Home कुटुंब गोमंतभूमीतील कल्पवृक्ष आणि त्यांचे भवितव्य

गोमंतभूमीतील कल्पवृक्ष आणि त्यांचे भवितव्य

0
  • ॲड. अशोक प्रभू मोये

माणसांच्या संगतीत राहिल्याने माड झपाट्याने वाढतो आणि त्याची फलधारणा वाढती राहत असल्याचे दिसून येते. आपण मानवी वस्तीपासून दूर अशा भागातील कल्पवृक्षांकडे नजर टाकली असता आपणाला नक्कीच ते कळून येईल. अशा भागांतील ते माड काहीशा रोगाटलेल्या अवस्थेत दृष्टीस पडतात. काही तर फलधारणाही करत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे कल्पवृक्ष हा जणू माणसांचा मित्रच असल्याचे आपण म्हणू शकतो.

भारतातील इतर काही राज्यांप्रमाणे आमच्या गोमंतभूमीच्या कुठल्याही गावावर चौफेर नजर फिरवली असता बहुतकरून आपल्याला माणसांच्या वसाहतींमध्येच कल्पवृक्षांच्याही वसाहती (भाट) दृष्टीस पडतील. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, या वसाहती जणू भाटांतील रहिवाशांच्या वसाहतीत समाविष्ट झालेल्या असल्याचे आढळून येईल. माणसांच्या संगतीत राहिल्यास माड झपाट्याने वाढतो आणि त्याची फलधारणा म्हणजे उत्पादन क्षमता वाढती राहत असल्याचे दिसून येते. आपण विलग अशा, मानवी वस्तीला न जोडलेल्या, अर्थात मानवी वस्तीपासून दूर अशा भागातील कल्पवृक्षांकडे नजर टाकली असता आपणाला नक्कीच ते कळून येईल. अशा भागांतील ते माड काहीशा रोगाटलेल्या अवस्थेत दृष्टीस पडतात. काही तर फलधारणाही करत नसल्याचे आढळून येते. त्यामुळे कल्पवृक्ष हा जणू माणसांचा मित्रच असल्याचे आपण म्हणू शकतो.

माड माणसाच्या अनेकानेक गरजा पुरवू शकतो म्हणूनच त्याला ‘कल्पवृक्ष’ असे संबोधले जाते. हिंदू धर्मात नारळाच्या फळाला कोणी ‘श्रीफळ’ तर कोणी ‘अमृतफळ’ असे म्हणतात. त्याचे बाहेरचे कवच अर्थात ‘सोडणे’ काढून केवळ सोंडी ठेवलेला नारळ म्हणजे जणू गणराज अशी कल्पना करून, कुठल्याही सत्कार्याच्या, मंगलकार्याच्या सुुरुवातीला सर्वप्रथम त्याचे पूजन केले जाते आणि हिंदू धर्मात ही प्रथा अगदी पुरातन काळापासून आहे. त्याचप्रमाणे नारळापासून ‘पंचखाद्य’ हा गोड रूचकर पदार्थ तयार करून तो देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो.

कल्पवृक्ष हा आम्हा माणसांना बराच उपयुक्त आहे. त्याचा प्रत्येक भाग माणसाच्या उपयोगी पडतो. त्याच्या फळापासून म्हणजे नारळापासून तेल काढले जाते, ज्याचा उपयोग स्वयंपाकात मोठ्या प्रमाणात केला जातो. शिवाय अंगाला मालीश करण्यासाठी, केसांना सुदृढ ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. तेल काढल्यानंतर त्याच्या उरलेल्या चोपडाचा म्हणजे ‘पेंडी’चा मसाल्यात वा जनावरांचे खाद्य म्हणूनही उपयोग केला जातो. त्याच्या काथ्यापासून दोरखंड, दावी, पायपुसणी, पिशवी वगैरे नाना वस्तू बनवण्यासाठी केला जातो. करवंटीपासून लहानमोठे चमचे, अनेक प्रकारची खेळणी आपण बनवू शकतो. भिकारी भीक मागण्यासाठी तिचा जसा उपयोग करू शकतो, तसे तिच्यातून पाणीही पिऊ शकतो. तसेच त्याच्या सोडणांचा ज्वलनासाठी आपण उपयोग करू शकतो. त्याच्या झावळ्यांपासून हिरांच्या केरसुण्या बनवता येतात. त्याच्या खोडाचे वासे तसेच खांब तयार करू शकतो. माडापासून माणूस ‘सुर’ नावाचे पेय मिळवतो आणि त्याची दारूही बनवण्यासाठी उपयोग होतो. एखाद्या कत्तल केलेल्या कल्पवृक्षाच्या शेंड्यात एक खाण्यालायक रूचकर असा पदार्थ मिळतो, ज्याला आपण ‘कोवाळा’ असे म्हणतो. तो केळीच्या सुईसारखा परंतु बराच मोठ्या आकाराचा असतो. मारलेल्या तसेच मेलेल्या कल्पवृक्षाचा पुरेपूरपणे ज्वलनासाठी उपयोग होत असतो. कल्पवृक्षाचा कच्चा नारळ म्हणजे शहाळे. त्याच्या पाण्यापासून आपण तहान भागवू शकतो. या शहाळ्याचे पाणी खूप पौष्टिक असते. अशा प्रकारे कल्पवृक्षापासून आपणाला बरेच फायदे मिळतात. असा हा बहुपयोगी माड आपल्याला रोजगार मिळवून देण्यातही उपयुक्त ठरू शकतो. या झाडाच्या प्रत्येक भागावर प्रक्रिया करून आपण त्याच्या विविध वस्तू बनवू शकतो, ज्यांना बाजारपेठेत विशेष मागणी असते. अपंग माणूसही कल्पवृक्षावर आधारित व्यवसाय घरबसल्या करू शकतो.

शिवोली, बार्देस- गोवा येथील पोर्तुगीज काळातील मराठी कवी- माझे आजोबा वै. सगुण आत्माराम प्रभू मोये यांनी ‘कल्पवृक्ष’ हे अवघ्या 34 ओळींचे काव्य लिहिले. त्यात कल्पवृक्षाच्या उपयोगाविषयी पुरेपूर माहिती दिली असून ते काव्य ‘सगुण काव्यसंग्रह’ या गोवा मराठी अकादमीने प्रकाशित केलेल्या काव्यसंग्रहात वाचायला मिळते.

कल्पवृक्षाच्या अनेक उपयोगांव्यतिरिक्त त्याच्या अस्तित्वामुळे गोमंतभूमीला जणू एक आगळे-वेगळे सौंदर्य व वैभव प्राप्त झाले आहे. त्या वृक्षाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो थोड्याशा वाऱ्यात ऐटीने डोलतो. त्यामुळे तो एकप्रकारे नृत्यच करीत असल्याचा भास होतो. जोरदार वाऱ्या-पावसात तो जेव्हा डोलू लागतो तेव्हा त्याचा तो सळसळ आवाज आणि त्याला साथ देण्यासाठी आकाशातून उठणारे ढोलताशांचे संगीत, शिवाय मध्ये मध्ये विजेचा लखलखाट, कडकडाट म्हणजे जणू तो सारा साज त्याच्या नृत्यात तल्लीन झाल्याचा भास होतो आणि मन प्रफुल्लित होऊन जाते.
एका उंचवट्यावर किंवा एखाद्या टेकडीवर अथवा डोंगरावर उभा राहून कल्पवृक्षाचे हिरवेगार सौंदर्य तसेच त्याचे नृत्य पाहता असता आपण देहभान विसरून जातो. मला तर बालपणापासूनच निसर्गाची आवड असल्याने मी प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री आमच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावरील माझ्या फ्लॅटच्या खिडकीतून अधूनमधून त्या सौंदर्याचा स्वाद घेत असतो. त्यामुळे मन प्रसन्न होते. मात्र त्या क्षणी मला माझ्या प्रिय दिवंगत पत्नीची जबरदस्त आठवण येते आणि मन अगदी विचलित होऊन जाते. तिची साथ हरवल्याची हुरहुर मनाला लागून राहते.

येथील समुद्रकिनारे, डोंगर, नद्या, झाडेझुडपे, कल्पवृक्षाच्या मोठमोठ्या बागायती यांचे अनोखे सौंदर्य पाहून आपल्या देशातीलच नव्हे तर परदेशांतीलही यात्री सुखावून जातात आणि अगदी प्रसन्न मनाने गोव्याचा निरोप घेतात. गोव्याच्या भौगोलिक स्थितीवर व येथील सौंदर्यावर आधारित मडगाव येथील वै. दामोदर अच्युत कारे या कविवर्यांनी ‘गोमन्तदेवी’ हे 24-2-1929 रोजी लिहिलेले सुंदर असे काव्य गोवा मराठी अकादमीने प्रकाशित केलेल्या आणि ‘नवप्रभा’चे संपादक परेश प्रभू यांनी संपादन केलेल्या ‘नंदादीप’ या त्यांच्या काव्यसंग्रहात वाचायला मिळते. त्या सुंदर अशा कवितेत कविवर्यांनी ‘नारळितरू छत्र करी देवि! तुजवरी’ या अवघ्या पाच शब्दांत कल्पवृक्षाला गोमंतभूमीवरील सुंदर छत्र असल्याची सुंदरच अशी उपमा दिली आहे. माझ्या मते कल्पवृक्षांच्या अगदी जवळच्या अस्तित्वामुळे अनेक छत्रांच्या हिरवेगार छायेत सूर्याच्या प्रखर किरणांपासून गोमंतभूमी एकप्रकारे सुखावून गेली आहे असे कवीला वाटत असावे. वाचकांनी ते सुंदर काव्य जरूर वाचावे.
कल्पवृक्षाच्या सौंदर्याच्या संदर्भात एक वाखाणण्यासारखी गोष्ट म्हणजे, त्या वृक्षाच्या खोडाला जणू माणसाच्या पावलांच्या आकाराचे कोयत्याच्या आधाराने तुकडे काढून खाचा घातल्यास पाडेली त्याच्यावर जलद गतीने चढू किंवा उतरू शकतो. पाडेली आपणाला सुलभ पडेल अशाच अंतरावर त्या खाचा घालतो आणि त्यातून कल्पवृक्षाच्या सौंदर्यात अधिकच भर पडत असल्याचे दिसून येते.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, आमच्या गोमंतभूमीत वर्तमानकाळात दृष्टीस पडत असलेल्या कल्पवृक्षाच्या वसाहती या वडिलोपार्जित अशाच असून, अनेक वडीलधारी माणसांनी आपल्या अनेक वारसांसाठी हे कल्पवृक्षांचे वैभव जणू मागे ठेवून या विश्वाचा कायमचा निरोप घेतला. आताच्या पिढीतील बहुतेक माणसे त्या वसाहतीतील कल्पवृक्षांची चांगली मशागत करून नारळाचे उत्पन्न वाढविण्याऐवजी त्या बिल्डरांना विकत असल्याचे दिसून येते. आणि हा मिळालेला पैसा हरप्रकारे मौजमजा करण्यात वापरत आहेत.

वर्तमानकाळातील अनेकजण त्या वृक्षांची कसलीच काळजी न घेता, कोणत्याच प्रकारे मशागत न करता- मग त्याची कोणतीही कारणे असोत- फक्त आणि फक्त मिळालेल्या उत्पन्नाचा आपल्या भल्यासाठी वापर करत असतात. आणि अशा वस्तुस्थितीमुळे गोव्यातील नारळ उत्पादनात फक्त घटच झालेली नसून नारळाचा आकारही एकदमच जणू आखडून गेल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे तर तो नारळ पूर्वीसारखा चविष्ट लागत नसल्याचे अनेकजण बोलतात.
पूर्वीच्या काळात वडीलधारी माणसे सवड मिळताच आपल्या कल्पवृक्षांच्या वसाहतीत अनेक फेऱ्या मारून त्यांची जणू देखरेख करत असत. परंतु आताच्या पिढीतील माणसे तीन-चार महिन्यांच्या अंतराने वर्षाकाठी फक्त तीन-चार फेऱ्या मारून नारळ पाडून ते घेऊन जातात. परंतु त्या कल्पवृक्षांसंबंधी, त्यांच्या मशागतीविषयी कसलाच विचार करत नसल्याचे आढळून येते. वयोमानानुसार अथवा अन्य कारणांमुळे अनेक वृक्ष मरून जात असतात आणि त्या जागी नवीन रोपांची लागवड करण्याचे अनेकजणांनी अनेक कारणांसाठी सोडून दिल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे वारंवार होणारे हवामानातील बदल, वादळीवारे, पावसाची कमतरता, पाण्याची टंचाई, मशागतीचा अभाव, आताच्या पिढीतील बहुतेक माणसांनी बागायतीकडे फिरवलेली पाठ, पाडेल्यांचा अभाव, बागायतींची बिल्डर्सना विक्री आणि त्यांच्याकडून केली जाणारी वृक्षांची कत्तल अशा अनेकानेक कारणांमुळे जणू कल्पवृक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे आढळून येते. आणि त्यांवर असेच दुर्लक्ष होत राहिल्यास त्यांचे अस्तित्व झपाट्याने कमी होऊन नारळ उत्पन्न एकदमच घटून जाईल. त्यांचे आकारही एकदमच छोटे होऊन जातील आणि वर्तमानकाळात बाजारात 50 ते 60 रुपयांना मिळत असलेला नारळ शंभराचा आकडा पार करेल असे वाटते. कल्पवृक्षाचे हळूहळू नष्ट होणारे अस्तित्व माणसाला एकप्रकारे नक्कीच त्रासदायक ठरू शकते.
वर्तमानकाळात काहीजण योजनाबद्ध अशा कल्पवृक्षांच्या बागायती तयार करून जणू हरतऱ्हेच्या यांत्रिक पद्धतीने त्यांची मशागत करतात. नारळ पण पाडले जातात. परंतु वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे, तीव्र उष्णतेमुळे, माकड आणि अनेक रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे या कल्पवृक्षांना आमच्या वडिलोपार्जित कल्पवृक्षांसारखा लांबलचक जीवनकाळ मिळणे अशक्य असून नक्कीच कल्पवृक्षाचे भवितव्य धोक्यात आल्याचे आढळून येते.
माणसाने भूतकाळासारखी कल्पवृक्षांची लागवड तसेच मशागत करून त्यांची योग्य देखरेख तसेच काळजी घेण्याची घेण्याची आज गरज आहे. त्यांची कत्तल थांबविण्याची वेळ येऊन ठेपली असून वडिलोपार्जित अशा अस्तित्वात असलेल्या कल्पवृक्षांना आणखी काही वर्षांचा तरी जीवनकाल देण्याची गरज असून, तसे न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊन कदाचित हळूहळू ते नष्ट होतील यात शंका नाही.