स्वातंत्र्याचा हुंकार!

0
171

बरोबर ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी संध्याकाळी ठीक चार वाजता ह्या गोमंतकामध्ये एक चमत्कार घडला. एक अशी गोष्ट घडली जी कोणी कधी पाहिली तर नव्हतीच, पण तिचा विचारही केला नव्हता! गोव्याबाहेरून आलेल्या, पण गांधीजींच्या तालमीत तयार झालेल्या एका छत्तीस वर्षांच्या तरुणाने आपल्या एका छोट्याशा कृतीने पोर्तुगीज राजसत्तेला गदगदा हलवले. दबलेल्या, पिचलेल्या, स्वत्व हरवून बसलेल्या ह्या भूमीमध्ये असा काही हुंकार भरला की क्षणांत विझल्या निखार्‍यांवरची राख झटकली गेली आणि अंगारे धगधगू लागले. त्या तरुणाच्या त्या एका छोट्याशा निर्भय कृतीने लाखो मने प्रज्वलित झाली, उत्साहाने, चैतन्याने भारून गेली. बोरकरांसारखे कवी गाऊ लागले,
‘‘त्रिवार मंगल वार आजला त्रिवार मंगल वार
स्वातंत्र्याची सिंहगर्जना अतां इथें उठणार
सह्यपर्वता! भार्गवसिंधो! उभारुनी हात
लाख मुखांनीं ललकारुनियां द्या तिजला साथ
हे राण्यांच्या
उठा शिळांनो
लावा लाल टिळे,
अन् वायूंनो
फुलवा अमुच्या
हृदयांतिल इंगळे…’’
आणि चमत्कार घडला. मुक्तीच्या आकांक्षेने भारलेले एक धगधगते पर्व मग पुढची पंधरा वर्षे गोमंतकातील पोर्तुगीज राजसत्तेचे सिंहासन घडोघडी गदागदा हलवीत राहिले. निःशस्त्र आणि सशस्त्र आंदोलनांच्या लाटांवर लाटा उसळत राहिल्या आणि त्यांनी पोर्तुगीज राजसत्तेला सतत दे माय धरणी ठाय करून सोडले. हा निर्भय तरूण होता डॉ. राममनोहर लोहिया आणि गोमंतकामध्ये मुक्तीलढ्याचे रणशिंग फुंकणारा तो ऐतिहासिक दिवस होता १८ जून १९४६. हा अमृतमहोत्सवी क्रांतीदिन आपण साजरा करीत आहोत.
चलेजाव चळवळीत तुरुंगवास भोगलेल्या लोहियांचे गोव्यात विश्रांतीसाठी येणे, येथील विचार आणि आविष्कारस्वातंत्र्यावरील बंधनांची कैफियत त्यांच्यापर्यंत जाणे आणि त्याविरुद्ध ठिणगी पेटवण्याचा निर्धार करून त्यांनी तो धैर्याने तडीला नेणे हे सगळे आजही स्वप्नवत वाटते. कापितांव फोर्तुनाद मिरांदने रोखलेले पिस्तुल बाजूला सारून भाषणासाठी उभ्या राहिलेल्या त्या धैर्यमूर्तीच्या त्या विलक्षण धाडसाची आज आपण केवळ कल्पनाच करू शकतो. त्याविषयी आजवर भरभरून लिहिले गेले आहे. लोहिया आणि ज्युलियांव मिनेझिसना सभास्थानी नेण्याची जबाबदारी पत्करणार्‍या लक्ष्मीदास बोरकरांनी पुढे नवप्रभेचे संपादक भूषविले ह्याचा उल्लेखही याप्रसंगी करणे अनुचित ठरू नये. केवळ नागरी स्वातंत्र्यावरील बंधने झुगारून आणि भाषणबंदी मोडून लोहिया स्वस्थ बसले नाहीत हेही लक्षात घेणे जरूरी आहे. त्यांच्या अटकेमुळे गोवा तर पेटून उठलाच, परंतु पोर्तुगिजांनी सीमेवर परत पाठवणी केली तेव्हा येत्या तीन महिन्यांत जर नागरी स्वातंत्र्य बहाल करणार नसाल तर मी पुन्हा येईन असे सांगून लोहिया गेले आणि खरोखर तीन महिन्यांनी वचनपूर्ती करण्यासाठी बेळगावमार्गे पुन्हा गोव्यात दाखल झाले. कुळे स्थानकावर त्यांना पुन्हा अटक होऊन आग्वादला रवानगी झाली. दहा दिवसांनी सुटकेनंतर पुन्हा सीमेवर पाठवणी होताच तिसर्‍यांदा गोव्यात परतण्याचा त्यांचा निर्धार होता, परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी तयारीसाठी वेळ मागितल्याने ते परत गेले खरे, परंतु जातानाही सीमाभागामध्ये गोवामुक्तीची मशाल पेटवून गेले. पुढे दीर्घकाळ गोवा मुक्तीच्या लढ्याशी लोहिया समरस झाल्याचे आपल्याला दिसते. दुर्दैवाची बाब म्हणजे नेहरू – पटेलांच्या कॉंग्रेसने आणि तेव्हा दिल्लीत सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस – मुस्लीम लीगच्या हंगामी सरकारनेे लोहियांच्या ह्या गोवामुक्तीलढ्याशी नाते तर नाकारलेच, शिवाय त्यांना त्यापासून परावृत्तही केले, हे कटू असले तरी सत्य आहे. तेव्हा लोहियांच्या पाठीशी ठामपणे उभे होते केवळ गांधीजी.
मडगावात १८ जून ४६ रोजी लोहियांनी केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाचा संपूर्ण मराठी अनुवाद या अंकात पान दोनवर आवर्जून दिलेला आहे. आजच्या पिढ्यांनाही प्रेरणा देणारा तो नागरी स्वातंत्र्याचा महामंत्र आहे. ‘मुक्तपणे बोला, लिहा, विचार करा आणि संघटित व्हा’ असा संदेश लोहिया आपल्याला ७५ वर्षांपूर्वी देऊन गेले आहेत, येथे परकी पोर्तुगिजांची जुलमी सत्ता असताना हा विचार आणि उच्चार स्वातंत्र्याचा जयघोष करून गेले आहेत हे आपण पक्के लक्षात ठेवण्याची जरूरी आहे. आज देश स्वतंत्र आहे, परंतु आपल्या विचारांवर, उच्चारावर, लेखणीवर, वाणीवर बंधने घालण्याचे प्रयत्न अधूनमधून होत असतात. आणीबाणीचा काळा कालखंड स्वातंत्र्यानंतरच आपण अनुभवला. त्यातून तावून सुलाखून गेल्यानंतरही अधूनमधून अशा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष बंधनांचे सावट आपल्या माथ्यावर अधूनमधून डोकावत असते. अशा वेळी लोहियांची ती ती निर्भयता, त्यांचा तो नागरी स्वातंत्र्याचा महामंत्र ह्याचेे स्मरण आपल्याला धैर्याने उभे राहण्याची आणि लढण्याची प्रेरणा नक्की देईल. कवी मनोहरराय सरदेसायांच्या शब्दांत तेव्हा विचारावे लागेल, ‘‘उदक लेगित जाल्ले रगत आणि रगत जाल्ले हून | भावा तुका याद आसा अठरा जून?’’