सुस्साट फेडरर उपांत्य फेरीत

0
96

टॉमस बर्डिचचा ७-६ (१), ६-३, ६-४ असा पराभव करत स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. रॉड लेवर एरिनावर झालेला हा सामना २ तास १४ मिनिटे चालला. या स्पर्धेच्या ‘अंतिम चार’मध्ये स्थान मिळविण्याची फेडरर याची ही १४वी वेळ आहे. पहिल्या सेटमध्ये ०-३ अशा पिछाडीवर पडल्यानंतर फेडररवर दबाव वाढला होता. परंतु, सुरुवातीला टाकलेला दबाव कायम ठेवण्यात बर्डिचला अपयश आल्याने अनुभवी फेडररने झोकात पुनरागमन करत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाच्या हियोन चुंग याच्याशी गाठ पक्की केली. तब्बल पाच दुहेरी चुका करूनही फेडरर याने आपल्या १५ बिनतोड सर्व्हिसेसच्या बळावर बर्डिचला पराजित केले. ग्रिगोर, जोकोविच यांचा मेलबर्ननरील कोर्टवर सामना करणे खूप कठीण असते. चुंगचा खेळ पाहिल्यास त्याच्यात जोकोविचची झलक दिसते, असे फेडरर याने आपल्या उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्ध्याविषयी बोलताना सांगितले.

चुंगने रचला इतिहास
दक्षिण कोरियाच्या हियोन चुंग याने ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवून काल ऐतिहासिक कामगिरी केली. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम चार खेळाडूंत स्थान मिळविणारा तो दक्षिण कोरियाचा पहिलाच खेळाडू ठरला. तसेच ऑस्ट्रेलियन ओपनच्या मागील १४ वर्षांच्या इतिहासात अंतिमपूर्व फेरीत स्थान मिळविणारा जागतिक क्रमावारीतील सर्वांत खालच्या क्रमावरील खेळाडूदेखील. ५८व्या स्थानावरील चुंग याने अमेरिकेच्या बिगरमानांकित टेनिज सँडग्रेन याचा ६-४, ७-६ (७-५), ६-३ असा पाडाव करत फेडररशी गाठ पक्की केली.
महिला एकेरीत अव्वल मानांकित सिमोना हालेपने सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवा हिला ६-३, ६-२ असे अस्मान दाखवून उपांत्य फेरीत धडक दिली. २१व्या मानांकित अँजेलिक कर्बरने अमेरिकेच्या १७व्या मानांकित मॅडिसन कीज हिला ६-१, ६-२ असे गारद करत वाटचाल केली. मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा व त्याची जोडीदार टिमिया बाबोस यांनी युआन सेबेस्टियन काबल (कोलंबिया) व एबिगेल स्पियर्स (अमेरिका) यांना ६-४, ७-६ (७-५) असे हरवून उपांत्य फेरी गाठली.