Home Featured शिरगावातील लईराई देवीच्या जत्रोत्सवास आजपासून प्रारंभ

शिरगावातील लईराई देवीच्या जत्रोत्सवास आजपासून प्रारंभ

0

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रोत्सवास आज (दि. 21) पासून प्रारंभ होत असून, पुढील पाच दिवस हजारोच्या संख्येने भाविकांची पावले शिरगावच्या दिशेने मार्गस्थ होणार असल्याने भक्तांचा महापूर येणार आहे. राज्य प्रशासनाने गेल्या वर्षीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदा कडक मार्गदर्शक तत्वे अमलात आणली असून, भाविक, धोंड आणि लोकांनी सहकार्य करून जत्रोत्सव यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
गोवा, महाराष्ट्र कर्नाटक व इतर भागांतील शेकडो धोंड पाच दिवस, तीन दिवस देवीचे व्रत करत असून, अग्निदिव्य साकारण्यासाठी धोंड आसुसलेले आहेत. देवीला मोगऱ्याची फुले आवडत असल्याने या जत्रोत्सव काळात लाखो रुपयांची मोगरीच्या कळ्यांची फुलांची उलाढाल होणार असून, त्यासाठी वेगवेगळ्या भागातून फुल विक्रेते या भागात दाखल झाले आहे. फुल विक्रेत्यांसाठी प्रशासनाने वेगळी व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले.
जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आलेले असून, परिसरही सुशोभित केला आहे. घरोघरी कमानी, रांगोळी आणि तोरणे बांधण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हजारो भाविकांना लईराई देवीच्या जत्रेनिमित्त शुभेच्छा दिल्या असून, सर्वांनी शिस्तीचे पालन करताना कोणत्याही प्रकारे गडबड, गोंधळ न करता योग्य प्रकारे देवदर्शन घ्यावे तसेच कुणालाही कशाही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, असे भावनिक आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी अंकित यादव, पोलीस अधीक्षक हरीश मडकईकर, पोलीस निरीक्षक विजय राणे, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, मामलेदार शैलेंद्र देसाई यांच्यासह वाहतूक पोलीस व अग्निशामक दल व संबंधित सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे.

94 सीसीटीव्हींची नजर
94 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे भाविकांसह धोंडगणांच्या हालचालींवर करडी नजर ठेवली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी ‘मास्टर प्लान’ तयार केला आहे.

मद्यधुंद व्यक्तींना प्रवेश बंद
रात्री 8 नंतर मद्यधुंद व्यक्तींना प्रवेश बंद केला जाईल. कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस सतर्क राहणार आहेत. या जत्रोत्सव काळात पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दिवस-रात्र ड्युटी बजावणार आहेत.

अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात
जत्रोत्सवासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र पथके कार्यरत राहतील. भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलिसांकडून सतत मदत केली जाईल.

फेरी बंद; दुकानांची संख्या मर्यादित
या जत्रोत्सवात दरवर्षी शिरगावपर्यंत लांबलचक भव्य फेरी भरतेरु मात्र यंदा पूर्णपणे निर्बंध घालण्यात आले आहेत. खाज्यांच्या दुकानांना मंदिराच्या पाठीमागे जागा देण्यात आली आहे, तर काही दुकाने होमकुंड ठिकाणी मांडण्यात आली आहेत. परिणामी हजारो भाविकांना फेरीअभावी कोणतेही सामान खरेदी न करता जावे लागणार आहे. भक्तांची सुरक्षितता महत्वाची असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

मद्यालये बंद ठेवण्याचे आदेश
जत्रेमुळे 22 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. भारतीय दंड संहिता कलम 144 अंतर्गत हा आदेश जारी करण्यात आला असून, यामध्ये पाच गावांचा समावेश आहे. या निर्बंधाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.