सुस्तावाल तर पस्तावाल!

0
129

कोरोनाची अत्यंत प्राणघातक ठरलेली दुसरी लाट हळूहळू ओसरत असल्याचे आशादायक चित्र एकीकडे दिसत असतानाच दुसरीकडे कोरोना विषाणूचे ‘डेल्टा प्लस’ हे नवे व अधिक घातक रूप देशाच्या काही भागांमध्ये डोके वर काढू लागले आहे. देशात आतापर्यंत आढळलेल्या ह्या ‘डेल्टा प्लस’ विषाणूपैकी बहुसंख्य म्हणजे २१ नमुने आपल्या शेजारच्या महाराष्ट्रात आढळून आलेले आहेत आणि त्यातही उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रातील सर्वाधिक नमुने रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. शेजारच्या सिंधुदुर्गातही एक नमुना आढळून आला आहे. गेल्या १५ मे रोजी गोळा केल्या गेलेल्या नमुन्यांच्या निष्कर्षांचा हा तपशील महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी काल दिला. आजवर आणखी सात हजार नमुने महाराष्ट्र सरकारने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत, म्हणजेच कोरोना विषाणूच्या ह्या सर्वांत नव्या रूपाचा प्रसार आतापावेतो अधिक मोठ्या प्रमाणावर झालेला असू शकतो आणि गोव्यासाठी ही नक्कीच अतिशय चिंतेची बाब आहे.
ही चिंता व्यक्त करण्यामागील सर्वांत प्रमुख कारण म्हणजे गेल्या ऑक्टोबरमध्ये पहिल्यांदा आढळलेल्या आणि दुसर्‍या लाटेचे भयावह रूप निर्माण करण्यास कारणीभूत ठरलेल्या कोरोना विषाणूच्या ‘बी. १.६१७.२’ ह्या ‘डेल्टा’ ह्या भारतीय रूपापेक्षाही त्याचे ‘एवाय.१’ हे नवे रूप अधिक संसर्गजन्य आहे आणि त्याहूनही अधिक लक्षवेधी बाब म्हणजे आतापर्यंत कोरोनावर ज्या लशी आलेल्या आहेत, त्यातून निर्माण होणारी मानवी प्रतिकारशक्ती ह्या नव्या रूपाला कितपत रोखू शकेल ह्याबाबत शास्त्रज्ञांमध्येच संभ्रम दिसतो आहे. शरीरात मोनोक्लोनल अँटिबॉडिज निर्माण करणारे अत्यंत महागडे कॉकटेल उपचारदेखील ह्या नव्या रूपावर मात करू शकत नाहीत आणि ऍस्ट्राझेनेकासारख्यांच्या लशीदेखील त्यावर कुचकामी ठरत आहेत असे काही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मध्यंतरी दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूवर आपली सिरम इन्स्टिट्यूट तयार करीत असलेली ऍस्ट्राझेनेकाची लस उपयोगी ठरत नसल्याचे कारण देत ती त्या देशाने परत केली होती. तेथे त्या विषाणूत आढळलेले ‘के ४१७ एन’ म्युटेशन डेल्टा प्लसमध्ये आहे असे शाहिद जमील ह्यांच्यासारख्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अर्थात, ह्या विषाणूच्या नव्या रूपाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम, त्याची संसर्गजन्यता, त्यापासून असलेला नेमका धोका, लसीकरणातून निर्माण होणार्‍या प्रतिकारशक्तीचा हे नवे रूप रोखण्यातील उपयोग ह्या सगळ्याचा अजूनही अभ्यास केला जात आहे आणि काही ठोस निष्कर्षाप्रत येण्याइतके सध्याचे नमुने पुरेसे नाहीत, परंतु पुढील धोक्याची संभाव्यता लक्षात घेण्यास आतापर्यंतची माहिती पुरेशी ठरायला हरकत नसावी.
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गोव्यात भीषण मृत्युकांड घडले, परंतु त्याला कारणीभूत ठरणारे विषाणूचे नेमके कोणते रूप होते हा तपशील अजूनही राज्य सरकारने उघड केलेला नाही. अगदी सुरवातीच्या काही नमुन्यांचा एनआयव्हीने दिलेला तपशील सरकारने जाहीर केला होता, परंतु त्यानंतर किती नमुने जिनॉम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवले गेले, त्यापैकी कितींचे अहवाल आले आणि कोरोना विषाणूची कोणकोणती रूपे गोव्यामध्ये दुसर्‍या लाटेत सक्रिय होती ह्याची कणभरही माहिती राज्य सरकारने आजतागायत दिलेली नाही. आरोग्य खात्याची ही बेफिकिरी अक्षम्य आहे. पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या प्रयोगशाळेकडून अहवाल येण्यास प्रचंड विलंब होत असल्याने गोव्यात स्वतंत्र जिनॉम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी ९ एप्रिलला केली होती, परंतु तिचे पुढे काय झाले, गोव्यामध्ये कोरोना विषाणूची कोणकोणती रूपे आजवर आढळली आहेत, दुसर्‍या लाटेतील मृत्युकांडास त्यापैकी नेमके कोणते रूप कारणीभूत होते आणि सध्या देशात ज्याच्याविषयी चिंता व्यक्त होते आहे ते ‘डेल्टा प्लस’ रूप राज्यात आतापर्यंत किती रुग्णांमध्ये आढळून आलेले आहे, ते शोधण्यासाठी किती नमुने आतापर्यंत गोळा करून प्रयोगशाळेत पाठविलेले आहेत ह्याविषयी सरकार मौन का बाळगून आहे? राज्य सरकारने आतापर्यंत ह्यापैकी काहीही केेलेले नसेल आणि दुसरी लाट ओसरत असल्याच्या समाधानात नेते मंडळी मश्गुल असतील तर ही पुढील धोक्याची घंटा ठरू शकते. सरकारने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समित्या कुठे आहेत? ‘डेल्टा प्लस’ संबंधी त्यांनी जनतेला आणि सरकारला सावध केले पाहिजे. राज्यातील सध्याच्या सर्व सक्रिय रुग्णांच्या नमुन्यांचे जिनॉम सिक्वेन्सिंग तातडीने करून ‘डेल्टा प्लस’ चा प्रसार कसा रोखता येईल हे सरकारनेही वेळीच पाहणे अत्यावश्यक आहे. आज सुस्तावाल, तर उद्या पस्तावाल!