पी. चिदंबरम् यांचा पुन्हा जामीन अर्ज फेटाळला

0
121

माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा जामीन अर्ज पुन्हा एकदा दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायाधीश सुरैश कैत यांनी साक्षीदार आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होऊ शकतो असे सांगत जामीन देण्यास नकार दिला. आयएनएक्स मीडियाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी चिदंबरम सध्या तिहार कारागृहात आहे.
आयएनएक्स मीडियाच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात २१ ऑगस्ट रोजी सीबीआयने चिदंबरम यांना अटक केली होती. सीबीआयची अटक टाळण्यासाठी चिदंबरम दोन तीन दिवस बेपत्ता होते. त्यानंतर ते थेट कॉंग्रेसच्या मुख्यालयात प्रकट होऊन पत्रकार परिषदेत आपण व आपला पुत्र निर्दोष असल्याचा दावा केला होता. मात्र त्यानंतर ते घरी पोहोचल्यानंतर त्वरित सीबीआयच्या अधिकार्‍यांनी त्यांना अटक केली होती. न्यायालयात त्यांना हजर केल्यावर त्यांना जामीन मिळवण्यासाठी नावाजलेल्या वकीलांची फौज उभी करण्यात आली होती. परंतु, न्यायालयाने त्यांना जामीन नाकारल्याने त्यांची तिहारच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. सीबीआयने आयएनएक्स प्रकरणात १५ मे २०१७ रोजी प्राथमिक गुन्हा दाखल केला होता. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना २००७ साली आयएनएक्स मीडिया समूहाला ३०५ कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक करण्यासाठी एफआयपीबीला मंजुरी देण्यात अनियमितता दिली होती, असा त्यांच्यावर आरोप होता.