स्पोर्टिंग क्लब दी गोवाची मुंबई एफसीवर मात

0
78

>>फेडरेशन चषक फुटबॉल

सुमीत पास्सीने सामन्याच्या अंतिम क्षणात नोंदविलेल्या गोलाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लब दी गोवाने कूपरेज मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात मुंबई एफसी संघावर १-० अशी मात करीत फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या लेगमध्ये शानदार विजयाची नोेंद केली.
पास्सीने ८९व्या मिनिटाला डाईव्ह मारत हेडरद्वारे हा स्पोर्टिंगला पूर्ण गुण मिळवून देणारा सामन्यातील एकमेव गोल नोंदविला. दोन्ही संघात आता सेकंड लेगमधील सामना गोव्यात ४ मे रोजी होणार आहे.
सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला होता. परंतु दोघांनाही जाळीचा वेध घेता आला नाही. सामन्याच्या पाचव्याच मिनिटाला स्पोर्टिंगला गोलसंधी चालून आली होती. परंतु डेंझिल थिओबाल्डने घेतलेल्या हेडरवरील चेंडू थोडक्यात गोलपोस्टवरून बाहेर गेला. १०व्या मिनिटाला प्रथेश शिरोडकरच्या क्रॉसवर निकोलस फर्नांडिस संधी गमावली. २०व्या मिनिटाला एरिक ब्राउनने डी कक्षेत दिलेल्या पासवर सुशील कुमार चेंडूपर्यंत पोहचू शकला नाही. दुसर्‍या सत्राच्या प्रारंभीच डेंझिल थीओबाल्डने घेतलेल्या फ्री-कीकवरील चेंडू थोडक्यात गोलपोस्टवरून बाहेर गेला. ५४व्या मिनिटाला जयेश राणेने स्पोर्टिंगचा गोलरक्षक अरिंदमला चकविण्यात यश मिळविले होते. परंतु रेफ्रीने त्याला ऑफसाईड देत गोल बाद ठरविला. ७७व्या मिनिटाला क्लिफर्ड मिरांडाकडून मिळालेल्या पासवर सुशील कुमारने घेतलेला फटका स्पोर्टिगचा गोलरक्षक अरिंदमने सुरेखपणे थोपवित संघावरील संकट टाळले. स्पोर्टिंगचा विजयी गोल ८९व्या मिनिटाला नोंदविला गेला. व्हिक्टोरिनो फर्नांडिसकडून मिळालेल्या क्रॉसवर सुमित पास्सीने चपळगतीने डाईव्ह मारत हेडरद्वारे हा संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल
नोंदविला.