कमलेश नागरकोटीचे पुनरागमन

0
104

दुखापतीमुळे १९ महिने स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर रहावे लागल्यानंतर भारताचा युवा जलदगती गोलंदाज कमलेश नागरकोटी याचे इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात पुमरागमन झाले आहे. न्यूझीलंडमध्ये मागील वर्षी झालेल्या १९ वर्षांखालील विश्‍वचषक स्पर्धा जिंकलेल्या भारतीय संघाचा कमलेश अविभाज्य घटक होता. बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतील तज्ज्ञ त्याच्या दुखापतीवर बारीक लक्ष ठेवून होते. त्याची पाठ, टाच व घोटा दुखावला होता. मागील वर्षी विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेनंतर त्याने क्रिकेट खेळलेले नाही. राजस्थानकडून ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये हॅट्‌ट्रिक घेणारा पहिला खेळाडू होण्याचा मानदेखील त्याने मिळविला होता. बांगलादेशमध्ये १४ नोव्हेंबरपासून इमर्जिंग स्पर्धा खेळविली जाणार आहे.

या स्पर्धेसाठी भारताचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला असून बांगलादेश, हॉंगकॉंग व संयुक्त अरब अमिराती हे गटातील अन्य संघ आहेत. ‘अ’ गटात श्रीलंका, अफगाणिस्तान, पाकिस्तान व ओमान हे देश आहेत. भारत आपला पहिला सामना अमिरातीविरुद्ध १४ रोजी खेळेल. १६ रोजी बांगलादेश व १८ रोजी हॉंगकॉंगशी भारताला खेळावे लागेल. अ गटाचा विजेता व ब गटाचा उपविजेता यांच्यात २० रोजी पहिला उपांत्य सामना होणार आहे. २१ रोजी ब गटाचा विजेता व अ गटाचा उपविजेता संघ दुसर्‍या उपांत्य लढतीत खेळतील. शनिवार २३ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे.

भारतीय संघ ः विनायक गुप्ता, आर्यन जुयल, बी. आर. शरथ, चिन्मय सुतार, यश राठोड, अरमान जाफर, सनवीर सिंग, कमलेश नागरकोटी, ऋतिक शोकिन, सिद्धार्थ देसाई, अर्शदीप सिंग, एस.आर. दुबे, कुमार सूरज, पी. रेखाडे व कुलदीप यादव.