Home Featured उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून21 प्रवासी ठार; 30 जण जखमी

उधमपूरमध्ये बस दरीत कोसळून21 प्रवासी ठार; 30 जण जखमी

0

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात काल एका प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याने या दुर्दैवी घटनेत 21 प्रवाशांचा मृत्यू झाला. रामनगरच्या कागोत परिसरात ही बस अनियंत्रित झाल्याने पलटी झाली. या दुर्घटनेत बसमधील 21 प्रवासी ठार झाले असून, 30 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. अपघातातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींनी देखील घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. ही प्रवासी बस रामनगरहून उधमपूरला जात होती, त्याचवेळी जालो क्षेत्राजवळ एका धोकादायक वळणावर बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बसचे टायर फुटल्याने आणि वेगामुळे बस अनियंत्रित होऊन पलटी झाली. बस रस्त्यावरून घसरून आधी पलटी झाली आणि त्यानंतर थेट डोंगरदरीत कोसळली. मात्र, अपघाताची नेमकी कारणे आणि सखोल माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उधमपूर अपघाताच्या घटनेवर शोक व्यक्त केला. या दुर्घटनेत लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करतो, अपघातामधील जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येईल, असे ट्विट पंतप्रधान मोदींनी केले आहे. याशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी शोक व्यक्त केला आहे.