हयात, अहमदवर बंदी

0
80

>> भ्रष्टाचार प्रकरणी आयसीसीची कारवाई

आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली आमिर हयात व अश्फाक अहमद या संयुक्त अरब अमिरातीच्या दोन खेळाडूंवर आयसीसीने तात्पुरती बंदी घातली आहे. आरोपांना उत्तर देण्यासाठी या दोन खेळाडूंना २ आठवडे देण्यात आले आहेत.

अमिराती क्रिकेट मंडळाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्‍वचषक पात्रता स्पर्धेदरम्यान हयात याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. परंतु, त्याच्यावर अधिकृत आरोप ठेवण्यात आले नव्हते. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी ५ नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल हे दोन्ही खेळाडू दोषी आढळले आहेत. यांच्यावर पैसे किंवा भेट घेऊन सामन्याच्या निकालावर परिणाम करण्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे. म्हणजे दोघांवरही फिक्सिंगचे खळबळजनक आरोप केले गेले आहेत. तपासणी दरम्यान हे दोन खेळाडू त्यांच्या पैशांची आणि भेटवस्तूंची माहिती देऊ शकले नाहीत.

मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळणे हे यूएईच्या खेळाडूंसाठी फारसे नवीन नाही. गेल्या वर्षी युएईचे तीन खेळाडू फिक्सिंगमध्ये दोषी आढळले होते आणि त्यांना निलंबित करण्यात आले होते. मोहम्मद नवीद, शैमान अन्वर आणि कादर अहमद यांना भ्रष्टाचार कार्यात गुंतल्यामुळे आयसीसीने निलंबित केले होते.

पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या आमिर हयातने यूएईसाठी ९ एकदिवसीय सामने आणि ४ टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये भाग घेतला. ज्यामध्ये हयातने एकदिवसीय सामन्यात ११ आणि टी-२० मध्ये ६ बळी घेतले आहेत. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये जन्मलेल्या अश्फाक अहमद याने यूएईचे १६ एकदिवसीय सामने आणि १२ टी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. एकदिवसीय सामन्यात या फलंदाजाने २१.५० च्या सरासरीने ३४४ धावा केल्या आहेत. तर टी-ट्वेंटीमध्ये त्याच्या नावावर २३८ धावा आहेत.