Home Featured साळगावातील दुहेरी खून प्रकरणीसंशयिताला पाच महिन्यांनी अटक

साळगावातील दुहेरी खून प्रकरणीसंशयिताला पाच महिन्यांनी अटक

0

साळगाव येथे गेल्या 5 नोव्हेंबर 2025 रोजी मध्यरात्री झालेल्या दुहेरी खून प्रकरणातील संशयित आरोपी जगन्नाथ भगत (49) याला पाच महिन्यांनी ओडिसामध्ये अटक करण्यात गोवा पोलिसांना यश प्राप्त झाले. पगाराच्या पैशांच्या देवाणघेवाणीवरून दोघांचा खून केला, अशी कबुली संशयित आरोपी जगन्नाथ भगत याने दिल्याची माहिती गुन्हा विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

गेल्या 5 नोव्हेंबरला मध्यरात्री साळगाव येथे एका घरात रिचर्ड डिमेलो आणि अभिषेक गुप्ता यांच्या दुहेरी खुनाची घटना घडली. ह्या घटनेनंतर संशयित आरोपी जगन्नाथ भगत याने डिमेलो यांची दुचाकी घेऊन पलायन केले. सदर दुचाकी थिवी रेल्वेस्थानकाच्या वाहन पार्किंगच्या जागेत आढळून आली होती. हे तिघेही जण साळगाव येथे एका भाड्याच्या खोलीत राहत होते. जगन्नाथ भगत याला रिचर्ड डिमेलो याने महिना 30 हजार रुपयांच्या पगारावर नोकरीला ठेवले होते. तथापि, त्याला वेळेवर पगार दिला जात नसल्याने त्यांच्यात वरच्यावर खटके उडत होते, अशी माहिती जगन्नाथ याने पोलिसांना दिली.

जगन्नाथ हा मूळचा राउरकेला-ओडिसा) येथील असून तो रायपूर, छत्तीसगड येथे राहत होता. त्याने बेसिक इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग, चिप-लेव्हल मोबाईल, लॅपटॉप दुरुस्ती आणि मोटर रिवाइंडिंगचे प्रशिक्षण घेतले होते. रिचर्ड डिमेलो यांनी ओएलएक्सवर दिलेल्या एका जाहिरातीमध्ये जगन्नाथ याने रस दाखविला. त्याला मासिक 30 हजार रुपयांच्या पगारावर दुकाने आणि आस्थापनांना सेवा पुरविण्यासाठी ऑक्टोबर 2025 मध्ये गोव्यात आणला होता, असे राहुल गुप्ता यांनी सांगितले.

जगन्नाथ याला पकडण्यासाठी गोव्यासह मुंबई, ओडिसा, छत्तीसगड, दिल्ली आदी भागात पोलिसांनी प्रयत्न सुरू केला होता. तो ओडिसा भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा विभागाच्या पथकाने ओडिसा पोलिसांच्या सहकार्यातून रविवार दि. 19 एप्रिल रोजी ताब्यात घेऊन गोव्यात आणला असून, कायदेशीर प्रक्रियेसाठी साळगाव पोलिसांकडे सुपूर्द केले जाणार आहे, अशी माहिती राहुल गुप्ता यांनी दिली.