सुभाष वेलिंगकर यांना विभाग संघचालक पदावरून हटविले

0
102

>> भाभासुमंच्या राजकीय पर्यायात सहभाग नाही ः संघ

भारतीय भाषा सुरक्षा मंचाने राज्यात सत्ताधारी भाजपाला राजकीय पर्याय देण्याची घोषणा केल्याने आणि श्री. सुभाष वेलिंगकर हे भाभासुमंचे समन्वयक असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यापासून फारकत घेत श्री. वेलिंगकर यांनाच गोवा विभाग संघचालक पदावरून हटविण्याचा निर्णय काल जाहीर केला. संघाचे कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ यांनी एका पत्रकाद्वारे ‘‘वेलिंगकर यांच्याकडे यापुढे विभाग संघचालक ही जबाबदारी राहणार नाही असा निर्णय संघ व्यवस्थेंतर्गत गोव्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला आहे’’ असे काल अधिकृतरीत्या जाहीर केले.
गेले काही महिने भारतीय जनता पक्ष आणि गोवा विभाग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंध पराकोटीचे ताणले गेले आहेत. भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या माध्यमातून रा. स्व. संघाचे गोवा विभाग संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी गेले वर्षभर उग्र आंदोलन चालवल्याने अस्वस्थ झालेल्या भाजपा नेतृत्वाने संघाकडे वेलिंगकर यांना पदावरून हटवण्याचा तगादा लावला होता. मात्र, वेलिंगकर यांनी घेतलेली मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणासंबंधीची भूमिका रा. स्व. संघाच्या अ. भा. प्रतिनिधी सभेत घेतली गेलेली अधिकृत भूमिका असल्याने त्यांना कोणत्या आधारावर हटवावे असा पेच संघाच्या केंद्रीय नेतृत्वापुढे होता. मात्र, भाभासुमंने राजकीय पर्याय देण्याची घोषणा करताच श्री. वेलिंगकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे पाऊल संघाच्या कोकण प्रांताच्या वतीने उचलण्यात आले.
संघाचे कोकण प्रांत कार्यवाह सुनील सप्रे व प्रांत प्रचारक दादा गोखले व प्रांत सहप्रचारक सुमंत आमशेकर हे तातडीने गोव्यात आले व त्यांनी वेलिंगकरांना हटविण्यात येत असल्याचा संघाचा निर्णय त्यांना कळवला. संघाच्या या निर्णयामुळे खळबळ माजली असून गोव्यातील संघ कार्यकर्ते आता वेलिंगकरांच्या पाठीशी राहणार की नाही असा प्रश्न उपस्थित झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक महत्त्वपूर्ण बैठक आज संध्याकाळी कुजिरा येथे होणार असून त्यात वेलिंगकर यांना हटविण्याच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे. संघाचे कोकण प्रांताचे कार्यवाह सुनील सप्रे व प्रांत प्रचारक दादा गोखले जातीने गोव्यात हजर असून ते या बैठकीलाही उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. दरम्यान, संघाच्या कोकण प्रांतातर्फे काल संध्याकाळी एक पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले. त्यात भाभासुमंने घेतलेल्या राजकीय भूमिकेत संघाचा कोणताही सहभाग राहणार नाही असे घोषित करण्यात आले आहे.

आम्ही ठाम आहोत ः वेलिंगकर
आपल्याला विभाग संघचालक पदावरून हटवण्याचा निर्णय कोकण प्रांत पदाधिकार्‍यांनी घेतला असला तरी गोवा विभाग संघ कार्यकारिणी आपल्या पाठीशी असून ‘‘आम्ही ठाम आहोत व गोव्याच्या भवितव्याशी बांधील आहोत’’ असा इशारा श्री. सुभाष वेलिंगकर यांनी दिला. संघ पदाधिकार्‍यांच्या बैठकीनंतर आज गुरुवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वेलिंगकरांवरील कारवाई विरोधात
गोवा पदाधिकारी आक्रमक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना या पदावरून हटविल्याच्या निषेधार्थ गोव्यातील बहुसंख्य संघ पदाधिकार्‍यांनी काल स्वेच्छेने पदत्याग केला. कुजीरा येथील हेडगेवार शिक्षण संकुलात कोकण प्रांत संघ पदाधिकार्‍यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय गोवा पदाधिकार्‍यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
गोव्यातील संघ पदाधिकारी तसेच शाखा प्रमुख व स्वसंसेवक अशा सुमारे ४०० जणांची या बैठकीला उपस्थिती होती. यावेळी प्रा. वेलिंगकर यांच्यावरील कारवाई मागे घेण्यासाठी कोकण प्रांत पदाधिकार्‍यांवर जोरदार दबाव आणण्यात आला. मात्र त्यांनी निर्णय फिरवण्यास नकार दिला. गोव्यातील संघ पदाधिकारी आपली पुढील कृती आज ठरविणार असल्याचे सांगण्यात आले.

‘आंदोलनाला पाठिंबा, पण राजकीय पर्यायाला नाही’
भारतीय भाषा सुरक्षा मंचाने चालवलेल्या शैक्षणिक माध्यम आंदोलनास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा होता व यापुढेही राहील, परंतु आंदोलनाचा टप्पा म्हणून राजकीय पक्ष काढण्याची जी घोषणा केलेली आहे, त्यात संघाचा कोणताही सहभाग राहणार नाही अशी घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक सतीश मोढ यांनी काल केली.
श्री. सुभाष वेलिंगकर यांना विभाग संघचालक पदावरून हटविण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ‘नवप्रभे’ ने संघाचे कोकण प्रांत कार्यवाह सुनील सप्रे व प्रांत प्रचारक अभिजीत गोखले यांच्याशी संपर्क साधला असता, ‘वेलिंगकरांवर कारवाई झालेली नाही व यासंदर्भात संघाची अधिकृत भूमिका कोकण प्रांताच्या वतीने एक पत्रक जारी करून रीतसर जाहीर केली जाईल’’ असे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्वरित एक पत्रक प्रांत संघचालक सतीश मोढ यांच्या सहीनिशी जारी करण्यात आले. त्यात सुभाष वेलिंगकर यांच्याकडे यापुढे रा. स्व. संघ गोवा विभाग संघचालक ही जबाबदारी राहणार नाही असा निर्णय संघ व्यवस्थेंतर्गत गोव्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत घोषित केल्याचे नमूद करण्यात आले. याच पत्रकात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाची व्यवस्था भारतात सर्वदूर सुदृढ व्हावी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे. या भूमिकेशी सुसंगत, भारतीय भाषा सुरक्षा मंचाने चालवलेल्या आंदोलनाच्या या विषयाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पाठिंबा दिला आहे आणि तो कायम राहील असे नमूद करण्यात
आले. मात्र, आंदोलनाचा टप्पा म्हणून भाभासुमंने राजकीय पक्ष काढण्याची जी घोषणा केली आहे, त्यात संघाचा कोणताही सहभाग नसेल असेही स्पष्ट करण्यात आले. स्थापनेपासून संघाने कधीही राजकारणात भाग घेतलेला नाही. त्यामुळे भारतीय भाषा सुरक्षा मंचाने घेतलेल्या राजकीय भूमिकेत संघाचा कोणताही सहभाग राहणार नाही असे या पत्रकात नमूद करण्यात आले.

उचलबांगडी अपरिहार्य ः पार्सेकर
संघाचा स्वयंसेवक या नात्याने प्रा. सुभाष वेलिंगकर यांची गोवा संघचालक पदावरून केलेल्या उचलबांगडीमुळे आपल्याला वाईट वाटले; परंतु ही उचलबांगडी टाळणे शक्य होते, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. माध्यम प्रश्‍नावर यापूर्वीच तोडगा काढला आहे. आपल्या सरकारच्या दृष्टीकोनातून हा विषय राहिलेला नाही. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी कोणीही पुढे आल्यास सरकार त्यांना मदत करील असेही त्यांनी सांगितले.
प्रा. वेलिंगकर यांची राज्य संघ प्रमुख पदावरून उचलबांगडी हा संघाचा अंतर्गत विषय असल्याचे पंचायतमंत्री राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितले. अशा पध्दतीचा निर्णय घेण्यास संघ सक्षम आहे, असेही ते म्हणाले.