सोन्याच्या पिंपळाची सळसळ

0
146
  • प्रा. अनिल सामंत

मयेकरसर आम्हा सर्वांसाठी खरोखरच ‘सोन्याचा पिंपळ’ होते. हा पिंपळ रुजला मुंबईतील गुळाच्या चाळीमधील कामगार वस्तीत; पण त्याच्या शाखा मात्र विस्तारल्या गोमंतकाच्या निसर्गरम्य भूमीत. या पिंपळाने आम्हा सर्वांना प्रेमाची सावली तर दिलीच, पण आपल्या सळसळत्या पानांतून जीवनातील विविध अंगांना व्यापून टाकणारा ज्ञानाचा सोनेरी प्रकाशही दिला.

दोन दिवसांपूर्वी रात्री नऊच्या सुमारास माझा फोन वाजला. फोनवर कापरा आवाज ऐकू आला- ‘मी मीरा मयेकर. गोपाळराव मयेकरांची सून… मयेकरसर… आत्ताच गेले… हॉस्पिटलमध्ये होते.’ अचानक आभाळात ढग फुटावा आणि वीज कोसळावी… तसा मनावर खोल आघात झाल्यासारखे वाटले… क्षणभर मी सुन्न झालो… रात्री अंथरुणात पडल्यावर मयेकरसरांच्या सहवासातील अनेक प्रसंग डोळ्यांसमोर फिरत राहिले.

२००९ सालचा तो प्रसंग. सरांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त गौरवग्रंथ काढण्याची कल्पना म्हापशातील बांदेकर महाविद्यालयातील त्यांचे सहकारी विजयराव आपटे यांनी मांडली होती. आम्ही सर्व मित्रांनी ती उचलून धरली… संपादक मंडळ ठरले… आणि काम सुरू झाले. मुख्य संपादक परेश प्रभू यांनी अतिशय समर्पक असे या ग्रंथाचे संपादन केले. चित्रकार प्राचार्य महेश वेंगुर्लेकर यांनी ग्रंथाला अतिशय देखणे रूप दिले. ग्रंथ तयार होत असतानाच ग्रंथाचे नाव काय असावे हे ठरविण्यासाठी मयेकरसरांच्या घरी संपादक मंडळाची बैठक चालू असताना सुरुवातीला ‘ज्ञानव्रती’ हे नाव पुढे आले… चर्चा चालू असताना मी मयेकरसरांचा चेहरा न्याहाळत होतो. त्यांना थोडं टक लावून पाहताना मला ज्ञानदेवांचे स्मरण झाले… ज्ञानदेवांना दिसलेला सोन्याचा पिंपळ डोळ्यांसमोर उभा राहिला. जणू ज्ञानदेवांनीच खूण केली होती. माझ्या तोंडून ‘सोन्याचा पिंपळ’ हे नाव आले. ते सर्वांनाच आवडले. कला अकादमीच्या कृष्णकक्षात या सद्भाव ग्रंथाचा दृष्ट लागावी अशा सुंदर पद्धतीने प्रकाशन सोहळा संपन्न झाला.

मयेकरसर आम्हा सर्वांसाठी खरोखरच ‘सोन्याचा पिंपळ’ होते. हा पिंपळ रुजला मुंबईतील गुळाच्या चाळीमधील कामगार वस्तीत; पण त्याच्या शाखा मात्र विस्तारल्या गोमंतकाच्या निसर्गरम्य भूमीत. या पिंपळाने आम्हा सर्वांना प्रेमाची सावली तर दिलीच, पण आपल्या सळसळत्या पानांतून जीवनातील विविध अंगांना व्यापून टाकणारा ज्ञानाचा सोनेरी प्रकाशही दिला.

मयेकरसरांचा जन्म १९३४ साली मुंबईतील करीरोडवरील गुळवाल्याच्या चाळीत दुसर्‍या मजल्यावरच्या सत्त्याहत्तर नंबरच्या दहा बाय दहाच्या कोंदट नि काळोख्या खोलीत झाला. बारशाच्या वेळी त्यांचे नाव ‘विष्णू’ असे ठेवले होते, पण तेव्हा रडून रडून बाळाने आकांत केल्याने नाव बदलून ‘गोपाळ’ हे आजोबांचे ठेवले. योगायोग म्हणजे याच गोपाळाने मोठा झाल्यावर द्वापर युगातील ‘गोपाळा’प्रमाणे राजकारण, तत्त्वज्ञान, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रात स्वतःची सोनेरी नाममुद्रा कोरली. गुळवाल्या चाळीचे चित्र रेखाटताना सर लिहितात- ‘करीरोड स्टेशनच्या पडक्या भिंतीपासून चाळीकडे येणारा आमचा रस्ता म्हणजे वस्तीतील लहान मुलांसाठी सार्वजनिक संडासच झाला होता. या नरकपुरीतून चाळीकडे येताना आपल्याला नाक आहे याचाच पश्‍चात्ताप होत असे. यमपुरीतील चित्रात दाखवलेली पापी लोकांच्या नरकयातनांची कल्पना येण्यासाठी या वस्तीतील गरीब नागरिकांना प्रत्यक्ष मरण्याची गरजच उरली नव्हती.’ …पण परिसर जरी ओंगळवाणा असला तरी तिथे राहणारी कामगार वस्तीतील माणसे गुण्यागोविंदाने सर्व व्यवहार करीत. गणेशचतुर्थी, तुळशीचे लग्न यांसारखे उत्सव सर्वांनी मिळून-मिसळून एकोप्याने साजरे करणे ही या चाळीची विशेष श्रीमंती होती. उत्सवातील मेळे, नाटके, गाणी, निबंध, वक्तृत्व स्पर्धा… या सर्वांतून छोट्या गोपाळच्या व्यक्तिमत्त्वाला सांस्कृतिक कलागुणांचे संस्कार लाभले. कामगार वस्तीतील भजनी मंडळाच्या अभंगातूनच बालपणी त्यांच्या ओंजळीत संतवाणीचे पाणी पडले… गुळवाला चाळीतील दारिद्य्र आणि ओंगळवाण्या परिसराला सरांनी नावे ठेवली नाहीत. उलट या शापाला त्यांनी वरदानच मानले. सरांचे याविषयीचे चिंतन आपणा सर्वांनाच नवी दृष्टी देणारे आहे. सर म्हणतात, ‘भोवतीच्या परिसराच्या दारिद्य्राने खचून जाण्यापेक्षा त्या प्रतिकूल परिस्थितीचा आपल्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी लाभ करून घेण्याने दारिद्य्राचे श्रीमंत देणे आपण मिळवू शकतो व हेच दारिद्य्र आपले आत्मिक वैभव अधिकाधिक खुलवू शकते; आपल्या क्षमता फुलवू शकते. दारिद्य्रात ‘व्यथा’ असते मोठी या ओळीचे रूपांतर मी दारिद्य्रात ‘मजा’ असते मोठी असे सकारात्म करू शकलो.’ गुळवाला चाळीने दिलेल्या दृष्टिकोनानेच सरांना आयुष्यभर सोबत केली.

मुंबईतील डॉ. शिरोडकर हायस्कूलने मयेकरसरांच्या व्यक्तिमत्त्वाला खर्‍या अर्थाने सुंदर आकार दिला. कला, क्रीडा, साहित्य, संघटन, आयोजन या क्षेत्रांतील विविध कौशल्ये त्यांनी याच शाळेत आत्मसात केली. शाळेचे नेतृत्व करणारे एच.डी. म्हणजेच हरी धर्माजी गावकर यांनी त्यांना पुत्रवत प्रेम दिले. सर्व उपभोगांचा त्याग करून कामगार वस्तीतील मुलांसाठी सर्वस्व पणाला लावणार्‍या एच.डी. सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा अतिशय खोल असा ठसा मयेकरकरांवर पडल्यामुळेच पुढील आयुष्यात शिक्षणक्षेत्रात काम करताना ते विद्यार्थी आणि तरुण शिक्षकांना नव्याने घडवू शकले.
एलफिस्टन कॉलेजमधील बी.ए. आणि त्यानंतर एम.ए.ची परीक्षा देत असताना, एच.डी. सरांच्या पाठिंब्यामुळे सर डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत राहू शकले. १४ एप्रिल १९६२ रोजी म्हापसा येथील शालिनी नाईक यांच्याशी विवाह झाल्यानंतर सरांच्या जीवनप्रवासाला एक नवे वळण मिळाले. पणजी येथील धेंपो कॉलेजमध्ये मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांची नवी शैक्षणिक कारकीर्द सुरू झाली. धेंपो कॉलेजमध्ये एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच मयेकरसर अचानक राजकारणात ढकलले गेले… ते शिक्षणमंत्री झाले… पुढे लोकसभेत खासदार झाले. राजकारणाने त्यांना समाधान कमी आणि यातना जास्त दिल्या. तत्त्वज्ञान आणि साहित्याचा पिंड लाभलेले मयेकरसर राजकारणात फार काळ टिकले नाहीत हे त्यांच्यासाठी आणि गोव्यासाठी वरदानच ठरले, असे म्हटले पाहिजे.

मयेकरसरांचा प्राचार्य म्हणून देवगड येथील वास्तव्यकाल हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंददायी काळ होता. देवगड महाविद्यालय हा त्यांच्या जीवीचा जिव्हाळा होता. विद्यार्थी आणि शिक्षक यांना सोबत घेऊन त्यांनी एक नवी सांस्कृतिक आणि शैक्षणिक चळवळ येथे उभी केली. विविध प्रयोग आणि नवीन उपक्रमांतून देवगडच्या ग्रामीण परिसरात त्यांनी नवे चैतन्य निर्माण केले. सर देवगड सोडून जाताना त्यांच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केेलेली मनोगते म्हणजे त्यांना मिळालेल्या यशाची खरी प्रमाणपत्रे आहेत. ‘आज रडण्याचा दिवस आहे. विद्यार्थी कॉलेजमधून गेला तरी त्याच्या कलागुणांची जपणूक करून विकास घडवून आणणारा शिक्षक आज देवगड सोडून जात आहे’ हे प्रमोद नलावडे या विद्यार्थ्याचे मनोगत किंवा ‘अडचणीवर मात करण्याचे शिक्षण देणारी शक्ती म्हणजे मयेकर. हे प्रा. गोलतकर यांचे उद्गार यादृष्टीने बोलके आहे.

तत्त्वचिंतन हा मयेकरसरांचा खरा श्‍वास होता. ज्ञानेश्‍वरी हा त्यांच्या अखंड अभ्यासाचा आणि चिंतनाचा ग्रंथ होता. भौतिक संस्कृती माणसाला जगण्याची साधने देते, तर आध्यात्मिक संस्कृती कशासाठी जगायचे याची दृष्टी देते. म्हणून या दोन्हींचा सुरेख संगम झाला पाहिजे हा विचार ते नित्य मांडत राहिले. समाज उन्नत होण्यासाठी, भानशक्ती, भावशक्ती आणि संवेदनशक्ती यांची जोपासना सर्वांनी केली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. ज्ञानेश्‍वरीच्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी लावलेला अन्वयार्थ हा नव्या काळातील माणसाला खोलवर स्पर्श करणारा होता. कारण आध्यात्मिकतेबरोबरच सामाजिकता आणि वैज्ञानिकता यांचे त्यांना असलेले भान! ‘ज्ञानदेव संकीर्तन’ हा त्यांचा अकरा व्याख्यानांच्या संग्रहाचा ग्रंथ म्हणजे त्यांच्या तत्त्वचिंतनाचा मेरुमणी म्हणता येईल. ज्ञानेश्‍वरीच्या अभ्यासकांना आणि उपासकांना वेगळी दृष्टी देण्याचे सामर्थ्य या ग्रंथात आहे. ज्ञानेश्‍वरीतील जीवनदृष्टी, सौंदर्यदृष्टी, सत्य-शिव आणि सुंदराचे घडणारे दर्शन… या सर्वांचा अप्रतिम वेध त्यांनी या ग्रंथात घेतला आहे.

गोपाळराव मयेकर ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर अनेक माणसे आणि संस्थांना घडविणारी ती एक ऋषितुल्य शक्ती होती. स्वातंत्र्योत्तर गोमंतकातील कला आणि साहित्यक्षेत्रात वावरणार्‍या अनेक संस्था सरांच्या सहवासात मोठ्या झाल्या. अनेक वर्षे व्यापारातील नाणी मोजणार्‍या म्हापशासारख्या शहरात १९८० च्या कालखंडात ‘लोकमित्र’सारख्या संस्थेची स्थापना करून म्हापशाच्या सांस्कृतिक जीवनाला त्यांनी नवी ऊर्जा दिली. ‘लोकमित्र’ने सुरू केलेले चांदण्यारात्रीचे कोजागिरीचे उपक्रम पुढे गोमंतकातील अनेक ठिकाणी रुजले. मयेकरसरांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली फोंड्याच्या सम्राट क्लबने आयोजित केलेला ‘शारदीय चंद्रकळे’ हा मराठीतील नामवंत साहित्यिकांच्या मुलाखतीचा कार्यक्रम स्वातंत्र्योत्तर गोमंतकातील एक अभूतपूर्व साहित्यिक कार्यक्रम म्हणून स्वतःची नोंद ठेवून गेला. सरांनी आपल्या कारकिर्दीत हजारो भाषणे दिली असतील, पण सम्राट संगीत संमेलनात सुहासिनी मुळगावकरांच्या उपस्थितीत त्यांनी केलेले आभारप्रदर्शनाचे अविस्मरणीय भाषण आजही मनात ताजे आहे.
१९८६ साली स्थापन झालेल्या गोमंतक मराठी अकादमीचे पहिले अध्यक्ष म्हणून मयेकरसरांनी सूत्रे हाती घेतली आणि गोमंतकातील मराठी कार्यक्रमांना एक नवा बहर आला. ग्रामीण भागात स्थापन केलेल्या संस्कार केंद्रांच्या माध्यमातून अकादमी खर्‍या अर्थाने लोकाभिमुख बनली. सरांच्या कल्पकतेतून ‘सृजनसोहळ्या’सारखे अभिनव उपक्रम साकारू लागले. स्वातंत्र्योत्तर गोमंतकातील तरुणाईला सृजनाची नवी प्रेरणा आणि व्यासपीठ देणारी मराठी अकादमी हे साहित्य आणि कलांचे एक ऊर्जाकेंद्र बनेल.

मयेकरसर अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय उपक्रमांत रमले. पण हे सर्व करताना त्यांनी आपल्या अंतरंगातील सृजनशील भावकवीला कोमेजू दिले नाही. मध्यंतरी मी, स्व. धर्मेंद्र हिरवे, स्व. विभावरी महांबरे आणि इतर कलाकारांना घेऊन गोमंतकीय मराठी कवींच्या कवितांचा ‘शब्दस्वर’ हा सांगीतिक कार्यक्रम करायचो. मयेकरसरांच्या ‘स्वप्नमेघ’मधील अनेक कवितांनी त्यावेळी आम्हा सर्वांना वेड लावले होते. त्यांची पावसाची लावणी तर अजूनही अनेकांच्या ओठावर आहे.

शिक्षण, साहित्य, कला, तत्त्वचिंतन आणि व्याख्यानांच्या क्षेत्रात गरुडझेप घेणार्‍या मयेकरसरांना अनेक लोकपुरस्कार लाभले. पण ‘पद्मश्री’सारखा मानाचा राष्ट्रीय पुरस्कार काही मिळू शकला नाही, याचे आम्हा सर्व मराठीप्रेमींना दुःख होतेय. यासंदर्भात आपले मनोगत व्यक्त करताना मयेकरसरांनी एके ठिकाणी म्हटलंय की, ‘पद्मश्रीसाठी गोवा सरकारने माझे नाव सुचवायला मी एका विशिष्ट जातीतील नव्हतो, की कोकणीवादीही नव्हतो. शिवाय ख्रिश्‍चनही नव्हतो. या पुरस्काराने मला काही मोक्ष मिळणार नव्हता. २६ जानेवारी २०१० ला गोव्याला दोन पद्मश्री पुरस्कार मिळाले. दोन्ही ख्रिश्‍चन व्यक्तींना मिळाले. माझ्या वाट्याला अपेक्षेप्रमाणे वाटाण्याच्या अक्षता आल्या.’

आती ती वेळ निघून गेलीय. मयेकरसर आज आपल्यात नाहीत. पण मयेकरसर ग्रंथरूपाने आज आहेतच. त्यांची व्याख्याने आणि कविता यू-ट्यूब चॅनेलवर चिरंतन स्वरूपात अनुभवता याव्यात यासाठी माझा मित्र दीपक मणेरीकरने खूप परिश्रम घेऊन ‘ज्ञानदेव संकीर्तन’ हे मयेकरसरांचे चॅनेल निर्माण केले. त्यांच्या कवितांचे व विचारांचे सादरीकरण करून आजारपणात त्यांच्या मनाला थोडा आनंद देण्याचा प्रयत्न मी केला.
मला भावलेल्या मयेकरसरांना मी एका कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय.

सोन्याचा पिंपळ
पिंपळाच्या पारी वाजले पंढरीचे टाळ
वारीसाठी चालू लागला अनंत आभाळ
ज्ञानोबाचा घनु भेटला त्याने सांडले पाणी
पानोपानी ओथंबली अमृताची वाणी
पिंपळाची फांदी उन्हात दूर दूर गेली
सावलीखाली तिच्या सृजनशाळाच किलबिलली
स्वप्नांच्या मेघांतून आली कवितेची पाखरे
गात गात त्यांनी सांडले नक्षत्रांचे तुरे
पिंपळपक्षी एकदा उडून दिल्लीपार गेला
पसायदान गाऊन पुन्हा घरट्यात आला
वादळवारा पिऊन झेलत विजेचा कल्लोळ
सळसळत्या पानात, उभा सोन्याचा पिंपळ