सुदिन ढवळीकरांनी राजीनामा द्यावा

0
174

>> कॉंग्रेसची पत्रकार परिषदेत मागणी

सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर मंत्रिपदाला न्याय देण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका करत त्यांनी आजारावर मात करून गोव्यात आल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी कॉंग्रेस पक्षाने केली. कॉंग्रेसचे प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यावर जोरदार टीका केली.

सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत असे आम्हीच नव्हे तर त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारीही म्हणू लागले आहेत. मंत्री गोविंद गावडे यांनी त्यांच्यावर जाहीरपणे टीका करताना ते रस्त्यांची दुरुस्ती करण्यास पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप केला असल्याचे मुल्ला म्हणाले. सुदिन ढवळीकर यांना केवळ रस्त्यांची कामे करण्यातच नव्हे तर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासही अपयश आले असल्याचा आरोपही मुल्ला यांनी केला.

प्रत्येक वेळी विधानसभेत ते राज्यभरातील लोकांना २४७ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याचे आश्‍वासन देतात. मात्र, प्रत्यक्षात लोकांना थेंब-थेंब पाण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे ते म्हणाले. सांताक्रुझ-मेरशी येथे पाण्याची मोठी टाकी उभारण्यात आलेली आहे. पण ती टाकी केवळ शोभेची बाहुली बनून राहिलेली असून परिणामी जनतेचे पाण्यासाठी हाल होत असल्याचे ते म्हणाले.
नावेलकर्स रेसिडन्सी येथेही मोठी टाकी बांधण्यात आलेली आहे. मात्र, ती टाकीही शोभेची बाहुली बनली असल्याचे मुल्ला म्हणाले. या पार्श्‍वभूमीवर ढवळीकर यांनी मंत्रीपदाचा राजीनामाच दिलेला बरा, असा सल्ला मुल्ला यांनी दिला.

मोदींच्या विदेश दौर्‍यांची
फलनिष्पत्ती काय?

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या चार वर्षांच्या काळात ५२ देशांचा दौरा केलेला असून त्यावर तब्बल ३५५ कोटी रु. एवढा खर्च आलेला आहे. भारताच्या प्रधानमंत्र्यांनी केलेल्या या जागतिक विक्रमाची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जावी अशी सूचना करणारे एक पत्र आपण ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ला पाठवले आहे. प्रधानमंत्र्यांनी तब्बल ३५५ कोटी रु. खर्चून केलेल्या या ५२ देशांच्या दौर्‍यांची फलनिष्पत्ती काय? असा सवाल कॉंग्रेस प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी यावेळी केला. या ५२ देशांच्या दौर्‍यांमुळे गेल्या ४ वर्षांच्या काळात मोदी हे तब्बल १६५ दिवस देशाबाहेर राहिले. मोदी यांनी सत्तेवर आल्यानंतर डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होणारे अवमूल्यन रोखण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, रुपयाचे भाव डॉलराच्या तुलनेत आणखी घसरून ते आता ६९.०३ एवढे झाले असल्याचे आमोणकर यांनी सांगितले.