भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याने ट्विटरविरुद्ध उत्तर प्रदेशात गुन्हा दाखल

0
111

ट्विटरने आपल्या वेबसाईटवर भारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यामुळे उत्तर प्रदेशात मनिष माहेश्वरी यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बजरंग दलाच्या एका नेत्याच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखला भारतापासून वेगळे दाखवणारा चुकीचा नकाशा ट्वीटरने आपल्या साइटवर दाखवला होता. यात जम्मू-काश्मीर आणि लडाखला वेगळा देश दाखवण्यात आले होते. हा नकाशा ट्वीटरच्या करिअर पेजवर होता. तूर्तास ट्विटरकडून चुकीचा नकाशा हटवण्यात आला आहे. परंतु, या अगोदरही लडाख भारताहून वेगळा करून दर्शवण्यात आला होता. याविरोधात रोष व्यक्त झाल्यानंतर हा नकाशा सुधारला गेल्याचे सांगण्यात आले होते.

ट्विटवरविरोधात
४ तक्रारी

नव्या आयटी नियमांचे पालन न केल्याने कायद्याची सुरक्षा गमावलेल्या सोशल मीडिया कंपनी ट्वीटरविरोधात काल मंगळवारी ४ तक्रारी दाखल करण्यात आल्या. चाइल्ड पोर्नोग्राफीवरून ट्वीटरविरोधात दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने लहान मुलांशी संबंधित अश्लील कंटेटवरून ही तक्रार दाखल केली आहे. तसेच राष्ट्रीय बाल हक्क आयोगाच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल झाली आहे. त्याचप्रमाणे गाझियाबादमधील एका मुस्लिम नागरिकाला झालेल्या मारहाणप्रकरणी सामाजिक सौहार्द बिघडवल्याच्या आरोपांवरून ट्वीटरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासह ट्वीटर इंडियाचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरींना नोटीस पाठवण्यात आली होती.

अकाउंट लॉकप्रकरणी मागितले स्पष्टीकरण
दरम्यान, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि कॉंग्रेस खासदार शशी थरूर यांचे अकाउंट लॉक केल्याप्रकरणी ट्वीटरला २ दिवसांत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणी ट्वीटरला नोटीस पाठवण्याचे निर्देश समितीने माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवालयाला दिले आहेत. ट्वीटरकडून समाधानकारक उत्तर न आल्यास कंपनीच्या अधिकार्‍याला नोटीस बजावून बोलावले जाईल.