बांबोळीत कर्करोग इस्पितळ इमारतीचे भूमिपूजन

0
6

>> रुग्णांना मोफत उपचार मिळणार : आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे

आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्या हस्ते काल बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळाजवळ कर्करोग इस्पितळासाठीच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. या इस्पितळात उपचारांसाठी येणार्‍या रुग्णांवर मोफत उपचार होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी राणे यांनी यांनी या इस्पितळासाठी केंद्र सरकारकडून निधी मिळाल्याचे सांगितले. हे इस्पितळ एक आघाडीचे कर्करोग इस्पितळ बनावे, यासाठी टाटा मेमोरिअल किंवा देशातील अन्य एखाद्या मोठ्या कर्करोग इस्पितळाशी हातमिळवणी करण्यात येणार आहे. या इस्पितळात येणार्‍या रुग्णांना चांगली सेवा व उपचार मिळावे, यासाठी एखाद्या आघाडीच्या कर्करोग इस्पितळाशी करार करावा लागणार असल्याचेही राणेंनी सांगितले.

या इस्पितळाच्या भूमिपूजनावेळी सांत आंद्रेचे आमदार वीरेश बोरकर, सांताक्रूझचे आमदार रुडॉल्फ फर्नांडिस आणि गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.

दरम्यान, गोमेकॉत एक पूर्ण क्षमतेचा प्रसूती विभाग स्थापन करण्याचे आपले स्वप्न असल्याचेही राणेंनी यावेळी स्पष्ट केले. माता व नवजात बालकांसाठी या विभागाची गरज असल्याचेही ते म्हणाले.