कुडचडेतील कथित वासनाकांड प्रकरण; आतापर्यंत 4 गुन्हे दाखल; आणखी प्रकरणे समोर येणार
कुडचडेतील कथित वासनाकांडातील संशयित आरोपी सोहम नाईक याच्या पोलीस कोठडीत पणजी येथील बाल न्यायालयाने काल आणखी चार दिवसांनी वाढ केली. सोहम नाईक यांच्याविरोधात आत्तापर्यंत चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कुडचडेतील कथित वासनाकांडातील संशयित आरोपी सोहम नाईक याचा चार दिवसांचा पोलीस कोठडीतील रिमांड पूर्ण झाल्याने त्याला येथील बाल न्यायालयासमोर हजर काल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी त्याला आणखीन 7 दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे केली. त्यानंतर न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी 4 दिवसांनी वाढ करण्याचा निर्णय दिला.
गुन्हा अन्वेषण विभागाकडून कथित वासनाकांड प्रकरणामध्ये सखोल चौकशी केली जात आहे. पोलिसांनी सोहम नाईक यांच्या घरातून आक्षेपार्ह साहित्य हस्तगत केले आहे. या वासनाकांड प्रकरणामध्ये किमान 20 पीडित असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून तपासकाम केले जात आहे.
सोहम नाईक याने आपल्या मित्रांना एका सार्वजनिक कार्यक्रमात पीडितांची छायाचित्रे व व्हिडिओ दाखविल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
प्रकरण दडपण्याचा प्रयत्न : आप
कुडचडे येथील कथित वासनाकांड प्रकरणात भाजपच्या एका नगरसेवकाचा मुलगा गुंतलेला असल्याने हे प्रकरण दडपून टाकण्यासाठी दबाव आणला जात आहे, असा गंभीर आरोप आपचे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी येथील पोलीस मुख्यालयाच्याबाहेर घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत काल केला.
राज्यपालांना निवेदन देणार : वाल्मिकी नाईक
कथित वासनाकांड प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून हा विषय संसदेत मांडण्यात येणार आहे. या प्रकरणात राज्यपालांना निवेदन सादर केले जाणार आहे. या वासनाकांड प्रकरणाची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी, अशी मागणी वाल्मिकी नाईक यांनी केली.
उपमहानिरीक्षकांना निवेदन सादर
आपच्या एका शिष्टमंडळाने पोलीस उपमहानिरीक्षक वर्षा शर्मा यांची भेट घेऊन यासंबंधीचे एक निवेदन काल सादर केले. तत्पूर्वी, आपच्या शिष्टमंडळाला पोलीस मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर रोखण्यात आले. त्यानंतर आपच्या एका शिष्टमंडळाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला भेटण्याची परवानगी देण्यात आली.