अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आता अधिक वेगवान झाल्या आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते आणि वित्त, नियोजन ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. त्यामुळे अजित पवार जरी आता नसले, तरी त्यांना दिलेली ही महत्त्वाची खाती आपल्या पक्षाच्या हातून निसटू नयेत ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काल वेगवान हालचाल केली. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आदी पक्षाची सर्व बडी नेतेमंडळी काल दुखवटा असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीस गेली आणि त्यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडेच राहू द्यावीत असे साकडे घातले. परंतु ती पदे भूषवणारा अजित पवार यांचा उत्तराधिकारी कोण ह्याबाबत सध्याची जनभावना पाहिली, तर केवळ सुनेत्रा पवार यांचेच नाव पुढे येते. त्या गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या, परंतु नंतर त्यांची वर्णी राज्यसभेवर लावण्यात आली होती. त्यामुळे त्यांचीच निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी करून त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पवार कुटुंबातील व्यक्ती निवडल्याशिवाय पक्ष एकसंध राहणार नाही असे आम्ही कालच म्हटले होते. भाजपसाठीही हे तूर्त सोयीचे आहे. पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आहेत, त्यामुळे सध्याच्या स्थितीत तेच ही धुरा वाहतील. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याचा जो विचार गेले काही दिवस चर्चिला जात होता आणि ज्या विषयात स्वतः अजित पवार यांनी जवळजवळ एकवाक्यता घडवून आणली होती असे सांगितले जाते, त्याला आता ‘अजितदादांची शेवटची इच्छा’ असल्याची भावनिक किनार लाभली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण केल्याशिवाय सध्याच्या परिस्थितीत तरणोपाय नाही, कारण अन्यथा अजित पवार यांच्या नंतर भारतीय जनता पक्ष मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न केल्याविना राहणार नाही ही भीती दोन्ही गटांना आहे. शरद पवार आता थकले आहेत. राजकीय निवृत्तीच्या विचारात आहेत. विरोधात बसून काही फायदा नाही हे त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना उमगले आहे. त्यामुळे सत्तेशी सोयरीक करण्याची चालून आलेली ही संधी राष्ट्रवादी काँग्रेसचा पवार गट आता तत्त्वांसाठी गमावणार की प्रवाहाबरोबर जाणार हे पाहावे लागेल. गेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या बाबतीत प्रयोग करून पाहिला. तो राजकीयदृष्ट्या फारसा लाभदायक व यशस्वी झाला नाही हा भाग वेगळा, परंतु आता जिल्हा परिषद निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे त्या निमित्ताने पुन्हा एकत्र येण्याची दोन्ही गटांना संधी आहे, निमित्त आहे. त्यात दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या विचाराला अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यूने बळकटीच मिळाली आहे. अजित पवार यांनी दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची चर्चा जवळजवळ सर्वसहमतीपर्यंत आणली होती असे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत. तसे असेल तर ह्या एकत्रीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहणे औत्सुक्याचे होईल. शरद पवार आता वयोज्येष्ठ आहेत, परंतु सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्या आजवरच्या वैचारिक भूमिकेचे काय होणार, की राजकीय सौदेबाजीत तेही सामील होणार हे आता दिसेल. भाजप सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. भाजपला काहीही करून पश्चिम महाराष्ट्रात आपला कार्यविस्तार करायचा आहे. त्यामुळे आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जवळ करून आणि आता शक्य झाले तर संभाव्य एकीकृत गटाला सोबत घेऊन आधी सख्य करून भाजप हळूहळू आपले सामर्थ्य त्या भागात वाढवण्याच्या प्रयत्नाला लागेल. मित्रपक्षांच्या बाबतीत भाजपची हीच नीती सर्वत्र असते हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. सुनेत्रा पवार यांच्याकडे सध्या पक्षाची सूत्रे देणे ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी अपरिहार्यता आहे, कारण अन्य कोणत्याही नेत्याच्या पाठीशी तेवढे जनसमर्थन नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजही पवार कुटुंबाच्याच प्रभावाखाली आहे. पक्ष म्हणून त्याचे स्वतंत्र अस्तित्व नाही. प्रश्न फक्त एवढाच असेल की वित्त, नियोजन यासारखी अत्यंत महत्त्वाची खाती भाजप सरकार केवळ जनभावनेखातर सुनेत्रा पवार यांच्यासारख्या अननुभवी व्यक्तीच्या हाती सोपवणार का? तशी ती सोपवणे योग्य आहे का? पण राजकारणात आजकाल फक्त राजकीय सोय महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे अजित पवार जरी गेले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसला आपली खाती आणि सत्तेतील प्रभाव गमवायचा नाही आणि एकनाथ शिंदेंना काबूत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे चाक भाजपला हवेच आहे.