जग किती बदललंय ना!

0
202
  •  सरिता नाईक
    (फातोर्डा, मडगाव)

त्या गोष्टी ऐकता ऐकता आम्ही त्या काळामध्ये जाऊन पोहोचलो. खरंच, किती वेगळेपण होतं तेव्हाच्या विवाह समारंभात! लग्न होईपर्यंत वधू-वरांनी एकमेकांना पाहिलेलंही नसायचं. मोठ्यांनी पसंत केलं की मग साखरपुडा…… हे सगळं परत एकदा आठवून देणार्‍या आमच्या सहकार्‍यांचे मी मनोमन आभार मानले.

गेल्या महिन्यात गोव्यातील काही लोकांचा एक गट शृंगेरीला जाणार होता. त्यांच्याबरोबर मीही जायचे ठरविले. सर्वांनी मडगाव रेल्वे स्टेशनवर जमायचे आणि ट्रेनने जायचे असे ठरले होते. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण सकाळी सातच्या आतच स्टेशनवर जमलो. काहीजण फोंडा, वास्को, पणजीहून येणार होते. तेही पहाटे उठून वेळेत मडगावला पोचले. काहीजण मग कारवारला आम्हाला येऊन मिळणार होते.
म्हणतात ना, ‘प्रथम ग्रासे मक्षिकापातः!’ त्याप्रमाणे नेमकी त्या दिवशी ट्रेन उशिरा येणार होती. सुरुवातीला अनाउन्स केलं गेलं की ट्रेन अर्धा तास उशिरा येईल. पण वेळ वाढता वाढता अकरा वाजून गेले तरी आम्ही मडगाव स्टेशनवरच! पण गंमत अशी की ट्रेनला उशीर झाला म्हणून कुणी नाराजी दाखवली नाही की कुणी कंटाळलं नाही. माझ्या मते रेल्वेस्टेशन ही अशी जागा आहे की तिथं आपण न कंटाळता कितीही वेळ घालवू शकतो. निरनिराळ्या गाड्या येतात-जातात. उतरणार्‍या व चढणार्‍या प्रवाशांची लगबग. कुणाला स्टेशनपर्यंत पोहोचवायला कुणीतरी आलेले असतात. त्यांच्या गप्पा; बाहेरगावाहून आलेल्यांना कुणी घ्यायला आलेलं असतं. त्यांची शोधाशोध. वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेशातले लोक यांचं निरीक्षण करायला लागलो की वेळ कसा जातो ते कळतच नाही. त्यात आमचा निरनिराळ्या ठिकाणांहून आलेल्या वीस-बावीस जणांचा गट. त्यांच्या गप्पा तर विचारूच नका!
शेवटी एकदाची साडेअकराच्या सुमारास आली आमची सुपर एक्सप्रेस. मग
हीऽ ऽ सर्वांची डब्यात चढण्याची गडबड. जास्त त्रास घ्यावे लागले नाहीत. प्रवाशांच्या लोंढ्याबरोबर आपोआप आत पोचलो आणि मिळेल ती जागा पकडून आधी बसून गेलो. आमची तिकिटे कन्फर्म नव्हती. त्यामुळे टीसी येतपर्यंत धाकधुक होतीच. त्यामानानं टीसीचं आगमन लवकर झालं म्हणायचं. आमच्या गटप्रमुखाचं आणि त्याचं बोलणं झालं. काही पैसे भरावे लागले आणि मग आम्हाला आमची हक्काची जागा मिळाली. बहुतेक सर्वांना जवळजवळची कंपार्टमेंट्‌स मिळाली होती, त्यामुळे गप्पांना ऊत आला. आम्हा सर्वांच्या हसण्या-खिदळण्यामुळे ट्रेनचा डबा दुमदुमून गेला.
लगेचच काही अन्नपूर्णांनी खाऊचे डबे बाहेर काढले. एकीने हीट (फणसाच्या पानांच्या द्रोणातल्या इडल्या) व चटणी बाहेर काढली. कुणी पातळभाजी आणली होती. कुणी गोड इडल्या तर कुणी लाडू. खाद्यपदार्थांची जणू स्पर्धाच.

आमच्या गटामध्ये आम्ही काही सिनियर सिटीझनपण होतो. त्यातल्या कुणालातरी आमच्या लहानपणी कारवार भागातील विवाह कशाप्रकारे होत होते ते आठवले आणि त्या गोष्टी ऐकता ऐकता आम्ही त्या काळामध्ये जाऊन पोहोचलो. खरंच, किती वेगळेपण होतं तेव्हाच्या विवाह समारंभात! लग्न होईपर्यंत वधू-वरांनी एकमेकांना पाहिलेलंही नसायचं. मोठ्यांनी पसंत केलं की मग साखरपुडा. साखरपुड्याला ‘गोडकातली’ (गुळखोबरं) म्हटलं जायचं. या समारंभातसुद्धा वधूवरांना काही महत्त्व नसायचं. सगळी मोठी.. जाणती.. माणसंच असायची. हा समारंभ वधूच्या घरी व्हायचा. सर्वांना वधू पसंत पडली की नारळ फोडून, त्याच्या फोडी करून त्यात गूळ मिसळून सर्वांना वाटल्या जायच्या. हीच ती ‘गोडकातली’.

त्यावेळची बहुतेक लग्नं ही ‘गोरज मुहूर्ता’वर लागायची. गोरज मुहूर्त म्हणजे संध्याकाळचा मुहूर्त. दूरवरच्या वधूच्या गावी वराकडील मंडळी शिडांच्या बोटीने, लॉंचेस किंवा मैलच्या मैलसुद्धा चालत जायची. वर्‍हाड वधूघरी पोचल्यावर पाहुण्यांना गूळपाणी दिलं जायचं. कोल्ड्रिंक्सचा जमाना नव्हता. मांडवाच्या बाहेर सिमांत पूजन व्हायचं. याला त्यावेळचे लोक ‘श्रीमंत पूजा’ म्हणायचे. सीमांतपूजन झाल्यावर मांडवाच्या दारात वरपक्षाच्या महिला व आतल्या बाजूला वधूपक्षाच्या महिला हातात तांदळाने भरलेले तबक घेऊन एकमेकांच्या समोर उभ्या राहत आणि एकमेकांवर तांदळांचा मारा करत.
गोरज मुहूर्तावर माळा पडल्यावर – या माळा फक्त सुकलेल्या बकुळीच्या फुलांच्याच असत. कारवारी भाषेत त्यांना ‘ओवळा सर’ म्हणत. मग सर्वांना बत्तासे आणि केळ्यांचे तुकडे वाटले जात. मग अहेर, होमहवनादी विधी होऊन जेवणावळी पडायला रात्रीचे ११ वाजून जात. तोपर्यंत मुलेबाळे मांडवात कुठेही झोपून जायची. त्यांच्या आया त्यांना शोधून जेवायला उठवण्यासाठी घाई करायच्या. लग्नमंडपाच्या शेजारीच स्वयंपाकासाठी वेगळा मंडप तयार केलेला असायचा. त्याला ‘रसया मंडप’ (रसोई) म्हणत. सारे पदार्थ तिथेच बनवले जात आणि ते बनवण्यासाठी वाड्यावरचे बायका-पुरुष असत.
लग्नमंडपात जमीनीवरच रांगेत पत्रावळी मांडल्या जायच्या. भोजनाचा मेनूपण आगळाच असायचा. वरणभात, मोड आलेल्या मुगाची आमटी, कच्चा फणस आणि वाटाणे घालून केलेली मसालेदार धबधबीत भाजी (हिला चाक्याची भाजी म्हणतात) आणि गुळवणी म्हणजे तांदळाच्या पीठाची गूळ आणि नारळाचा रस घालून केलेली खीर किंवा सोजी म्हणजे गव्हाच्या कण्यांची खीर. हे पदार्थ सामान्यतः प्रत्येक लग्नात असायचेच. त्याशिवाय एखादी सुकी भाजी, तळलेले पापड आणि कैरीचे लोणचे. पानं वाढून झाली की कुणीतरी पुरुष आपल्या दमदार आवाजात श्‍लोक सुरू करायचा. मी तरी प्रत्येक लग्नात हा एकच श्‍लोक ऐकलाय.

प्रारंभी विनती करू गणपती ऽ ऽ
विद्या ऽ ऽ दया ऽ सागरा |
अज्ञानत्व हरोनि बुद्धी मती दे ऽ ऽ
आराध्य मोरेश्वरा |
चिंता, क्लेश दरिद्र दुःख अवघे ऽ ऽ
देशांतरा पाठवी |
हेरंबा ऽ गणनायका ऽ गजमुखा ऽ ऽ
भक्ता बहू तोषवी
नमसू पार्वतीपते हर हर महादेव ॥

या ‘हरहर महादेव’ने मंडप दुमदुमून जायचा. पंगतीवर पंगती उठायच्या. यावेळी कुणीतरी वधूपक्षाच्या एखाद्या त्रुटीवर बोट ठेवून भांडण उकरून काढायचा आणि त्याला शांत करता करता यजमानांच्या नाकीनऊ यायचे.
भोजन झाल्यावर वर्‍हाडी मंडळी वाड्यावरील शेजार्‍यापाजार्‍यांच्या अंगणात जागा मिळेल तसे आडवी पडत. इतके सगळे होईपर्यंत रात्रीचे दीड-दोन वाजून गेलेले असत. परत पहाटे उठून लोक, खास करून बायका, नटून थटून तयार असत. जरा सधन असले तर शेवचिवडाही मिळे. नाश्ता झाला की परत वधूवरांना बाशिंग बांधले जाई, मुलीची पाठवणीची वेळ आली की वधू आणि तिथल्या समस्त स्त्रिया रडून आकांत करीत. हे दृश्य पाहून सर्वांनाच भरून येई. वधूबरोबर तिची बहीण किंवा मैत्रीण पाठराखीण म्हणून येई. बर्‍याच वेळी वधूने आपले सासर पाहिलेलेही नसायचे. तिथे ती एकदमच नवखी असायची.
वधूकडून वरात निघाल्यावर वराकडील यजमान किंवा एखादा प्रतिष्ठित माणूस परत मागे येऊन वधूकडच्या लोकांना आपल्या घरी दिबण घेऊन यायचे आमंत्रण देई. दिबण म्हणजे वधूपक्षाच्या लोकांनी आपल्या सर्व नातेवाईक व शेजारीपाजारी यांना वाजत गाजत वधूगृही न्यायचे. जातांना वधूवरांसाठी भेटवस्तू व ओट्या न्यायच्या. वरगृही सत्यनारायणाची पूजा ठेवली जायची.
पाहुणे मंडळींसाठी पानक म्हणजे गूळ-मिरेपूड घालून केलेले सरबत – तयार असायचे. कुणीतरी खट्याळ स्त्री काही वेचक व्यक्तींना सरबत म्हणून मीठाचे पाणी पाजून गंमत करायची.
दुसर्‍या दिवशी खळमळ खेळली जायची. म्हणजे वधूवरांना केंद्रस्थानी ठेवून निरनिराळे खेळ खेळले जात. त्यात सारेच आपली हौस भागवून घेत. मज्जाच मज्जा यायची.
हे सारं आठवता आठवता हसण्याचा मोठ्ठा आवाज आला म्हणून शेजारच्या कंपार्टमेंटमध्ये डोकावले तर कुणीतरी ज्येष्ठ पूर्वीच्या खेड्यातील मासेविक्री करणार्‍या सादयकाराच्या सादेची म्हणजे आरोळीची नक्कल करत होता. त्यावेळी जलमार्गाने होडीत मासे भरून घेऊन काही होडीवाले येत. होडी नदीकाठी बांधून ठेवून ते आणलेल्या माशांची नावे घेऊन मोठमोठ्याने ओरडत. हो ऽऽऽ य तार्ले, बांगडे, पेडवे, सुंगटा हो ऽऽऽ य…. अशी साद घालत नदीपासून बर्‍याच दूरपर्यंत गावात येत असत. त्यांची साद ऐकून मग घराघरातून लोक वल्ल्यांमध्ये (वल्ली म्हणजे बांबूच्या पातळ कामठ्यांपासून तयार केलेले एक साधन) भात (साळ) घेऊन नदीकडे धावत जात. यासाठी पैशांचा व्यवहार होत नसे. माश्यांच्या बदल्यात साळ दिली जात असे. काही स्त्रिया गावात डोक्यावर सुक्या माशांची टोपली घेऊन घरोघर फिरत असत. त्यांनाही माशांच्या बदली साळ किंवा तांदूळ दिले जात.

हे सगळं आठवलं आणि वाटलं, खरंच! एका पिढीत जग किती बदललंय ना! इतक्या जास्त प्रमाणातील बहुतेक आमच्याच पिढीने पाहिले, अनुभवले असणार. चलनी नाण्या-नोटांतले बदल पाहिले, चौसष्ट पैशांचा रुपयाही पाहिला आणि शंभर पैशांचा रुपयाही पाहिला. चिमणी कंदिलाच्या प्रकाशात केलेला अभ्यास आठवला. रॉकेलची बचत व्हावी म्हणून दिव्याशिवाय चांदण्या रात्री अंगणात सर्वांनी एकत्र बसून केलेलं जेवण आठवलं. रात्री अंगणात बिछाने टाकून आकाशातल्या चांदण्या मोजता मोजता कधी निद्रादेवीच्या अधीन व्हायचो ते कळतही नव्हतं. आता गावी गेलो तरी तसं चांदण्यांनी गच्च भरलेलं आकाश पहायला मिळत नाही. आईने घरी हातानेच शिवून घातलेले कपडे आठवले. वाढत्या अंगाची मुलं म्हणून ते ढगळच शिवलेले असायचे. त्या कपड्यांचे फिटिंग परफेक्ट असावे असा आग्रह नव्हता. त्याची जाणही नव्हती. बस्स, अंग झाकणे हे महत्त्वाचे होते. वर्षातून एकदाच नवीन कपड्यांचा स्पर्श व्हायचा. पण त्याची खंत नव्हती. पण त्यावेळी होणारा आनंद अवर्णनीय होता.
हे सारं कल्पनेत परत अनुभवतानाच कुंदापूर स्टेशन आलं आणि आमची उतरण्याची लगबग सुरू झाली. हे सगळं परत एकदा आठवून देणार्‍या आमच्या सहकार्‍यांचे मी मनोमन आभार मानले.