‘सालाझार’ मराठी शाळा

0
32
  • शंभू भाऊ बांदेकर

‘सालाझार’ हे पोर्तुगीज हुकूमशहाचे नाव आहे, याची आम्हाला त्यावेळी कल्पना नव्हती. मराठी शाळेला प्रोत्साहन मिळावे म्हणून ही युक्ती काढण्यात आली असावी. अर्थात त्यावेळी लोकशाही-हुकूमशाही याचा अर्थ करण्याइतपत आमचे वयही नव्हते.

इयत्ता तिसरी उत्तीर्ण होऊन मी मराठी चौथीसाठी वास्कोस प्रयाण केले. याचे कारण, माझा थोरला बंधू मनोहर- ज्याला आम्ही सर्व भावंडे ‘दादा’ म्हणत असू- नोकरीनिमित्त वास्कोला होता. तेथील ‘एमपीटी’मध्ये (मुरगाव पोर्ट ट्रस्ट) तो कामाला होता आणि माझी धाकटी बहीण केसर त्याचा स्वयंपाक, कपडे व इतर गोष्टींसाठी त्याच्याकडे राहत असे. दादाने मला मराठी चौथीसाठी वास्कोला नेले, त्यावेळी तो वास्कोच्या बायणा भागात आपल्या इतर सहकार्‍यांसोबत भाड्याच्या घरात राहत असे. आमचे स्वतंत्र व प्रशस्त असे दोन खोल्यांचे घर होते. शिवाय बाहेर व्हरांडा होता. त्यावेळी त्या भागात चौगुले उद्योग समूहाने सालाझार मराठी शाळा उघडली होती व पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण तेथे घेता येत होते. चौगुले उद्योग समूहाचे यशवंतराव दत्ताजी चौगुले हे शाळा व सेंट जोसेफ इन्स्टिट्यूट या हायस्कूलची देखभाल पाहत. ‘सालाझार’ हे पोर्तुगीज हुकूमशहाचे नाव आहे, याची आम्हाला त्यावेळी मुळीच कल्पना नव्हती. मराठी शाळेला प्रोत्साहन मिळावे म्हणून ही युक्ती काढण्यात आली होती. अर्थात त्यावेळी लोकशाही-हुकूमशाही याचा अर्थ करण्याइतपत आमचे वय नव्हते. शाळेच्या नावाव्यतिरिक्त सालाझारचा उल्लेखही कुणी करत नसे.

आम्हाला मराठी चौथीमध्ये अर्जुन घोंगे नावाचे गुरुजी होते. पहिली ते चौथीपर्यंतचे ते मुख्याध्यापक होते आणि ते कडक शिस्तीचे होते. काळ्या-सावळ्या रंगाचे घोंगे गुरुजी डोक्यावर काळी टोपी, सफेद धोतर, लांब हातांचा सफेद शर्ट आणि वर कोट अशा दिमाखदार पेहेरावात शाळेत दाखल होत. शाळेत कुणी दंगामस्ती केली, सांगितलेला अभ्यास केला नाही तर लाकडी पट्टीने हात तांबडा करीत. मी अभ्यासात हुशार असल्यामुळे व गुरुजींच्या शिस्तीत राहत असल्यामुळे मला मार कधी पडला नाही. पण मी इतर सहकार्‍यांना माझ्या अभ्यासाची कॉपी करण्यास मदत करतो म्हणून गुरुजींनी अनेकदा माझा कान पिरगाळून मला ‘समज’ दिली होती. माझ्या वर्गात दत्तराज धोंड, आनंद नाईक, प्रभाकर महाले, शीला चौगुले (यशवंतराव चौगुलेंच्या कन्या), सरिता कामत, नीना लवंदे, विजया नाईक असे वर्गमित्र-मैत्रिणी होत्या. हे लोक मला जास्त जवळचे होते. शिवाय मी अभ्यासात, पाठांतरात, तसेच वक्तृत्वात निपुण असल्यामुळे गुरुजींप्रमाणेच माझ्या वर्गातील मुलांचाही आवडता होतो.

त्यावेळी चौथीत आम्हाला ‘आजीचे घड्याळ’ ही कविता होती. घोंगे गुरुजी तालबद्ध सुरात ती कविता आम्हाला म्हणून दाखवीत व पाठ करून घेत. ‘आजीच्या जवळी घड्याळ, कसले आहे चमत्कारिक…’ असे लयीत म्हणत त्याचा अर्थ सांगत. कविता शिकवताना गुरुजी स्वतःही आमच्यात रंगून जात. ही संपूर्ण कविता मला पाठ आहे, याचा त्यांना विशेष आनंद. ते वर्गात ही संपूर्ण कविता माझ्याकडून म्हणून घेत व कवितेचा संपूर्ण अर्थ उलगडून सांगत.

त्यावेळी परकीयांची सत्ता असल्यामुळे गांधी जयंती, नेहरू जयंती, टागोर जयंती असे कार्यक्रम शाळेत होत नसत. पण मी मोठा झाल्यावर कोण होणार- ‘मी शिक्षक झालो तर…’, ‘मी डॉक्टर झालो तर…’ अशा विषयांवर वक्तृत्व स्पर्धा होई. एखाद्या एकांकिकेचा प्रवेश होई. निबंधस्पर्धा होई व त्याचा बक्षीस वितरण समारंभ वार्षिक स्नेहमेळाव्यात किंवा दर तीन महिन्यांनी कार्यक्रमांचे आयोजन होई, त्यावेळी होई. या कार्यक्रमास मा. यशवंतराव चौगुले जातीने हजर असत. इतकेच नव्हे तर आमच्या तालमी चालतानाही ते हजेरी लावत व संबंधित शिक्षक-शिक्षिकांना मार्गदर्शन करीत, प्रोत्साहन देत. त्यांच्या हातून अनेक बक्षिसे मला मिळाली होती, त्यामुळे माझ्यावर त्यांची विशेष मर्जी होती. चौथीचा रिझल्ट लागला. मी पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो आणि माझी रवानगी दुसर्‍या शाळेत झाली.