स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्येहळद आणि मोहरी

0
1
  • डॉ. मनाली महेश पवार

मसाल्याच्या पदार्थांचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीदेखील केला जातो. भारतात मसाल्यांचा वापर प्राचीन काळापासून अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे हे घरी सहज उपलब्ध असतात आणि काही आजारांवर कमी वेळात नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. या भागात आपण हळद आणि मोहरीविषयी जाणून घेऊ…

तुम्ही दररोज जेवणात वापरत असलेले मसाले तुम्हाला कितीतरी आरोग्यदायी फायदे देतात. जगभरात सर्वत्र स्वयंपाकात मसाल्यांचा वापर केला जातो, कारण मसाले अन्नाला चव देतात, याशिवाय कोणताही पदार्थ अपूर्णच आहे. पण त्यांचा वापर केवळ चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीदेखील केला जातो. भारतात हळद, काळी मिरी, लवंग, आले, दालचिनी इत्यादी मसाल्यांचा वापर प्राचीन काळापासून अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे हे घरी सहज उपलब्ध असतात आणि काही आजारांवर कमी वेळात नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. आज आपण हळद आणि मोहरीविषयी जाणून घेऊ.

हळद
प्रथमोपचार द्रव्य म्हटलं की पहिली हळद डोळ्यासमोर येते. जखम, रक्त पाहिले की हळदीच्या डब्याकडे हात जातो हे आपण सर्वच जाणतो. हळदीचे महत्त्व एवढे आहे की आपल्या मराठी समाजात विवाह संस्कार करण्याअगोदर वर वधूला हळद लावून स्नान घालण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.
हळदीचे झाड लहानसर, नाजूक व वर्षायू असते. हळदीच्या पानाला एक खमंग वास असतो. हळदीचे कंद काही काळाने खराब होते म्हणून ते उकडून त्याचे हळकुंड बनविण्याची पद्धत आहे. अशी हळकुंडे रोजच्या स्वयंपाकात जरी आवर्जून वापरली जात असली तरी त्याच्यातील औषधी गुण खूप कमी झालेले असतात. हळदीत तेल 1 टक्का, थोडी राळ व पीठ असते.
ओली हळद चवीने तिखट, उष्ण, दीपन, कफनाशक, शोथ कमी करणारी, वायुनाशक, त्वचेवर काम करणारी, जखम स्वच्छ करणारी, जखम भरून आणणारी व स्तन्यशोधक असते.
ज्यांना आपली कांती सतेज हवी त्यांनी ओल्या हळदीचा वापर करावा. पण उष्ण प्रकृती असल्यास हळदीचा उपयोग करू नये. ताज्या व ओल्या हळदीचे लोणचेही खूप छान होते, जे तोंडाला रूची आणते.
सर्दी, पडसे, खोकला, दमा या विकारांवर हळद हे पथ्यकर औषध आहे. त्यासाठी पुदिना, आले, लसूण व ओल्या हळदीची चटणी खावी.

  • नाकातून शेंबूड, घशातून खाकरा, श्वसननलिकेतून कफ, प्रमेह या विकारांत हळद, हळदीचा रस वापरल्यास अपेक्षित रुक्षता येते. कफ कमी होतो.
  • खूप वाहणाऱ्या सर्दीमध्ये हळदीची धुरी देण्याचा प्रघात ग्रामीण भागात आहे.
  • हळद दुधात उकडून गुळाबरोबर घेतल्यास सायनुसायटिससारख्या विकारात नाकातील कफाचे विघटन होऊन डोक्याचा जडपणा उतरतो.
  • हट्टी खोकल्यात हळकुंड भाजून मधातून चाटण द्यावे.
  • कफामुळे छातीत खूप घुसमट वाटत असल्यास दुधात हळद उकडून त्यात थोडेसे मध टाकून प्यावे.
  • हरिद्रमेह या विकारात लघवी खूप गढूळ होते, थोडी होते, वारंवार होते, त्यावेळी हळद व आवळकाठी यांचा काढा घ्यावा.
  • स्त्रियांच्या प्रदर विकारात ओल्या हळदीचा वापर करावा.
  • सर्दीमध्ये अंगदुखी, डोकेदुखी असता हळद चूर्ण पोटात घ्यावे व लेपही करावा.
  • सुजलेल्या कफप्रधान मूळव्याधीमध्ये हळदीचा दाट लेप मोडावर लावावा.
  • उन्मादात रुग्ण आक्रमक झाल्यास रुग्णाला हळदीची धुरी द्यावी.
  • जुलाब, अतिसार, आव पडणे या विकारात हळद उपयोगी आहे.
  • चक्कर येत असल्यास कपाळावर हळदीचा लेप लावावा.
  • त्वचाविकारात हळद, तूप, लोणी एकत्र करून त्वचेवर लावावे. याने त्वचा नितळ होते.
  • मार, ठेच वगैरे अपघातात रक्त वाहत असल्यास हळदचूर्ण दाबावे.
  • हळद, मीठ, थोडेसे मोहरीचे तेल एकत्र करून दात घासल्यास पायरिया, मुखदुर्गंधीमध्ये लाभ मिळतो.
  • एक चमचा हळदीचे चूर्ण एक ग्लास कोमट दुधातून नेहमी घेतल्यास व्याधी प्रतिकारशक्ती वाढते.
  • अर्धा चमचा हळदीचे चूर्ण थोडेसे तव्यावर भाजून मधाबरोबर चाटल्यास खोकला थांबतो, बसलेला आवाज सुटतो.
  • पाय मुरगळल्यास मोठी जाड भाकरी करून त्यावर हळद व मोहरीचे तेल लावून, भाकरी गरम असता सुजेवर लावल्यास सूज व वेदना कमी होतात.
  • चेहऱ्यावर डाग, फोड असल्यास हळद, चंदन व निंब एकत्र करून लावावे.
  • पायांचे तळवे जळजळत असल्यास हळदीची पेस्ट करून तळव्यांना लावावी.
  • कॅन्सर रोगात अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा मिरीपूड कोमट पाण्यातून सकाळी उपाशीपोटी रोज सेवन करावी.
  • ‘पी हळद आणि हो गोरी’ हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणजे हळद ही वर्णसुधारक आहे.

मोहरी
फोडणी म्हटली की ती मोहरीचीच. खूप जास्त तिखट चव व उग्र वास असूनही मोहरीला स्वयंपाकघरात एक अढळ स्थान आहे. मोहरीचे तेल रोजच्या स्वयंपाकाखेरीज औषधासाठीही आवर्जून वापरतात. गुजराती लोकांमध्ये नेहमीच्या जेवणात खासकरून सरसो की सब्जी अशा पालेभाजीला खूप महत्त्व आहे. जैन लोकांमध्ये मोहरीच्या पालेभाजीला अग्रक्रमांक आहे.

  • मोहरीचे तेल अनुलोमिक, वातहर आणि केश्य आहे.
  • मोहरीच्या पानांच्या भाजीने शौचास साफ होते.
  • खूप क्रॉनिक गुडघेदुखीमध्ये मोहऱ्या वाटून त्याचा दाट लेप गुडघ्यावर लावावा व सभोवती तूप लावावे.
  • मोहरी छान बारीक वाटून सूज आलेल्या स्थानी लावावी, वरून पट्टी बांधावी.
  • डोकेदुखीमध्ये कपाळावर लेप लावला असता आराम मिळतो.
  • त्वचा रोगात मोहरीचे चूर्ण व्हिनेगरमध्ये मिसळून लेप लावल्यास खाज, डाग कमी होतात.
  • मोहरी ओमेगा फॅटी ऍसिडचे उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात ॲन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म आहे. आवश्यकतेपेक्षा जास्त सेवन केल्यास हानिकारक ठरते.
  • मोहरीच्या तेलात आढळणारे इरुसिक सिड फुफ्फुसांना नुकसान पोहोचवते. मोहरी वरच्या श्वसनप्रणालीवर परिणाम करते, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार मोहरीच्या तेलाचे दीर्घकाळ सेवन फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या सततच्या जोखमीशी संबंधित आहे. आयुर्वेदानुसार मोहरी उष्ण, तीक्ष्ण, अग्निदीपक (भूक वाढवणारी), पित्तकारक, वायू आणि कफनाशक आहे, जी पचन सुधारते, वेदना कमी करते, रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. परंतु पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी उन्हाळ्यात जपून वापरावी. मोहरीमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, सेलेनियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, बी व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे ती विविध आरोग्य समस्यांवर फायदेशीर ठरते.

मोहरीचे आयुर्वेदिक फायदे

  • पचनसंस्था : मोहरी गॅस्ट्रिक ज्यूस वाढवून भूक आणि पचन सुधारते, अपचन दूर करते.
  • वेदना आणि सूज : मोहरीचे तेल सांधेदुखी, कानातील वेदना आणि शरीरातील इतर वेदना कमी करण्यास मदत करते.
  • रोगप्रतिकारशक्ती : झिंक आणि इतर खनिजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि संसर्गाशी लढण्यास मदत करतात.
  • हृदय आणि कोलेस्ट्रॉल : ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
  • हृदय आणि कोलेस्ट्रॉल : ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.
  • कफ आणि वायू : मोहरी कफ आणि वायू दोषांचा नाश करते, म्हणून हिवाळ्यात आणि थंडीच्या दिवसात अधिक फायदेशीर आहे.
  • अँटी-बॅक्टेरियल : यात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत.

वापर आणि खबरदारी

  • वापर : फोडणीसाठी मोहरीच्या तेलाचा वापर स्वयंपाकात आणि मोहरीच्या पाण्याचा उपयोग आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो.
  • पित्त प्रकृती : मोहरी उष्ण असल्यामुळे उन्हाळ्यात पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनी तिचा वापर जपून करावा.
  • ॲलर्जी : काही लोकांना मोहरीची ॲलर्जी असू शकते, ज्यामुळे पित्त, खाज किंवा श्वास लागणे अशी लक्षणे दिसू शकतात, अशावेळी वापर टाळावा.