Home बातम्या राज्य सरकारने राज्यातील 50 टक्के घरांच्या छतावरून सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य : मुख्यमंत्री

राज्य सरकारने राज्यातील 50 टक्के घरांच्या छतावरून सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य : मुख्यमंत्री

0

राज्य सरकारने राज्यातील 50 टक्के घरांच्या छतावरून सौरऊर्जा निर्मिती आणि 63 आदर्श सौर गावांचे लक्ष्य ठेवले आहे. पीएम-कुसुम अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोफत सौर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्यात सौर क्रांतीला गती या विषयावरील एका कार्यशाळेत बोलताना काल दिली.

देशात सौर क्रांतीसाठी प्राधान्य दिले जात असून, गोवा राज्य सुध्दा सौर क्रांतीमध्ये पुढे वाटचाल करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारताने सौरऊर्जेचा 107 गिगावॅटचा टप्पा ओलांडला आहे आणि 2030 पर्यंत 500 गिगावॅट नॉन-फॉसिल एनर्जीच्या उद्दिष्टाकडे स्थिरपणे वाटचाल सुरू केली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पंतप्रधान सूर्य घर : मोफत बिजली योजना आणि मुख्यमंत्री मोफत वीज योजनेखाली छतावरील सौरऊर्जा पॅनल स्थापनेसाठी 100 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. पंचायत स्तरावर नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, नागरिकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गेडा या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित तांत्रिक कामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून ठेकेदारही निश्चित करण्यात आले आहेत. ही योजना लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या कार्यशाळेत केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा,खासदार सदानंद शेट तानावडे, पर्यटनमंत्री रोहन खवंटे, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पशुसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिगंबर कामत व इतरांची उपस्थिती होती.