Home आयुष स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्येकांदा आणि लसूण

स्वयंपाकघरातील प्रथमोपचार द्रव्येकांदा आणि लसूण

0
  • डॉ. मनाली महेश पवार

आयुर्वेदात स्वयंपाकघर हे केवळ तयारीचे ठिकाण नाही तर परिवर्तनाचे एक पवित्र ठिकाण आहे. मसाले आणि पाककृतींच्या पलीकडे, तुम्ही ज्या साधनांनी स्वयंपाक करता तेच तुमच्या शरीरावर, मनावर आणि उर्जेवर प्रभाव पाडण्याची शक्ती ठेवते.

आयुर्वेदात स्वयंपाकघर हे केवळ तयारीचे ठिकाण नाही तर परिवर्तनाचे एक पवित्र ठिकाण आहे. मसाले आणि पाककृतींच्या पलीकडे, तुम्ही ज्या साधनांनी स्वयंपाक करता तेच तुमच्या शरीरावर, मनावर आणि उर्जेवर प्रभाव पाडण्याची शक्ती ठेवते. भांड्यांची जाणीवपूर्वक निवड ही स्वतःची काळजी घेण्याची कृती बनते- चव वाढवणे, दोषांचे सुसंवाद साधणे आणि ओजसाचे पालनपोषण करणे. ही उपचारात्मक स्वयंपाकाची कला आहे, जिथे हेतू परंपरांना भेटतो आणि प्रत्येक जेवण निरोगीपणाचा विधी बनते.

कांदा
भारतीय जेवणात कांदा हा हवाच. जैन, लिंगायत समाजांत मात्र कांदा वर्जीला जातो. परंतु कांदा हा सर्वांच्याच परिचयचा आहे. तीन प्रकारचे कांदे असतात. लाल सालीचा तिखट जून कांदा, पांढरा कांदा, सांभाराकरिता वापरला जाणारा किंचित गोड व सौम्य गुणाचा पांढरा कांदा.

  • कांद्याला एक प्रकारचा तिखट उग्र वास येतो. म्हणून एखाद्याला चक्कर आल्यास चटकन कांदा फोडून हुंगायला देतात.
  • कांदा उष्ण, लघु, कटू, उत्तेजक, अनुलोमिक, कफनाशक व मूत्रजनन आहे.
  • कांदा खात्रीने कफ पडणारा आहे. याने कफ पातळ होतो, घुसमट कमी होते व नवीन कफ होण्याचे प्रमाण कमी होते. ही क्रिया कांद्यातील तेल फुफ्फुसावाटे बाहेर पडताना घडते. त्वचेतून तेल बाहेर पडताना त्वचेची विनिमय क्रिया सुधारते.
    कांदा हे एक उत्कृष्ट औषध आहे. हे कफ, वात व पित्त या तिन्ही दोषांत वापरता येते. वात कमी होतो, पित्त पडते व कफाचा नाश होतो. लहान मुलांचा, वृद्धांचा कफ पातळ होऊन पडतो, घुसमट कमी होते. लहान मुलास कच्च्या कांद्याचा रस साखर घालून देतात. वृद्धांना कांदे शिजवून देतात. कफ रोगात व दम्यातदेखील कांद्याचा फायदा होतो. क्षयरोगातील कफ याने कमी होतो. आतड्यांची चलनवलन शक्ती वाढवून शौचास होण्यास अर्श रोगात व काविळीत कांदा देतात. पित्त विकारात दूषित पित्त कांद्याने शौचाबाहेर पडून जाते व नवीन शुद्ध पित्त उत्पन्न होते.
  • विविध तापांच्या साथीच्या आजारात कांदा ठेचून वा वाटून त्याचा रस काढला जातो व हात, पाय, खांदा यांना चोळल्यास बहुदा उतार पडतो.
  • वात, कफप्रधान मूळव्याध व विविध प्रकारच्या गळवांवर कांद्याचा वाटून लेप तयार करावा व लावावा.
  • कांद्याच्या काढ्याने लहान मुलांना छान झोप येते.
  • शीघ्र स्खलन व लैंगिक कमजोरीमध्ये साध्या कांद्याचा उपाय करावा. त्याकरिता रोज एक मोठा कांदा स्वच्छ चांगल्या सुईने सर्वत्र खोलवर टोचावा व कपभर चांगल्या दर्जाच्या मधात बुडवून ठेवावा. असे लागोपाठ सात दिवस करावे. आठवड्यानंतर सकाळी सकाळी पहिल्या दिवशी मधात भिजवलेला कांदा खावा व वर कोमट पाणी घ्यावे. असे लागोपाठ किमान सात दिवस किंवा दोन आठवडे करावे. पुरुषाला अपेक्षित ताकद मिळते.
  • कान दुखत असेल तर कांद्याचा रस काढून 4-4 थेंब कानात टाकावे.
  • 6-8 छोटे कांदे पोटली करून घराबाहेर टांगावे, म्हणजे हवेतील बॅक्टेरिया, व्हायरसपासून बचाव होतो.

लसूण
सर्वांच्या स्वयंपाकघरात ही लसूण विराजमान असते. पण ‘उपवासाला नाही हो चालत लसूण’ असे कमी-अधिक सगळ्या समाजात बोलले जाते. जैन समाज व उपवासपाण्याचे पथ्य पाळणारे आहारात लसणीचा वापर करत नाहीत.

  • विविध प्रकारच्या दीपन, वातशामक गुणामुळे लसणीचा वापर सहाय्यक मसाला पदार्थ म्हणून स्वयंपाकात केला जातो.
  • एक कळी लसूण नावाचे कोवळ्या कांद्याप्रमाणे दिसणारे कंद काश्मीर व हिमाचल पठारावर होते.
  • लसणीच्या पानांची भाजी व कंद औषधात वापरतात. लसणीमध्ये उडणारे तेल आहे. लसणीला संस्कृतमध्ये ‘रसोन’ म्हणतात. त्यात अम्लरस वगळता मधुर, लवण, तिक्त, कटू व तुरट असे पाच रस आहेत.
  • लसूण उष्ण, दीपन, वायुनाशी, कृमिघ्न, मूत्रजनन, बल्य आहे. याने श्वसननलिकेतील कफ ढिला होतो व तो पडण्यास सोपे जाते. कफाची दुर्गंधी कमी होते व रोगजंतूंचा नाश होतो.
  • मज्जातंतूवर लसणीची उत्तेजक क्रिया घडते. मोठ्या मात्रेत घेतल्यास उलट्या व जुलाब होतात.
  • समस्त वातविकारांत लसणाचे मोठे योगदान आहे. जेवणात चटणी, भाजी, आमटी अशा पदार्थांत लसूण वापरल्याने अन्नाचे पचन सुलभ होते. पोटात वायू धरत नाही.
  • सर्व प्रकारच्या वातविकारांत लसणीचा वापर केल्यास वाताला लगेच लगाम बसतो.
  • पाठदुखी, अर्धांगवात, सायटिका या विकारांत लसूण वावडिंगसिद्ध दूध द्यावे.
  • पांढरी आव व जंत यांचा दीर्घकाळ त्रास असल्यास लसणीचा युक्तीने वापर करावा.
  • पोटात जेवल्यावर वायू धरत असेल तर लसणीचा रस घ्यावा.
  • आमवात, संधिवातमध्ये लसूण पोटातून घ्यावी व लेपही लावावा.
  • सुक्या खोकल्यात लसूण, आले, पुदिना, तुळशीची पाने अशी चटणी न कंटाळता घ्यावी.
  • चिघळणारी जखम, केसतूद अशा रोगात लसणीचा लेप लावल्यास रोग वाढत नाही.
  • कानदुखीकरिता लसणीचे तेल कानात घालतात.
  • लसणाचे तुकडे करून पाण्यात रात्री भिजत घालावे व सकाळी उपाशीपोटी खावे. याने कोलेस्टेरॉल, हृदयरोग, संधिवात यांत लाभ होतो.
  • 50 ग्र्रॅम लसूण 100 मिली तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलात शिजवून, ते तेल बाटलीत भरून ठेवावे. सूज किंवा वेदना असता त्या तेलाने मालिश करावे, आराम मिळतो.
  • प्राणवायू कमी वाटत असल्यास गळ्यात लसूण बांधावा.
  • एक ते दोन लसणाच्या पाकळ्या मधाबरोबर सेवन केल्याने शुक्राणू वाढतात.
  • दोन-तीन लसणाच्या पाकळ्या त्यात सैंधव घालून गुळण्या कराव्या, कृमी-दंतामध्ये लाभ होतो.
  • पाच-सहा लसणाच्या पाकळ्या उगाळून एक ग्लास दुधातून सकाळी उपाशीपोटी घ्याव्या. याने पार्किसन रोगात लाभ होतो.
  • ज्यांना निरोगी, शतायुषी असे जीवन जगायचे आहे, त्यांनी आयुष्यभर लसणीची संगत अवश्य करावी. उष्ण प्रकृती असलेल्यांनी जपून लसणीचे सेवन करावे.