‘पुढचा मुख्यमंत्री भंडारी समाजाचा’ वक्तव्य जयेश यांचे वैयक्तिक मत

0
165

>> गोवा फॉरवर्ड पक्षाचे स्पष्टीकरण

‘राज्याचा पुढचा मुख्यमंत्री भंडारी समाजाचा’ असेल असे गोवा फॉरवर्डचे आमदार तथा गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर यांंचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक मत आहे. त्याच्याशी पक्ष संघटनेचा काही संबंध नाही, असा खुलासा गोवा फॉरवर्डचे संघटन सरचिटणीस प्रशांत नाईक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना काल केला. मंत्री साळगावकर यांनी भंडारी समाजाच्या दोन गटांच्या मनोमीलन कार्यक्रमात राज्याचा पुढील मुख्यमंत्री भंडारी समाजाचा असेल असे वक्तव्य केले होते.

यासंबंधीच्या प्रश्‍नावर बोलताना नाईक म्हणाले की, साळगावकर यांच्या वक्तव्याशी गोवा फॉरवर्ड पक्षाचा काही संबंध नाही. मंत्री साळगावकर यांचे ‘ते’ वैयक्तिक मत आहे. मंत्री साळगावकर यांना वैयक्तिक मत व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असेही नाईक यांनी सांगितले. गोवा फॉरवर्डच्या युवा शाखेची स्थापना केली जाणार आहे. राज्यातील महाविद्यालयांच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे युवा ब्रिगेडची लवकरच घोषणा केली जाणार आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
गोवा फॉरवर्ड बंद खाणी पुन्हा सुरू करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे. पावसाळ्यानंतर बंद पडलेला खाण व्यवसाय पुन्हा सुरू झाला पाहिजे. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकार्‍यांना सूचना सादर करण्याची विनंती करण्यात आली आहे, असेही नाईक यांनी सांगितले. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यास गोवा फॉरवर्डचा विरोध असल्याचे ते म्हणाले.