सुमीत नागलची १३५व्या स्थानी झेप

0
99

>> ब्युनोस आयर्स एटीपी चॅलेंज स्पर्धा जिंकली

भारताचा टेनिस स्टार सुमीत नागल याने ब्युनोस आयर्स एटीपी चॅलेंजर स्पर्धेतील विजेतेपदाच्या बळावर काल सोमवारी जाहीर झालेल्या ताज्या एटीपी क्रमवारीत पुरुष एकेरीत वैयक्तिक सर्वोत्तम १३५वे स्थान मिळविले आहे. यासह त्याने २६ स्थानांची मोठी झेप घेत अव्वल शंभरात प्रवेश करण्याच्या दिशेने आगेकूच सुरूच ठेवली. नागलने रविवारी अंतिम पेरीत फाकुंदो बोगनिस याचा ६-४, ६-२ असा पराभव केला. हा सामना जिंकण्यासाठी त्याला एक तास ३७ मिनिटे लागली. ब्युनोस आयर्समध्ये एटीपी चॅलेंजर किताब जिंकणारा तो पहिला आशियाई खेळाडूदेखील ठरला. नागलने उपांत्यपूर्व फेरीत स्थानिक फेव्हरिट फ्रान्सिस्को सेरुंदोलो याचा तर उपांत्य फेरीत ब्राझिलच्या थियागो मोंतेरो याचा ६-०, ६-१ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती.

नागलचा अपवाद वगळता प्रमुख भारतीय खेळाडूंची एटीपी तसेच डब्ल्यूटीए क्रमवारीत घसरणच दिसून आली. एटीपी पुरुष एकेरीतील अव्वल दहामधील खेळाडूंचा विचार केल्यास कोणताही बदल झालेला नाही. अव्वल स्थानावर असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच (९८६५ गुण) याच्या स्थानाला द्वितीय स्थानावरील राफेल नदालकडून (९२२५ गुण) धोका संभवतो. महिला एकेरीतही प्रथम असलेली ऍश्‍ले बार्टी (६४४६) व दुसर्‍या स्थानावरील कॅरोलिना प्लिस्कोवा (६१२५) यांच्य गुणांत फारसे अंतर नाही.
अव्वल पाच भारतीय
पुरुष एकेरी ः प्रज्ञेश गुणेश्‍वरन (-४, ८४वे स्थान), सुमीत नागल (+ २६, १३५), रामकुमार रामनाथन (-१३, १८३), शशिकुमार मुकुंद (२३३), साकेत मायनेनी ( + १, २६०)
पुरुष दुहेरी ः रोहन बोपण्णा (४३वे स्थान), दिविज शरण (-१, ४५), लिएंडर पेस (+ २, ७८), पूरव राजा (-२, ९२), जीवन नेदुनचेझियान (-१२, ९४)
महिला एकेरी ः अंकिता रैना (-१, १९१वे स्थान), प्रांजला यडलापल्ली (+ २, ३३७), ऋतुजा भोसले (-२०, ४५०), करमन थंडी (-३, ४६५), रिया भाटिया (+ २, ४८८)
महिला दुहेरी ः अंकिता रैना (-१, १६४वे स्थान), ऋतुजा भोसले (-५०, २५१), करमन थंडी (-४, ३२१), प्रार्थना ठोंबरे (-४, ३४८), रिया भाटिया (-५, ५१८)