महालय श्राद्ध ः समज/गैरसमज

0
1556

नारायणबुवा बर्वे

आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची थोर परंपरा चालू ठेवणे फार गरजेचे आहे. म्हणून आपण सर्वांनी महालय श्राद्ध करणे जरुरीचे आहे. आपले जे कोणी मृत झालेले, त्यांचाच उल्लेख विधीचेवेळी करायचा आहे. श्राद्ध हे पवित्र कर्तव्य आहे. महालय महिना अन्य कशाकरिताही वर्ज्य नाही.

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कृतज्ञता मानणे याला खूप महत्त्व आहे. आपण सर्व ठिकाणी कृतज्ञ रहावे अशी आपणास शिकवण आहे. याच संकल्पनेतून देव, पितृ, ऋषी, समाज, गुरू, राजा या सर्वांचे ऋण व्यक्त करणे हे आपले कर्तव्य ठरते. म्हणूनच रोज देवपूजा, ऋषीपूजन, पितृ तर्पण, पंच महायज्ञ हे आपणाला सांगितले. त्याचाच एक भाग म्हणून रोज पितृयज्ञ व काकबळी घालावा असे सांगितले गेले व आपण रोज आचरणात आणतो. तरीसुद्धा आपण पितृ ऋणातून मुक्त होत नाही. म्हणून शास्त्रकारांनी श्राद्धविधीची योजना केलीय. ‘‘श्रद्धया क्रियते यत् तत् श्राद्धम्’’.. अशी ‘श्राद्ध’ शब्दाची व्याख्या केलेली आहे. वर्षभर अनेक श्राद्धे सांगितली आहेत. आज बाकीची सर्व श्राद्धकर्मे करणे शक्य नाही पण वर्षश्राद्ध व महालय श्राद्ध (म्हाळ) करता येतात. वर्षश्राद्ध आई-वडील मृत असतील तर त्यांच्या पुरते मर्यादित असते. इतर कोणी मृत असतील तर त्या त्या एकट्यापुरते मर्यादित असते. पण महालय श्राद्ध सर्व पितरांना उद्देशून असते म्हणून ती श्राद्धे अवश्य करावीत.

पितरांना मंगल कार्यामध्ये स्थान आहे. सर्व मंगल कार्ये, अनुष्ठाने यामध्येही श्राद्ध केले जाते. याला नांदीश्राद्ध असे म्हणतात. हे बरेच जणांना माहीत नसते. ज्याप्रमाणे आपण एखाद्या कार्यक्रमामध्ये श्रद्धांजली वाहतो तोच प्रकार आहे. पण महालय श्राद्धाचा कालावधी हा भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून सूर्य वृश्‍चिक राशीला जाईपर्यंत असतो. पण मुख्य काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत आहे. हा पितरांचा अपरान्ह काळ आहे. आपले एक वर्ष म्हणजे पितरांचा एक दिवस आहे. म्हणजे वर्षश्राद्ध व महालय श्राद्धामुळे पितरांना रोज जेवण मिळते. सर्वसामान्यपणे पितृपंधरवडा मुख्य काळ असतो. त्यामुळे त्या महिन्यामध्ये काहीही शुभकर्म करायचे नाही असा समज आहे. पण तो चुकीचा समज आहे. तसे करावयाचे झाल्यास दोन महिने काही करता कामा नये. पण नवरात्र, दिवाळी हे मोठे सण याच कालावधीत येतात. पंचांगामध्ये किंवा कॅलेंडर (दिनदर्शिका)मध्ये महालय प्रारंभ व महालय समाप्ती हे दिलेले असते तोपर्यंत कधीही महालय श्राद्ध करावे. यामुळे लक्षात येईल की या कालावधीमध्ये शुभ कर्मेही करता येतात. भाद्रपद कृष्ण पक्षामध्ये फक्त चतुर्दशी वगळून अमावस्येपर्यंत रोज महालय करावा… असे शास्त्रवचन आहे. या दोन महिन्यांमध्ये पितृलोक जवळ आलेला असतो व आपले पितर जेवणाची वाट बघत असतात अशी समजूत आहे. या वर्षी पितृपंधरवडा दि. २/९/२०२० रोजी सुरू होतो व १७/९/२०२० या दिवशी संपतो.

महालय आरंभ २/९/२०२० रोजी तर महालय समाप्ती. दि. १५/११ /२०२० या दिवशी आहे. मधल्या काळात अधिकमास आहे. अधिकमासांत महालय करायचे नाही.

पितरांचे स्मरण ः आपले कर्तव्य

आता महालयामध्ये (म्हाळामध्ये) कुणाचे स्मरण करावे हे आपण पाहूया. बाप, आजा, पणजा, आई, आजी, पणजी व आईचा बाप, आईचा आजा, आईचा पणजा, आईची आई, आईची आजी, आईची पणजी, काका, मामा, भाऊ, आत्या, मावशी, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी, गुरुजी, पुरोहित (आचार्य गुरू) यांपैकी जे जे मृत झालेले असतील, याशिवाय आप्त, सासरा वगैरेंचेही स्मरण करावे.
पिंड प्रदान करताना- या सर्वांना पिंड प्रदान आहेच. त्याशिवाय शिष्याला पिंड द्यावा. याशिवाय चार धर्मपिंड दिले जातात ते कुणाला कुणाला देतात ते बघून आपण थक्क व्हाल.

पितृकुळामध्ये व मातृकुळामधील दास, दासी, सेवक, आश्रित, मित्र-मैत्रिणी, सखे, पशू-पक्षी, वृक्ष, गाई, म्हशी, दृश्य, अदृश्य, कधीतरी उपकार केलेले, दोन्ही कुळामधले गुरुजन, आप्त, भाऊबंद, निपुत्रिक गेलेले, क्रियाकर्म लोप झालेले. पूर्व सुकृतामुळे नरकात गेलेले, गर्भपात, झालेले, अपंग या सर्वांना पिंड प्रदान सांगितले व तर्पण सांगितले आहे. तर्पणामध्येही जे कोणी माझ्या कुळामध्ये जन्म होऊन मृत झाले त्यांनी मी केलेले तर्पणाचे पाणिग्रहण करावे असे सांगितले. श्राद्ध किंवा महालय श्राद्ध हे करायचे विधान म्हणजे ब्राह्मणपूजन, ब्राह्मणभोजन, पिंड प्रदान, तर्पण हे मुख्य कर्तव्य आहे. ब्राह्मण मिळाले नाही तर दर्भबटु करून सर्व विधी करावे याला ‘चटश्राद्ध’ म्हणतात. तेही जमले नाही तर शिधा द्यावा. याला ‘आमाळा श्राद्ध’ म्हणतात. तेही जमले नाही तर काही दक्षिणा द्यावी, याला ‘हिरण्य श्राद्ध’ म्हणतात. तेही जमले नाही तर गाईला पान द्यावे, तेही जमत नसेल… जर मोठी आपत्ती आली तर दुपारी घरातून लांब जावे, दक्षिण दिशेला तोंड करून उभे रहावे व हात वरती करून मोठ्याने पितरांना सांगावे- मी आज तुम्हाला काही देऊ शकत नाही यालाच ‘काखा वरती करणे’ म्हणतात. (यावरून ‘काखा वरती करणे’ वाक्प्रचार रूढ झाला). पण त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे.

श्राद्धविधी महत्त्वाचा!

आता याबाबत काही विचार असे येतात की, अशा प्रकारे अन्न फुकट घालविण्यापेक्षा एखाद्या गरिबाला दिले तर, सेवाभावी संस्थेला मदत दिली तर, अन्नदान केले तर… याप्रमाणे दानधर्म जरूर करावा पण हे अतिरिक्त म्हणून जरूर करावे. पण श्राद्धविधी करायलाच पाहिजे.
आता नवविचार लोकांकडून व्यक्त केले जातात की माणूस गेल्यानंतर त्याला दुसरा जन्म मिळतो. एखाद्याला मुक्ती मिळते तर दुसरा जन्म कुठला मिळाला आहे सांगता येणार नाही. आम्ही सर्वांनाच अन्नोदक देतो. पिंडही अन्नाचेच असतात. पण त्याला सापाचा जन्म मिळाला असेल, एखाद्याला कृमी-कीटकाचा मिळाला असेल त्यांना अन्न चालणार नाही. पण विधात्याने त्याचीही व्यवस्था केलेली आहे. त्यांच्या मदतीला वसू, रुद्र, आदित्य, अर्यमा, देवता त्यांना दिलेले अन्न त्यांच्या त्यांच्या खाद्य पदार्थांत रूपांतर करून देण्याचे कार्य करतात. काहींना अमृत रूपाने, काहींना गवतरूपाने, काहींना वायुरूपाने ते देतात. उदाहरण म्हणून सांगायचे झाल्यास जसे दुसर्‍या राष्ट्रात राहणार्‍या आपल्या नातेवाइकाला आम्हाला पैसे पाठवायचे असतील तर आपण बँकेमध्ये रक्कम भरतो. ती रक्कम त्या माणसाला त्या राष्ट्रातल्या चलनात मिळते किंवा तिकडून इकडे रक्कम पाठवायची असेल तर तिकडे बँकेतून भरलेली रक्कम आमच्या चलनामध्ये आम्हाला मिळते. त्याप्रमाणे ही व्यवस्था आहे. त्यामुळे उगाचच काही शंका कुशंका काढू नये.

आता काही ठिकाणी काही समाजामध्ये अज्ञानामुळे किंवा समजून न घेतल्यामुळे काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. काही ठिकाणी आई सौभाग्यवती गेली तरच तिचे स्मरण करतात. काही समाजामध्ये आई, बाप वगैरे पितृकुळातील मृताना पिंड देतात. मातृ कुळातील मृतांना पिंड देत नाही किंवा त्यांचे नावे पितर बोलावीत नाही. आत्या, मामा, मावशी, काका इत्यादींकरिता ब्राह्मण ठेवत नाही. पिंडही देत नाही. याचे कारण त्यांना त्यासंबंधीची माहिती योग्य प्रकारे मिळालेली नाही. त्याचप्रमाणे काहींची तिथी चतुर्दशी असली तर त्या दिवशी पितृश्राद्ध म्हणजे अपघाती मृत्यू झाला असेल तरच महालय करावा नपेक्षा दुसर्‍याही दिवशी करावा. पौर्णिमा तिथी असेल तर सर्वपित्री अमावास्या किंवा इतर कुठल्याही तिथीला महालय करावा. सौभाग्यवती कुणी गेलेली असेल तर अविधवा नवमी, याशिवाय ब्राह्मण समाजाव्यतिरिक्त आश्‍विन शु. प्रतिपदेला येणारे मातामह श्राद्ध बहुधा कुणी करत नाही. मुलीच्या मुलाने आईच्या वडिलांचे (मृत असतील तर) बाप असतानासुद्धा श्राद्ध करावे असे आहे. पण अनेकांना त्याची माहिती नाही. याशिवाय अनेक गोष्टी अज्ञानामुळे घडत असतात. श्राद्धाला ब्राह्मण सांगताना आपापल्या ज्ञातीतील सांगितले तरी चालतात. एकाच घरांतील पती, पत्नी, बाप, मुलगा, भाऊ सांगू नये असा नियम आहे. पण काही ठिकाणी यांना सांगितले जाते. त्यांना गंध, गोपीचंदन लावावे. सुवासिनींना मात्र कुंकू लावून फुले, वेणी द्यावी हे माहिती नसल्यामुळे घडते हे टाळावे. आपले एक वर्ष म्हणजे पितरांचा (अहोरात्र) एक दिवस समजला जातो. उत्तर ध्रुव देवांचे निवासस्थान व दक्षिण ध्रुव पितरांचे निवासस्थान मानले जाते. दक्षिणायनात दक्षिण ध्रुवावर सहा महिने दिवस असतो व उत्तर ध्रुवावर सहा महिने रात्र असते. दक्षिण ध्रुवावर दिवस असलेले पितर जास्त कार्यप्रवण असतात. पितृ पंधरवडा म्हणजे त्यांचा अपरान्ह काळ (भोजनकाळ) याकरिता त्या पंधरवड्यात महाळ केला तर जास्ती फलदायी असतो. जमलेच नाही तर वृश्चिकेला सूर्य जाईपर्यंत महालय करता येतो.

म्हणून आपली ही कृतज्ञतेची थोर परंपरा चालू ठेवणे फार गरजेचे आहे. आपल्याच धर्मांत नव्हे तर सर्वच धर्मात पितरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. पण आपला एवढा विचार इतरत्र कोठेही आढळत नाही म्हणून आपण सर्वांनी महालय श्राद्ध करणे जरुरीचे आहे. वर लिहिताना सर्व विधान कसे करावे ते लिहिलेच आहे. आपले जे मृत झालेले त्यांचाच उल्लेख विधीचेवेळी करायचा आहे. श्राद्ध हे पवित्र कर्तव्य आहे. महालय महिना कशाकरितांही वर्ज्य नाही हे परत सांगून थांबतो. (संदर्भाकरिता- शास्त्र सांगते, दाते पंचाग, धर्मसिंधू, निर्णयसिंधू.)