घोगळ गृहनिर्माण वसाहतीतील सुन्नी गुलिस्थान मशिदीबाहेरील घटना;
चौघांना अटक; मशिदीच्या व्यवस्थापनाबाबत होता वाद
घोगळ गृहनिर्माण वसाहतीतील मशिदीत काल शुक्रवारच्या नमाजासाठी जमलेल्या दोन गटांमध्ये वाद होऊन एका 40 वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली. अली कलंदर खान असे मृत तरुणाचे नाव आहे. मशिदीच्या व्यवस्थापनाबाबत दोन गटांमधील वादातून ही खुनाची घटना घडली. यानंतर फातोर्डा पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली व वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. या प्रकरणात आणखी 4 ते 5 जणांचा सहभाग असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
सविस्तर माहितीनुसार, खुनाची ही घटना शुक्रवारचे नमाज पठण झाल्यानंतर घडली. घोगळमधील सुन्नी गुलिस्थान मशिदीच्या व्यवस्थापनावरून दोन गट निर्माण झाले असून, त्यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वाद सुरू आहे. या दोन गटांपैकी एक गट घोगळ येथील आहे, तर दुसरा गट फातोर्डा येथील आहे.
अली कलंदर खान हा सुन्नी गुलिस्थान मशीदीच्या समितीत उपाध्यक्ष होता. काल नमाज पठण झाल्यानंतर दोन्ही गटांतील वाद उफाळून आला. यावेळी अक्रम अली खान याने मशिदीबाहेर अली कलंदर खान यांच्या पोटात चाकू भोसकला. त्यांना तात्काळ दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर घोगळ येथील वातावरण तंग बनले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. घोगळ आणि दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या बाहेरही मोठ्या संख्येने जमाव जमला होता. या प्रकरणातील संशयितांना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली.
इस्पितळाबाहेर मोठा जमाव जमल्याने तेथेही पोलीस बंदोबस्त तैनात केला; पण बराच वेळ जमाव तेथे ठाण मांडून होता. पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र जमावाने व अली कलंदर खान यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळवून देण्याची आणि या प्रकरणातील अन्य संशयितांनाही अटक करण्याची मागणी लावून धरली. रात्री उशिरापर्यंत इस्पितळाबाहेर जमाव कायम होता. दरम्यान, अली कलंदर खान याच्या मृतदेहाचे शनिवारी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अक्रम अली खान (45), ऊबेद मकंदर (38), आलम बबलू शाह सय्यद आणि लतीफ जमीर सय्यद (सर्व रा. अमृतनगर, फातोर्डा) या चार जणांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांनी दिली.
या वादाचा वचपा काढण्याची तयारी अक्रम अली खान व उबेद मकंदर या गटाने केली होती, असा दावा मृत अली कलंदर खान यांच्या दोन्ही भावांनी केला. या प्रकरणात यापूर्वी तात्काळ कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती; पण पोलिसांनी त्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. त्यांनी वेळीच कारवाई केली असती, आपल्या भावाचा खून झाला नसता, असा आरोपही त्यांनी केला.