स्वातंत्र्यदिनी ७१ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा होणार सन्मान

0
10

>> मुख्यमंत्र्यांची माहिती; १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘हर घर तिरंगा’ मोहीम

राज्यात ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात गोवा मुक्तीलढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या ७१ स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

या स्वातंत्र्यसैनिकांमध्ये गोव्यातील ४१ आणि परराज्यातील ३० स्वातंत्र्यसैनिकांचा समावेश आहे. राज्य आणि तालुका पातळीवरील स्वातंत्र्यदिनात मुक्तीलढ्यात शहीद झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान केला जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजित ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेत राज्यातील नागरिकांनी सहभागी होऊन आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावा. तसेच, २ ऑगस्टपासून नागरिकांनी आपल्या सोशल मीडियावरील प्रोफाईलवर तिरंगा ध्वजाचा वापर करावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

मोपा विमानतळाचे उद्घाटन सप्टेंबरमध्ये
मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा येत्या १५ ऑगस्ट रोजीचा उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला असून, विमानतळाचे उद्घाटन आता सप्टेंबर २०२२ महिन्यात केले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल सांगितले. मोपा विमानतळासाठी आवश्यक मनुष्यबळाची निवड करताना स्थानिकांना प्राधान्य दिले जाणार आहे. मोपा विमानतळाचे काम जलदगतीने सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.