आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’चा धोका

0
147

>> केंद्र सरकारचा महाराष्ट्रासह केरळ, मध्यप्रदेशला इशारा

>> देशभरातील २८ पैकी महाराष्ट्रात २१ रुग्ण

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा जोर ओसरू लागलेला असताना आता देशात म्युकरमायकोसिसपाठोपाठ डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या प्रकाराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दक्षतेचा इशारा दिला आहे. सध्या विषाणूच्या या प्रकाराचे देशात फारसे रुग्ण जरी नसले, तरी त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग अफाट आहे. सध्या देशात या प्रकाराचे २८ रुग्ण आढळले असून त्यातील २१ रुग्ण फक्त एकट्या महाराष्ट्रात आढळले आहेत. तसेच केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांत इतर सात रुग्ण आढळले असून केंद्र सरकारने या तीन राज्यांना अधिक सतर्कतेचा इशारा देताना या संदर्भात त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे.

महाराष्ट्र, केरळ व मध्य प्रदेश या तीनही राज्यांमध्ये कोरोनाच्या डेल्टा प्लस नमुन्याचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले असून त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध किंवा तत्सम पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य विभागाने या तीनही राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केले आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा हा डेल्टा प्रकार भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी भारतात आढळलेल्या २८ पैकी २१ रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी, जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. या विषाणूच्या तपासणीसाठी राज्यभरातून सुमारे ७५०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती दिली. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.

डेल्टा प्लसविषयी आढावा घेणार्‍या एका गटाने केलेल्या अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लसच्या नमुन्याविषयी सावध केले आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्ये करोनाचा डेल्टा प्लस हा प्रकार आढळून आला आहे.

एसओपीचे पालन करण्याचे आवाहन
ज्या ठिकाणी डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन, गर्दी कमी करणे आणि लोकांचा एकमेकांशी संपर्क कमी करणे, व्यापक प्रमाणावर चाचण्या करणे, ट्रेसिंग वाढवणे आणि जास्तीत जास्त लोकांना लसीकृत करणे अशा उपाययोजनांसंदर्भात राज्य सरकारांनी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.

तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणे
कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला रोखण्यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. त्यासाठी कोरोना लसीकरण वेगाने केले जात असून लसीकरण हाच तिसरी लाट रोखण्याचा महत्त्वाचा मार्ग असल्याचे केंद्र सरकारने काल सांगितले. कोरोना लस आणि कोरोना नियमांचे पालन या दोन मार्गांनी तिसर्‍या लाटेला रोखता येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.

सतर्क राहण्याचा इशारा
यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तीनही राज्यांसोबतच देशभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाने या प्रकाराविषयी अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमपणे काम करणे गरजेचे आहे. आधीपासूनच या यंत्रणा व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या, तरी डेल्टा प्लसबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

डेल्टाचे गोव्यात
२६ रुग्ण सापडले

कोरोनाच्या डेल्टा या नव्या उत्परिवर्तीत विषाणूचा संसर्ग झालेले गोव्यात आतापर्यंत २६ रुग्ण सापडले आहेत. त्या शिवाय कप्पा या नमुन्याचा संसर्ग झालेले सहा तर अल्फा या व्हेरिएंटचा संसर्ग झालेला एक रुग्ण राज्यात सापडला आहे, असे आरोग्य खात्याने काल स्पष्ट केले.
आतापर्यंत राज्यातून १२२ जणांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी ८९ नमुन्यांचे अहवाल अद्याप हाती आलेले नाहीत, असे खात्याने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, कोरोनाचा डेल्टा प्लस हा प्रकार झपाट्याने संसर्ग पसरवणारा असल्यामुळे त्याबाबत जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून भारतातही त्या प्रकाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे आढळून येत आहेत.