>> कदंबच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती
माझी बस योजना – 2025 गोव्यातील प्रवाशांच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी तयार करण्यात आली असून या बस योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या खासगी बसगाड्यांना कदंब महामंडळाची डिजिटल सुविधा, कदंब महामंडळाचे स्मार्ट कार्ड व पास वैध असतील, अशी माहिती कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना पर्वरी येथे काल दिली.
राज्य सरकारच्या सुधारित माझी बस योजनेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना कदंब महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली.
राज्य सरकारने सुधारित माझी बस योजना 2025 जाहीर केली आहे. ज्यामध्ये खासगी बस ऑपरेटर्सना 3 रुपये प्रति किमी अनुदान, विमा प्रीमियम परतफेड आणि जुन्या बसेस बदलण्यासाठी मदत यांसह अनुदान देण्यात येणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे, असेही व्यवस्थापकीय संचालक कासकर यांनी सांगितले.
मडगाव – काणकोण या प्रवासी मार्गावरील खासगी बसमालकांनी या योजनेला आक्षेप घेतला आहे. या सुधारित योजनेमध्ये फायदा कमी आहेत, असे त्यांना वाटत आहे. माझी बस योजना 2025 अंतर्गत वेळापत्रक, मार्ग ओव्हरलॅप आणि महसूल वाटणीसाठी आवश्यक उपाय योजना करण्याचे आश्वासन त्या बसमालकांना देण्यात आले आहे, असेही रोहन कासकर यांनी सांगितले.