सिंधू, सायना उपांत्यपूर्व फेरीत

0
103

पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल व समीर वर्मा यांनी आशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने इंडोनेशियाच्या चोयरुनिसा हिचा सरळ दोन गेममध्ये २१-१५, २१-१९ असा पाडाव करत अंतिम आठमध्ये प्रवेश केला. पहिला गेम सहज गमावल्यानंतर चोयरुनिसाने दुसर्‍या गेममध्ये कडवा प्रतिकार केला. ९-१५ अशा पिछाडीनंतर तिने १७-१७ अशी बरोबरी साधली. यानंतर तिने १९-१७ अशी आघाडीदेखील घेतली. परंतु, सिंधूने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत सलग चार गुण घेत सामना तिसर्‍या गेमपर्यंत लांबणार नाही याची दक्षता घेतली. पुढील फेरीत सिंधूचा सामना ज्युनियर विश्‍वविजेत्या काय यानयान या चीनच्या खेळाडूशी होणार आहे. माजी क्रमांक एकची खेळाडू सायनाने दक्षिण कोरियाच्या गा इयुन किम हिचा ३८ मिनिटांत २१-१३, २१-१३ असा फडशा पाडत आगेकूच केली.

आज शुक्रवारी सायनाचा सामना सातवे मानांकन लाभलेल्या जपानच्या अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सायनाविरुद्ध यामागुचीचा जय-पराजयाचा रेकॉर्ड ७-२ असा शानदार आहे. पुरुष एकेरीत आव्हान कायम राखलेल्या समीरने हॉंगकॉंगच्या एनजी का लॉंग अँगस याचा २२-१२, २१-१९ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत समीरसमोर द्वितीय मानांकित शी युकी याचे आव्हान असेल. मिश्र दुहेरीत उत्कर्ष अरोरा व करिष्मा वाडकर तसेच वेंकट गौरव प्रसाद व जुही देवांगण यांना पराभवासह बाहेरचा रस्ता धरावा लागला. वेंकट-जुहीला वांग यिलयू व हुआंग डोंगपिंग या चीनच्या जोडीने २१-१०, २१-९ असे तर उत्कर्ष- करिश्मा यांना हाफिझ फैझल- ग्लोरिया वादजाजा यांनी २१-१०, २१-१५ असे अस्मान दाखविले.