापोह या अभ्यासपूर्ण ग्रंथामध्ये करण्यात आला आहे.
अशोक धर हे स्वतः काश्मिरी पंडित आहेत. त्यांचे स्वतःचे बालपण काश्मीरमध्ये गेलेले आहे. त्यामुळे काश्मिरींची वेदना काय आहे हे ते समजू शकतात. ते स्वतः ऊर्जा क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात. भारतात आणि भारताबाहेरील तीन फॉर्च्युन ५०० कंपन्यांमध्ये त्यांनी अधिकारपदे भूषविलेली आहेत, त्यामुळे व्यवस्थापनशास्त्रातील सिद्धान्तांच्या अनुषंगानेही काश्मीर समस्येच्या सोडवणुकीच्या शक्यतांचा विचार त्यांनी या ग्रंथात केला आहे आणि हे त्याचे वेगळेपण आहे.
काश्मीर समस्येकडे भौगोलिक समस्या म्हणून पाहिले जाते, परंतु तसे पाहणे म्हणजे केवळ हिमनगाचे टोक ठरते. काश्मीर समस्येच्या मुळाशी जायचे असेल तर काश्मीरच्या जनजीवनाची वैशिष्ट्ये, खरी ‘कश्मिरीयत’ समजून घेणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने हा ग्रंथ उपयुक्त ठरतो.
धर यांच्या या ग्रंथाचे स्वरूप तिहेरी आहे. काहीसे आत्मचरित्र, बराचसा इतिहास आणि स्वतःची अनुमाने अशी या ग्रंथाची विभागणी आहे. इतिहास, संस्कृती, , लोकसाहित्य, लोकजीवन, परंपरा, आज मानगुटीवर बसलेला दहशतवाद, काश्मिरी नेतृत्वाचे राजकीय वास्तव, भारतीयांचा आणि जगाचा काश्मीरबाबतचा दृष्टिकोन या सार्‍याची उद्बोधक चर्चा त्यातून करण्यात आली आहे. पहिल्या भागामध्ये त्यांच्या बालपणच्या सुंदर काश्मीरच्या स्मरणरमणीय आठवणी आहेत, काश्मीरचा आत्मा असलेली ‘कश्मिरियत’, तेथील प्राचीन शैव तत्त्वज्ञान आणि सुफी परंपरा यांचा विस्ताराने उहापोह त्यांनी इतिहासाचे दाखले देत केलेला आहे. दुसर्‍या भागामध्ये स्वतः सौदी अरेबिया, पाकिस्तान आणि इराणसारख्या इस्लामी देशांत केलेल्या प्रवासावेळी आलेले अनुभव सांगताना तेथील एकंदर इस्लामचे पालन व काश्मीरमधील इस्लाम यांची तुलना त्यांनी केली आहे. महाराजा हरिसिंग, शेख अब्दुल्ला, इंदिरा गांधी आदी नेत्यांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये बजावलेल्या भूमिकेचे विश्लेषणही लेखकाने या भागात केलेले आहे. ग्रंथाचा तिसरा भाग हा सध्याच्या काश्मीर समस्येला वाहिलेला आहे. व्यवस्थापनशास्त्रातील ‘गेम थिअरी’ सारख्या सिद्धान्तांच्या आधारे या समस्येच्या मुळाशी जाण्याचा हा आगळावेगळा प्रयत्न आहे. जगभरामध्ये अशा प्रकारच्या प्रांतिक समस्येवर काय उपाययोजना करण्यात आलेली आहे याचा त्यांनी केलेला उहापोह अतिशय महत्त्वाचा आहे.
काश्मीरवर इतिहासामध्ये हिंदू, मुघल, अफगाण, शिख आणि डोगरा राजवटींची विविध काळात सत्ता राहिली. त्याचा संमिश्र परिणाम तेथील जनजीवनावर व संस्कृतीवर अपरिहार्यपणे होत गेला. बौद्ध धर्माने अशोकाच्या काळामध्ये आपली मुळे रुजवीपर्यंत हिंदू वैदिक धर्माचे काश्मीरमध्ये पालन केले जात होते. कनिष्काच्या काळात महायान पंथाचा पगडा काश्मीरवर पडला. अभिनवगुप्ताचे शैव तत्त्वज्ञान, त्यातून बौद्धांचा हिंदू धर्मात सुरू झालेला पुनर्प्रवेश, आदि शंकराचार्यांनी काश्मिरी शैव तत्त्वज्ञानाला दिलेली नवी दिशा, काश्मीरमधील सुफी प्रभाव या सार्‍याचा अत्यंत अभ्यासपूर्ण आढावा धर यांनी आपल्या ग्रंथाच्या पहिल्या भागामध्ये घेतला आहे तो मौलिक आहे. शतकानुशतके जनमत प्रभावित करणार्‍या काश्मिरी शैव तत्त्वज्ञानाची वैशिष्ट्ये, त्याने घालून दिलेली जीवनपद्धती सांगतानाच गूढवादाच्या रूपातील सुफी तत्त्वज्ञानही काश्मीरच्या संमिश्र संस्कृतीच्या केंद्रस्थानी असल्याचे लेखक म्हणतात. काश्मिरी शैव कवयित्रीच्या वचनांचा पंडितांच्या जीवनावरील प्रभाव, ब्राह्मण असले तरी अस्पृश्यता न पाळण्याची त्यांची परंपरागत सर्वसमावेशक वृत्ती आदींचे दर्शन स्वतःच्या आठवणींच्या अनुषंगाने ते घडवतात.
काश्मिरी प्राचीन लोककथा, नीलमत पुराणातील काश्मीरचे वर्णन, कष्यप ऋषींची कथा इथपासून सुरू झालेला काश्मीरच्या आजवरच्या इतिहासाचा हा आढावा वेधक आहे. महंमद बिन कासीमने इसवी सन ७१३ मध्ये काश्मीरवर आक्रमणाचा अयशस्वी प्रयत्न केला, तिथपासून म्हणजे आठव्या शतकापासून काश्मीरशी मुस्लीम आक्रमकांचा संबंध आला असे ते सांगतात. नंतरचे फसलेले अरब आक्रमण, गझनीची स्वारी, मंगोल टोळीवाल्यांचे आक्रमण वगैरे वगैरेंतून काश्मीरच्या विविध भागांची समाजरचना कशी बदलत गेली हे धर यांनी विस्ताराने सांगितले आहे. शाह मीरच्या राजवटीपासून बदलत गेलेले काश्मीरचे स्वरूप, मोंगलांचा सत्ताकाळ, त्याचे बरेवाईट परिणाम, एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी आलेली शिखांची राजवट, नंतर डोग्रांची सत्ता, त्यांनी ब्रिटिशांशी केलेली हातमिळवणी, अमृतसरच्या कराराद्वारे ब्रिटिशांनी गुलाबसिंगला ७५ लाखांना काश्मीर विकले ती घटना ह्या सगळ्या इतिहासाचे अवलोकन व अवगाहन काश्मीर समस्या अभ्यासताना अपरिहार्यपणे करावे लागते. ह्या सगळ्या इतिहासाची संगतवार मांडणी धर यांनी नेमकेपणाने केली आहे.
‘काश्मिरी’ जनतेची वैशिष्ट्ये धर यांनी तिसर्‍या प्रकरणात विस्ताराने मांडली आहेत. आम्ही काश्मिरी आमच्याच दुर्भाग्यास कारण ठरलो आहोत असे सांगताना ते इतिहासातले दाखले देतात. मोंगलांना हाकलण्यासाठी आम्हीच अफगाणांना बोलावले, अफगाणांना हाकलण्यासाठी शिखांना बोलावले, परंतु शांतता कधीच लाभली नाही ही व्यथा त्यांनी येथे मांडली आहे.
ग्रंथाच्या दुसर्‍या भागामध्ये लेखकाच्या जगभ्रमंतीतील काश्मीर व काश्मिरीयत संदर्भातील अनुभव आहेत. काश्मीरच्या अर्वाचिन इतिहासातील महत्त्वाच्या मोहर्‍यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावाही ते या भागात विस्ताराने घेतात. महाराजा हरिसिंग, शेख अब्दुल्ला, पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांनी काश्मीरसंदर्भात स्वीकारलेली भूमिका आणि आजच्या स्थितीशी असलेला तिचा संबंध याचे हे विश्लेषण उद्बोधक आहे. भारत पाक युद्धामध्ये ताब्यात आलेल्या पाच हजार चौरस मैल भूभागाच्या आणि पकडल्या गेलेल्या ९२ हजार पाकिस्तानी युद्धकैद्यांच्या सुटकेच्या बदल्यात इंदिरा गांधींना काश्मीरबाबत अंतिम, शांततापूर्ण तोडगा प्राप्त करता आला असता असे धर म्हणतात.
या ग्रंथाच्या तिसर्‍या भागात काश्मीरमधील दहशतवादाच्या बीजारोपणापासून आजवरच्या या समस्येचा विविध पैलूंचा अभ्यास लेखकाने केला आहे. त्याच बरोबर पाकिस्तानी लष्कराचे इस्लामीकरण, काश्मीर खोर्‍यातून पंडितांना शस्त्रांच्या धाकावर करायला लावले गेलेेले स्थलांतर, तेथील आजची परिस्थिती यावरही प्रकाश टाकलेला आहे. सध्या धर यांचे वास्तव्य काश्मीर खोर्‍यात नाही, परंतु सोशल मीडियाच्या आधारे काश्मिरींशी संपर्क ठेवून त्यातून मिळालेल्या माहितीद्वारे सद्यस्थितीवर नजर ते ठेवतात. काश्मीरचे अर्थकारण कसे आहे, काश्मिरी राजकारण्यांनी काश्मिरींचे आर्थिक प्रश्न सोडवण्याऐवजी भावनिक रूप देऊन वेळोवेळी कसा तणाव निर्माण केला, त्यातून काश्मीरमधील परिस्थिती कशी बिघडत गेली ते मुळातून वाचण्याजोगे आहे. काश्मीर दक्षिण आणि मध्य आशियातील व्यापारउदिमाचे केंद्र बनू शकले असते, सध्या आहे तो व्यापारउदिमही कैक पटींनी वाढू शकला असता, परंतु तीन दशके ठाण मांडून बसलेल्या दहशतवादाने काश्मिरींचा आर्थिक कणा कसा मोडला आहे त्याचे दर्शन धर घडवतात. आर्थिक प्रगतीबरोबरच काश्मीर हे तेथील संमिश्र, सहिष्णु संस्कृतीद्वारे ‘वैज्ञानिक मानवतावादा’चे केंद्र ठरू शकले असते, जगामध्ये वाढत चाललेल्या असहिष्णुतेच्या समस्येला उत्तर ठरू शकले असते, असे लेखक म्हणतात. मात्र, त्यासाठी सलाफी तत्त्वज्ञानाऐवजी सुफी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार व्हायला हवा व त्याची शैव व बौद्ध तत्त्वज्ञानाच्या उपासकांशी समरसता घडायला हवी असे लेखकाला वाटते.
या ग्रंथाचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे काश्मीर समस्येचे त्यांनी ‘‘लीलामोक्षी’’ या सिद्धान्ताच्या आधारे विश्लेषण करण्याचा केलेला प्रयत्न. या ग्रंथाच्या सतराव्या प्रकरणामध्ये त्यांनी तो केला आहे. ‘‘लीलामोक्षी’ म्हणजे ‘लिगलिटी’, ‘लँड’, ‘मोरॅलिटी’, ‘ऑपरेशनालिटी’, ‘कश्मिरियत’ ‘सुफिझम’, ‘हिस्टोरीसिटी’ आणि ‘आयडेंटिटी’. या प्रत्येक घटकाचे वैयक्तिक पातळीवर व एकमेकांच्या संदर्भात विश्लेषण व्हायला हवे. तेव्हाच काश्मीर समस्येच्या हाताळणीसाठी वेगळा दृष्टिकोन सापडू शकतो व नवे आकलन घडू शकते असे लेखकाला वाटते.
काश्मीरसारख्या प्रांतिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी जगभरामध्ये कसे प्रयत्न झाले त्याचा विस्तृत आढावा लेखकाने एका प्रकरणात घेतलेला आहे. इटलीतील त्रिएस्ते, दक्षिण तायरोल, स्वीडनमधील आलंड बेटे, ब्रिटनमधील उत्तरी आयर्लंडचा प्रश्न, कॅनडाची क्युबेक समस्या आदींची सोडवणूक कशी केली गेली त्याचा उहापोह धर एका तक्त्याद्वारे करतात. स्वतः व्यवस्थापनशास्त्रातील तज्ज्ञ असल्याने व्यवस्थापनशास्त्रीय दृष्टिकोनातून काश्मीर प्रश्नाच्या संदर्भात गणिती विश्लेषण करण्याचा प्रयत्नही लेखकाने केला आहे. अर्थात, काश्मीर खोर्‍याची भौगोलिक विविधता, यातील पाकिस्तानचा असलेला संदर्भ वगैरे गोष्टीही ते डोळ्याआड करीत नाहीत. एक केस स्टडी म्हणून ही सगळी व्यवस्थापनशास्त्रीय परिभाषा जरी ठीक असली, तरी काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे ही आपली स्वच्छ आणि सुस्पष्ट भूमिका असल्याने त्या परिघातच या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या शक्यता आजमावल्या गेल्या पाहिजेत. शिवाय काश्मीर प्रश्न हा केवळ व्यवस्थापनशास्त्रीय वा गणिती सिद्धान्तांद्वारे सुटू शकत नाही, तर मानवीय दृष्टिकोनातूनच तो सुटू शकतो याची कबुली स्वतः लेखकानेच दिलेली आहे. आजवरच्या दहशतवादातून आपण काय मिळवले आणि काय गमावले याचा लेखाजोखा काश्मिरी जनतेने मांडावा अशी अपेक्षा लेखक करतात. आपली काही उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी हिंसक कृतींचा अवलंब केल्याने आपल्या भावी पिढ्यांसाठी कालबद्ध उद्दिष्ट्ये आपण साध्य करू शकणार आहात का, असा सवाल ते काश्मिरी जनतेला करतात. आजवर काश्मीरमध्ये प्रचंड रक्तपात झाला. एक लाखांहून अधिक लोक त्यात बळी गेले, साडे तीन लाख काश्मिरी पंडितांना विस्थापित व्हावे लागले. आपल्या जनतेला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय देऊ शकणार्‍या झैन-उल-अब्दिनसारख्या द्रष्ट्या नेतृत्वाची काश्मीरला गरज आहे असे लेखकाला वाटते. विविध भारतीय नेत्यांनी काश्मिरींना आजवर उदंड आश्वासने दिली, परंतु मन आणि ह्रदयाचे मीलन झाले नाही. अटलबिहारी वाजपेयींसारख्या एखाद्याच नेत्याने ‘इन्सानियत’, ‘जम्हूरियत’ व ‘कश्मिरियत’ चा नारा दिला, ज्याची काश्मीर आजही आठवण काढत असते. काश्मीरमधील परिस्थितीच्या नुसत्या व्यवस्थापनाऐवजी तोडगा काढला जावा असे धर यांना वाटते. त्यासाठी धर्म, जात, पंथ, राजकीय विचारधारा विसरून समस्त काश्मिरींनी एकत्र यावे आणि प्रशासन, उद्यम, संस्कृती, शिक्षण आदींचे धोरण भावी पिढ्यांसाठी आखावे अशी आज बरीचशी भाबडी वाटणारी अपेक्षाही लेखक व्यक्त करतात.