डेंग्यूच्या साथीकडे दुर्लक्ष नको

0
145
  • डॉ. मनाली पवार

डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, साठलेले पाणी वेळच्यावेळी रिकामे करावे. संपूर्ण अंगभर कपडे घालावे.

कोरोनाची सुरुवात जशी चीनमधून झाली, तशीच डेंग्यूची सुरुवातही चीनमधूनच झाली. सध्या कोरोनाचे रुग्ण काहीसे कमी होताना दिसत आहेत. पण त्यातच डेंग्यू रुग्णांची संख्या काहीशी वाढताना दिसत आहे. पावसाळा म्हटला की चिखल, दलदल, त्यातच जीवजंतूंचा फैलाव आलाच. मग अशाच डासांच्या उद्रेकाने डेंग्यूची लागण व्हायला सुरुवात होते.
डेंग्यू हा आजार पहिल्यांदा चीनमधील जीन या राजवंशात आढळून आला. इतिहासात १७ व्या शतकात डेंग्यूची भीषण साथ आल्याचे पुरावे आहेत. १९०६ मध्ये हा आजार एडीस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे प्रसारित होतो, हे सिद्ध झाले. हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. संक्रमणात्मक डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला हा रोग होतो. ह्या रोगाचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार असून, त्यामुळे मृत्यू ओढवू शकतो.

१. डेंग्यू ताप लक्षणे
लहान मुलांमध्ये मुख्यतः सौम्य स्वरूपाचा ताप येतो. मोठ्या माणसांमध्ये अधिक तीव्रतेचा ताप येतो. सोबत डोके-डोळे सुजणे, अंगदुखी, अशक्तपणा, अंगावर लाल रंगाचा चट्टा येऊ शकतो.

  • अंगदुखी तीव्र स्वरुपाची असू शकते म्हणून याला हाडे मोडणारा ताप असेही म्हणतात.
  • एकदम जोराचा ताप चढणे.
  • डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे.
  • डोळ्यांच्या मागील भागात वेदना, जी डोळ्याच्या हालचालीसोबत अधिक होते.
  • चव व भूक नष्ट होते.
  • छाती व वरील अवयवांवर गोवरासारखे पुरळ येते.
  • मळमळते, काहींना उलट्या होतात.
  • त्वचेवर व्रण उठतात.

२. डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप
हा गंभीर स्वरूपाचा प्रकार असून यात तापाबरोबर बाह्य रक्तस्राव, आतड्यांमधून रक्तस्राव, प्लेटलेट्‌सची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ शकतात. तसेच छातीत, पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. बाकी लक्षणे डेंग्यू तापाप्रमाणे असतात.

  • तीव्र, सतत पोटदुखी
  • त्वचा फिकट, थंड किंवा चिकट होणे.
  • रक्तासह किंवा रक्ताविना वारंवार उलट्या होणे.
  • झोप येणे आणि अस्वस्थता
  • रुग्णाला तहान लागते आणि तोंड कोरडे पडते.
  • नाक, तोंड आणि हिरड्यांतून रक्त येणे आणि त्वचेवर पुरळ उठणे.
  • नाडी कमकुवतपणे जलद चालते.
  • श्‍वास घेताना त्रास होणे.

३. डेंग्यू अतिगंभीर आजार
ही डेंग्यू रक्तस्रावाच्या तापाची पुढची अवस्था आहे. यात रुग्णाचे अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होणे आणि शेवटी मृत्यू ओढवू शकतो.

डेंग्यूचा प्रसार
आजारी माणसाच्या रक्तातील डेंग्यू विषाणू ‘इडिस इजिप्ती’ जातीच्या डासाच्या मादीमार्फत दुसर्‍या निरोगी व्यक्तीस संक्रमित केले जातात. इडिस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात. हा डास आपल्या शरीरात विषाणू तयार करायला ७-८ दिवस घेतो आणि नंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास दिवसा- सकाळी अथवा संध्याकाळी चावतात.

डेंग्यूमध्ये औषधोपचार
डेंग्यू या आजारात कोणतीही विशिष्ट प्रतिजैविके उपलब्ध नसल्याने, हा आजार गांभीर्याने घ्यावा. डेंग्यूताप असल्यास घरातच स्वतः औषधोपचार करत बसू नये. वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.

डेंग्यू आणि प्लेटलेट्‌सची भूमिका
डेंग्यू म्हटला की प्लेटलेट्‌सची संख्या कमी झाली असे आपण नेहमी ऐकतो. पण ह्या प्लेटलेट्‌सची नक्की भूमिका काय?
जर ताप चढता आहे, सांध्यांमध्ये वेदना आहे व शरीरावर पुरळ (रॅश) आहे तर पहिल्याच दिवशी डेंग्यूची टेस्ट करून घ्यावी. सुरुवातीलाच ही टेस्ट करताना एंटीजन काड ही टेस्ट केली जाते व टेस्ट जर तीन चार दिवसांनंतर केली गेली तर एंटीबॉडी टेस्ट (डेंग्यू सिरॉलजी) ही टेस्ट करावी. सर्वसाधारणपणे स्वस्थ माणसांमध्ये दीड ते दोन लाख प्लेटलेट्‌स असतात. प्लेटलेट्‌स शरीरातील रक्तस्राव रोखण्याचे कार्य करतात. प्लेटलेट्‌स एक लाखापेक्षा कमी झाल्या तर वैद्याचा सल्ला घ्यावा. जर प्लेटलेट्‌स २० हजारांपेक्षा कमी झाल्या तर प्लेटलेट्‌स शरीरात चढवाव्या लागतात.

आयुर्वेद औषधोपचार
डेंग्यूमध्ये आयुर्वेद औषधोपचार घेताना वैद्याचा सल्ला घ्यावा. स्वतःहून कोणतेच औषधोपचार करू नयेत. आयुर्वेदिय औषधांमध्ये गुडूची, निम्ब, पपई, तुलसी, कोरफड यांसारखी औषधे गुणकारी ठरतात.

  • गुळवेल तापामध्ये अमृताप्रमाणे कार्य करते. रोग्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. शरीरातील जंतुसंक्रमणाविरुद्ध लढायला मदत करते. २ ग्रॅम गुळवेलीत, ४-५ तुळशीच्या पानांचा रस घालून १ ग्लास पाण्यात काढा तयार करून दिवसातून २ वेळा किमान सात दिवस तरी सेवन करावा.
  • निम्बपत्र स्वरसाचे सेवन केल्याने प्लेटलेट्‌सची संख्या वाढते तसेच सफेद रक्तपेशींचीही (डब्ल्युबीसी) वृद्धी होते व शरीरप्रतिकारशक्तीची वृद्धी होते, त्यामुळे दररोज साधारण दहा दिवस २-३ ग्रॅम कडुनिंबाच्या पानांचा रस प्यावा.
  • पपईच्या पानांचा रस डेंग्यूमध्ये खूपच लाभदायक ठरतो. पपईमध्ये असणार्‍या पोषक तत्वामुळे तसेच कार्बोनिक योगामुळे प्लेटलेट्‌सच्या संख्येमध्ये वाढ होते.
  • तुळशीची पाने ही डेंग्यूमध्ये खूपच गुणकारी आहेत. दररोज ७-८ तुळशीची पाने पाण्यात उकळून त्याचा काढा प्यावा. तुळशीची पाने शरीरातील टॉक्सीन्स बाहेर टाकतात व रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
  • २ चमचे कोरफडीचा रस १ ग्लास पाण्यात घालून सेवन करावे. डेंग्यूमध्ये फायदा होतो.

डेंग्यूमधील पथ्यापथ्य

  • सर्व प्रकारच्या तापांमध्ये लंघन खूप महत्त्वाचे आहे. लंघनामध्ये भाताची पेज, मुगाचे कढण, नारळाचे पाणी, लिंबाचे पाणी, विविध भाज्यांचे सूप, षडंगोदक पथ्यकर आहे.
    तेलकट, मसालेदार, शिळे अन्न, फास्ट फूड, जंकफूड टाळावे.

डेंग्यूमधील प्रतिबंध उपाय

  • डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो.
    -घराच्या आजूबाजूला पाणी साठू न देणे, साठलेले पाणी वेळच्यावेळी रिकामे करावे.
  • संपूर्ण अंगभर कपडे घालावे.
    डेंग्यूची साथ पसरलेली आहे, त्यामुळे शक्य तेवढी प्रत्येकाने आरोग्याची काळजी घ्यावी.