संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी

0
20

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना काल ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना काल ईडी न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणीदरम्यान ईडीने राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली होती, तर राऊत यांच्या वकिलांनी कोठडी द्यायची असेल तर आठ दिवसांपेक्षा कमी द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.

कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांना मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी ईडीने अटक केली. काल सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर दुपारी २ वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी पार पडली. ईडीच्या वकिलांनी राऊतांच्या ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. राऊतांचे वकील अशोक मुंदरगी यांनी मात्र याला विरोध दर्शवताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले आहे. त्यामुळे ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल केला.