राजस्थान रॉयल्सचे आव्हान कायम

0
106

>> कार्तिकचे झंझावाती अर्धशतक ठरले व्यर्थ

>> केकेआरचा सलग सहावा पराभव

राजस्थान रॉयल्सने थरारक लढतीत कोलकाता नाईट रायडर्सचा काल गुरुवारी ३ गडी व ४ चेंडू राखून पराभव केला. जोफ्रा आर्चर (नाबाद २७) व रियान पराग (४७) यांनी केलेल्या समयोचित फलंदाजीमुळे केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद ९७ धावा व्यर्थ ठरल्या. केकेआरने विजयासाठी ठेवलेले १७६ धावांचे लक्ष्य राजस्थानने १९.२ षटकांत गाठले.

गोलंदाजांना अनुकूल खेळपट्टीवर धावांचा पाठलाग करताना अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांनी राजस्थानला अर्धशतकी सलामी दिली. रहाणे, सॅमसन व स्मिथ काही धावांच्या अंतराने बाद झाल्याने बिनबाद ५३ वरून राजस्थानची ३ बाद ६३ अशी स्थिती झाली. बेन स्टोक्स व स्टुअर्ट बिन्नी यांनादेखील फारशी चमक दाखवता आली नाही. संघाचे शतक फलकावर लागण्यापूर्वीच तेराव्या षटकात त्यांची ५ बाद ९८ अशी दयनीय स्थिती झाली होती. सातव्या स्थानावर आर्चर फलंदाजीस येणे अपेक्षित असताना गोपाळला बढती देण्यात आली. त्याने ९ चेंडूंत झटपट १८ धावा करत आपले योगदान दिले. दुसर्‍या टोकाने रियान परागने अनेक धोके पत्करत व काही जबाबदार फटके खेळत वेगाने धावा जमवल्या. संघाला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता असताना बॅट यष्ट्यांवर आदळल्याने स्वयंचित होऊन त्याला तंबूचा रस्ता धरावा लागला. शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची आवश्यकता आसताना आर्चरने पहिल्या चेंडूवर चौकार व दुसर्‍या चेंडूवर षटकार लगावून संघाला आयपीएलच्या १२व्या मोसमातून बाहेर होण्यापासून तुर्तास वाचविले.

तत्पूर्वी, कर्णधार दिनेश कार्तिकच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर घरच्या मैदानावर खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने १७५ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर पहिल्या षटकापासून राजस्थानच्या गोलंदाजांनी कोलकात्याच्या फलंदाजांवर अंकुश लावला होता. कर्णधार स्टीव स्मिथचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सुरुवातीला सार्थ ठरवला. धवल कुलकर्णीच्या जागी संघात स्थान मिळालेल्या वरुण ऍरोनने आपल्या वेगाच्या जोरावर कोलकात्याच्या सलामीच्या फळीला माघारी धाडले. विशेष म्हणजे नारायणच्या जागी शुभमन गिलने ख्रिस लिनसह केकेआरच्या डावाची सुरुवात केली. या दोघांना ऍरोनच्या वेगाने चकविले. यानंतर नितीश राणा आणि दिनेश कार्तिक यांच्यात छोटेखानी भागीदारी झाली. मात्र श्रेयस गोपाळने नितीश राणाला माघारी धाडत कोलकाताला धक्का दिला. यानंतर ठराविक अंतराने केकेआरचे गडी बाद होत राहिले. खराब फलंदाजी व लागोपाठच्या पराभवामुळे दबावाखाली असलेल्या कार्तिकने किल्ला लढवत नाबाद ९७ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तब्बल ९ षटकारांची बरसात केली. राजस्थानकडून वरुण ऍरोनने अष्टपैलू चमक दाखवली. त्याने दोन बळींसोबत एक झेल आणि धावबादही केला. याव्यतिरिक्त ओशेन थॉमस, श्रेयस गोपाळ आणि जयदेव उनाडकट यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स ः ख्रिस लिन त्रि. गो. ऍरोन ०, शुभमन गिल त्रि. गो. ऍरोन १४, नितीश राणा झे. ऍरोन गो. गोपाळ २१, दिनेश कार्तिक नाबाद ९७ (५० चेंडू, ७ चौकार, ९ षटकार), सुनील नारायण धावबाद ११, आंद्रे रसेल झे. पराग गो. थॉमस १४, कार्लोस ब्रेथवेट झे. रहाणे गो. उनाडकट ५, रिंकू सिंग नाबाद ३, अवांतर १०, एकूण २० षटकांत ६ बाद १७५
गोलंदाजी ः वरुण ऍरोन ४-१-२०-२, ओशेन थॉमस ४-०-३२-१, जोफ्रा आर्चर ४-०-२८-०, श्रेयस गोपाळ ३-०-३१-१, रियान पराग १-०-७-०, जयदेव उनाडकट ४-०-५०-१

राजस्थान रॉयल्स ः अजिंक्य रहाणे पायचीत गो. नारायण ३४, संजू सॅमसन त्रि. गो. चावला २२, स्टीव स्मिथ त्रि. गो. नारायण २, बेन स्टोक्स झे. रसेल गो. चावला ११, रियान पराग स्वयंचित गो. रसेल ४७, स्टुअर्ट बिन्नी झे. सिंग गो. चावला ११, श्रेयस गोपाळ झे. गिल गो. कृष्णा १८, जोफ्रा आर्चर नाबाद २७, जयदेव उनाडकट नाबाद ०, अवांतर ५, एकूण १९.२ षटकांत ७ बाद १७७
गोलंदाजी ः कार्लोस ब्रेथवेट २-०-१६-०, प्रसिद्ध कृष्णा ३.२-०-४३-१, आंद्रे रसेल ३-०-३२-१, सुनील नारायण ४-०-२५-२, पृथ्वी राज २-०-२८-०, पीयुष चावला ४-०-२०-३, नितीश राणा १-०-१३-०

स्टेनच्या दुखापतीमुळे
आरसीबीला धक्का
दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनची आयपीएलच्या १२व्या मोसमातील वाटचाल दोन सामन्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. जायबंदी झालेल्या ऑस्ट्रेलियाच्या नॅथन कुल्टर नाईलच्या जागी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने स्टेनला संघात घेतले होते. स्टेनने आरसीबीकडून यंदा दोन सामन्यांत ४ बळी घेत संघाच्या दोन विजयात सिंहाचा वाटा

दिनेश कार्तिकची कमाल
इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या काल दिनेश कार्तिकने नोंदविली. दिनेशने नाबाद ९७ धावा केल्या. आयपीएलच्या पहिल्या हंगामात ब्रेंडन मॅक्कलमने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध नाबाद १५८ धावांची खेळी केली होती यानंतर केकेआरच्या एकाही खेळाडूला शतकी वेस ओलांडता आलेली नाही.