प्रचारासाठी उरले 4 दिवस; सर्वपक्षीयांकडून प्रचाराला गती

0
5

>> रविवारी संपणार दोन्ही जागांसाठीचा जाहीर प्रचार; अंतिम टप्प्यात जाहीर सभांवर भर

राज्यातील लोकसभेच्या उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दोन्ही जागांसाठीचा निवडणूक प्रचार रविवारी संपणार आहे. निवडणूक प्रचारासाठी अवघे 4 दिवस उरल्याने सर्वपक्षीयांनी निवडणूक प्रचाराला गती दिली आहे. भाजप, काँग्रेस, आरजीपी यांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात अधिकच जोर धरू लागला आहे.

लोकसभा मतदारसंघाचे क्षेत्र मोठे असल्याने घरोघरी प्रचार करणे सर्व उमेदवारांना शक्य होत नाही. त्यामुळे विधानसभा मतदारसंघांतून सुरुवातीला रॅली, कोपरा सभा घेण्यात येत होत्या. आता, अंतिम टप्प्यात जाहीर सभांवर भर दिला जात आहे. प्रमुख राजकीय पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते आपआपल्या भागात प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे राज्यभरातील वातावरण निवडणूकमय बनले आहे.
राज्यात मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान घेतले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता 5 मे रोजी संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. राजकीय पक्षांना जाहीर प्रचारासाठी केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. उत्तर गोवा मतदारसंघात वीस विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत आहे. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार श्रीपाद नाईक, काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप, आरजीपीचे तुकाराम परब यांच्यासह एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

दक्षिण गोवा मतदारसंघातही वीस विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत आहे. या मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सौ. पल्लवी श्रीनिवास धेंपो, काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस. आरजीपीचे रूबर्ट परेरा यांच्यासह एकूण आठ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि आरजीपी या पक्षांनी अंतिम टप्प्यात प्रचाराला जोर दिला आहे. दोन्ही मतदारसंघांत भाजपने जोरदार प्रचारावर भर दिला आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपसाठी ही लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात गुंतलेले आहेत. इंडिया आघाडीनेही काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराला गती दिली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत चुरशीच्या लढती अपेक्षित आहेत.

भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दक्षिण गोव्यातील साकवाळ येथे सभा घेतली होती. भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी प्रचारसभा घेतल्या. आता, निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची म्हापसा येथे सभा होणार आहे.
काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अल्का लांबा यांनी फोंडा येथे जाहीर सभा घेतली. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसचे राष्ट्रीय पातळीवरील नेते गोव्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरजीपी या प्रादेशिक पक्षाचे स्थानिक नेते सभेमध्ये सहभागी होत आहेत.