पंजाबचा गुजरात लायन्सवर विजय

0
80

>>अक्षर पटेलची यंदाच्या आयपीएलमधील पहिली हॅट्‌ट्रिक

डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटलेने हॅट्‌ट्रिकसह घेतलेले ४ बळी आणि मोहित शर्माने त्याला दिलेल्या चांगल्या साथीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने गुजरात लायन्सचा २३ धावांनी पराभव करीत आकर्षक विजयाची नोंद केली. अक्षर पटेलने नोंदविलेली हॅट्‌ट्रिक ही यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या हॅट्‌ट्रिक ठरली.
किंग्ज इलेव्हन पंजाबकडून मिळालेल्या १५५ धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात लायन्स संघाला ९ गड्यांच्या मोबदल्यात १३१ धावांपर्यंत मजल मारता आली. अक्षर पटेल आणि मोहित शर्मा यांनी दिलेल्या झटक्यांमुळे त्याला विजयासाठी २२ धावा कमी पडल्या. जेम्स फॉल्करने सर्वाधिक ३२ धावांचे योगदान दिले. धावचित झालेल्या ईशान किशनने २७, कर्णधार सुरेश रैनाने १८, ड्‌वेन स्मिथ व प्रवीण कुमारने सिंगने प्रत्येकी १५ तर रवींद्र जडेजाने ११ धावा जोडल्या. इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. पंजाबतर्फे भेदक गोलंदाजी करताना अक्षर पटेलने २१ धावांत ४ तर मोहित शर्माने ३२ धावांत ३ बळी मिळविले.
तत्पूर्वी गुजरात लायन्सकडून प्रथम फलंदाजी निमंत्रण मिळाल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघाने सर्व गड्यांच्या मोबदल्यात १५४ अशी धावसंख्या उभारली. मुरली विजय आणि मार्कुस स्टॉइनिस यांनी पहिल्या विकेटसाठी ६.४ षट्‌कांतच ६५ धावांची सलामी देत पंजाबला दमदार सुरुवात करून दिली होती.
रवींद्र जडेजाने ही जोडी फोडताना मार्कुस स्टॉइनिसला (२७) बाद करीत गुजरातला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर शिविल कौशिकने शॉन मार्श (१) व ग्लेन मॅक्सवेल (०) यांना झटपट तंबूचा रस्ता दाखवित पंजाबच्या धावगतीला खिळ घातली. गुरकीरत सिंग मानही जास्त वेळ खेळपट्टीवर स्थिरावू शकला नाही व खाते खोल्यापूर्वीच जेम्स फॉल्कनरच्या चेंडूवर तंबूत परतला. ६ चौकारांसह ४१ चेंडूत ५५ धावांचे अर्धशतकी योगदान दिलेल्या मुरली विजयला शिविल कौशिकने ब्रावोकरवी झेलबाद केेले. त्यानंतर डेव्हिड मिलर (३१) व वृद्धिमान साहा (३३) यांनी संयमी फटकेबाजी गुजरात समोर १५५ असे लक्ष्य उभे केले. इतर फलंदाज अपयशी ठरले. गुजराततर्फे शिविल कौशिक सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २० धावांत ३ तर प्रवीण कुमार सिंग आणि ड्‌वेन ब्रावो यांनी प्रत्येकी २ गडी बाद
केले.