सेंट्रल व्हिस्टा बांधकामाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

0
91

कोरोनाच्या कालावधीमध्ये सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम थांबवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका ३१ मे रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही ती याचिका फेटाळून लावली.

न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश महेश्वरी आणि न्या. अनिरुद्ध बोस यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर काल मंगळवारी सुनावणी झाली. याच प्रकारच्या अन्य प्रकल्पांचे काम सुरू असताना याचिकाकर्त्यांनी केवळ सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम कोरोनाचे कारण देत थांबवण्याची मागणी का केली आहे असा सवाल करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. तसेच न्यायालयाने सेंट्रल व्हिस्टाचे बांधकाम हे कोरोना नियमांचे पालन करून केले जात असल्याचे मत व्यक्त करत ही याचिका फेटाळून लावली.

कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना सुरू असलेले सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे सर्व प्रकारचे बांधकाम रोखण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली असून याचिकाकर्त्यांना १ लाखांचा दंडही ठोठावला होता. ही जनहित याचिका नसून प्रवृत्त होऊन करण्यात आलेली याचिका असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाने ३१ मे २०२१ च्या सुनावणीत म्हटले होते.