एक भारत, श्रेष्ठ भारत

0
70
  • कालिदास बा. मराठे

काही वर्षांनंतर या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांत जे गुण विकसित होतील, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल आणि खर्‍या अर्थाने ‘श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना साकार होईल. या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांनीच प्रयत्न कारायला हवेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना आजच्या विद्यार्थ्यांत विकसित व्हावी यादृष्टीने दोन महत्त्वाचे उपक्रम सुचविण्यात आले आहेत. पहिला उपक्रम आहे- भारतीय भाषा हसतखेळत शिकण्याचा. त्यासाठी इंग्रजीत ‘फन प्रोजेक्ट’ हा शब्द वापरलाय. इयत्ता सहावी ते आठवी इयत्तेत हा उपक्रम तीन वर्षे घेण्यात यावा असे धोरणात म्हटले आहे.
या उपक्रमाअंतर्गत आठव्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या बावीस भारतीय भाषांमधील वैशिष्ट्यपूर्ण साम्यस्थळे- जी लिपीमध्ये, मुळाक्षरांत, बाराखडीत, शब्दांमध्ये, उच्चारामध्ये आहेत. सर्वसाधारण व्याकरणात आहेत. संस्कृतमधून आलेला शब्दसंग्रह, नेहमी वापरात असलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते यांची ओळख विविधतेत एकता यांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडवील. हा उपक्रम विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यासाठी नसेल असेही धोरणात स्पष्टपणे म्हटले आहे. कोणतेही दडपण विद्यार्थ्यांवर त्यामुळे नसेल. खर्‍या अर्थाने भारतीय भाषांची ओळख त्याद्वारे विद्यार्थी करून घेतील.

या उपक्रमासाठी संदर्भ-साहित्य म्हणून भारतीय भाषा संस्थान म्हैसूर यांनी विविध भारतीय भाषांसाठी तयार केलेले बहुभाषी शब्दकोश व इतर साहित्य उपयोगी पडेल. केंद्रीय हिंदी संस्थान दिल्ली यांनी तयार केलेला भारतीय भाषा कोश पण महत्त्वाचा आहे. सध्या ‘राष्ट्रीय पुस्तक न्यास’ दिल्लीच्या ‘पुस्तक संस्कृती’ या हिंदी द्वैमासिकातून एकेक विषय घेऊन २२ भारतीय भाषांतील शब्दसंग्रह प्रकाशित करीत आहे. अशा प्रकारचे संदर्भसाहित्य शाळेच्या ग्रंथालयात उपलब्ध करण्यासाठी शाळाप्रमुखांनी तयारी करायला हवी.

आकाशवाणी आणि दूरचित्रवाणीवरून विविध भारतीय भाषांत प्रसारित केले जाणारे कार्यक्रम- विशेषतः बातम्या, गाणी, नाटकं ऐकून/पाहून- विविध भारतीय भाषांची ओळख करून घेता येईल. त्या-त्या भाषांतील साधन व्यक्तींना आपल्या गावात बोलावून शाळेत त्यांच्याशी संवाद साधता येईल. अशा भाषांतील वृत्तपत्रे, मासिके, पुस्तको गोळा करून ग्रंथालयात ठेवता येतील. या प्रकारचे अनेक उपक्रम कल्पक शिक्षकांना- विद्यार्थ्यांना सुचतील. राष्ट्रीय शैक्षणिक व संशोधन परिषद नवी दिल्ली यासाठी शिक्षक-विद्यार्थी हस्तपुस्तिका पण तयार करील.

दुसरा उपक्रम आहे भारतातील विविध पर्यटनस्थळांना भेटी देण्याचा. त्या स्थळी ४-५ दिवस राहून त्या स्थळांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, भाषिक, भौगोलिक दृष्टीने सखोल अभ्यास करण्याचा. इयत्ता सहावी ते आठवीमध्ये ज्या भारतीय भाषांची ओळख करून घेतली त्यांचा प्रत्यक्ष उपयोग येथील स्थळांचा अभ्यास करताना, तेथील व्यक्तीशी संवाद साधताना होईल.

हा उपक्रम इयत्ता नववीपासून राबविता येईल. सध्या विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठांच्या कुलगुरूना यासंबंधी २२ सप्टेंबर २०२१ रोजी परिपत्रक पाठवून महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यासाठी पूर्वतयारी करायला सांगितले आहे. या पत्राबरोबर भारतीय पर्यटन मंडळाने देशातील शंभर पर्यटनस्थळांची जी यादी तयार केली आहे ती पाठवली आहे (परिशिष्टामध्ये वाचा). राष्ट्रीय शिक्षण धोरणात अशा यादीचे सुतोवाच केले होते.

देशातील नैसर्गिक व सांस्कृतिक संपत्ती आपल्या देशाला महान बनविते आणि म्हणून त्याचे संवर्धन व जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. हा प्राधान्यक्रमाने राबविण्याचा कार्यक्रम असायला हवा आणि त्यासाठी शिक्षणात याचा समावेश करायला हवा. सांस्कृतिक जाणीव आणि त्याचे प्रकटीकरण या क्षमता आजच्या विद्यार्थ्यांत विकसित व्हायला हव्यात.

संस्कृतीचे संवर्धन होण्यासाठी विविध कला हे योग्य माध्यम आहे, आणि भाषांचा संबंध कला आणि संस्कृतीशी घनिष्ठ आहे. साहित्य/वाङ्‌मय, नाटक, संगीत, चित्रपट आदींतून कला व्यक्त होत असली तरी भाषेशिवाय त्या व्यक्त करता येत नाहीत.
देशाच्या संपन्न विविधतेसंबंधीची ओळख विद्यार्थ्यांना व्हायला हवी तर त्यासाठी देशातील विविध स्थळांना भेटी देण्याचा उपक्रम शालेय-महाविद्यालयीन पातळीवर राबवायला हवा. यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेलच; परंतु विद्यार्थ्यांना देशातील विविधतेची, परंपरांची, संस्कृतीची, भाषांची खरी ओळख होईल. त्यांचे महत्त्व समजेल. २०२० च्या धोरणात देशातील अशा पर्यटनस्थळांची यादी भारत पर्यटन मंडळाने तयार करावी असे म्हटले होते. ते काम आता पूर्ण झाले आहे.

कोरोना महामारीमुळे ताबडतोब अशा स्थळांना भेटी देणे शक्य होणार नाही. परंतु त्यासंबंधीची पूर्वतयारी करावी असे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या पत्रात म्हटले आहे.

यादृष्टीने शाळा-महाविद्यालयांमधील प्रमुखांनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने या यादीतील कोणत्या स्थळांना भेटी द्यायच्या, कोणत्या वेळी- कोणत्या सुट्टीत हा अभ्यासक्रमाचा भाग मानून कामाच्या दिवसांत घ्यावयाचा, त्या स्थळासंबंधीची संपूर्ण माहिती- तेथील इतिहास, परंपरा, साहित्य, लोककला, निवासव्यवस्थेची सोय, दर दिवसाच्या कार्यक्रमाचे नियोजन, स्थानिक साधन व्यक्तींची यादी आणि मुख्य म्हणजे यासाठी येणारा खर्च, प्रवासखर्च, निवास खर्च यासंबंधीचे तपशील तयार करावे लागतील. यासंबंधी विद्यार्थी मंडळाच्या सभासदांना विश्‍वासात घेऊन संपूर्ण कार्यक्रम ठरविता येईल.
या उपक्रमाचा खर्च कसा उभा करायचा याचा पण विचार करावा लागेल. सध्या भारतयात्रा योजनेखाली अशा स्थळांना भेटी देण्यासाठी अनुदान दिले जाते. त्याचप्रमाणे रेल्वे पण विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात तिकीट देते. शिक्षण संचालनालय व उच्च शिक्षण संचालनालयाने हा उपक्रम अभ्यासक्रमाचा भाग असल्याने शैक्षणिक संस्थांना अनुदान देण्यासाठी विशेष तरतूद करायला हवी.

हा उपक्रम राबविण्यासाठी पहिल्या वर्षी अडचणी येतील, परंतु वेगवेगळ्या संस्थांनी विचार करून हा उपक्रम राबविला तर नवीन कल्पना सुचतील. उपक्रम संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याने यासंबंधीचा सविस्तर अहवाल आपल्या अध्यापकाकडे द्यायचा आहे. शिक्षण संचालनालयाकडे पण हा अहवाल शैक्षणिक संस्थांना पाठवावा लागेल.

काही वर्षांनंतर या दोन्ही उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांत जे गुण विकसित होतील, त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत होईल आणि खर्‍या अर्थाने श्रेष्ठ भारत ही संकल्पना साकार होईल.
या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या सर्वांनीच यासंबंधीचे विचार मांडावेत अशी विनंती करून थांबतो.

भारत पर्यटन मंडळाने तयार केलेली राज्यवार पर्यटनस्थळांची यादी
१. गोवा ः १) कोलवा समुद्रकिनारा, २) जुने गोवे.
२. महाराष्ट्र ः १) देवगिरी किल्ला, २) अंजठा लेणी, ३) वेरुळची लेणी, ४) कान्हेरी लेणी, ५) महाबळेश्‍वर.
३. कर्नाटक ः १) एहोळे (बागलकोट), २) हंपी, ३) बेलूर (चिकमंगळूर), ४) पट्टडकल (हुबळी), ५) विजापूर, ६) श्रवणबेळगोळ, ७) श्रीरंगपट्टनम.
४. गुजरात ः १) रानी की बाग (पाटण), २) सोमनाथ, ३) घोलाविरा (कच्छ), ४) मोधेरा (सूर्यमंदिर), ५) चंपानेर.
५. आंध्र प्रदेश ः १) लेपाक्षी, २) नागार्जुनकोंडा, ३) नेल्लोर, विशाखापट्टण.
६. अरुणाचल ः १) इटानगर.
७. आसाम ः १) काझीरंगा अभयारण्य, २) मिनास अभयारण्य, ३) सिलचर, ४) दिब्रुगड.
८. मणीपूर ः १) इंफाळ, २) लोकटक सरोवर.
९. नागालँड ः १) दिमापूर, २) कोहिमा.
१०. त्रिपुरा ः १) अगरतळा.
११. मेघालय ः १) शिलॉंग.
१२. मिझोराम ः १) आयझॉल.
१३. सिक्कीम ः १) गंगटोक, २) खंगचेन्झोंगा अभयारण्य.
१४. पश्‍चिम बंगाल ः १) बिष्णूपूर, २) कूचबिहार, ३) मुर्शिदाबाद, ४) शांतीनिकेतन.
१५. ओरिसा ः १) चिलका सरोवर, २) कोणार्क, ३) उदयगिरी लेणी.
१६. बिहार ः १) नालंदा, २) बुद्धगया, ३) वैशाली, ४) राजगीर, ५) सासाराम.
१७. उत्तर प्रदेश ः १) आग्रा, २) प्रयागराज, ३) झांशी, ४) सारनाथ, ५) श्रावस्ती, ७) कुशीनगर, ८) कपिलवस्तू.
१८. उत्तराखंड ः १) मसुरी, २) ऋषिकेश, ३) नैनिताल.
१९. हिमाचल प्रदेश ः १) ग्रेट हिमालयीन राष्ट्रीय उद्यान, २) सिमला.
२०. जम्मू आणि काश्मीर ः १) गुलमर्ग, २) पहेलगाम, ३) पटनीटॉप.
२१. लडाख ः १) कारगील.
२२. पंजाब ः १) पतियाला.
२३. हरियाणा ः १) पिंजोरबाग, २) कुरुक्षेत्र.
२४. राजस्थान ः १) जयपूर, २) केवळादेव राष्ट्रीय उद्यान, ३) चितोडगड, ४) झालवाड, ५) जेसलमेर, ६) अजमेर.
२५. मध्य प्रदेश ः १) अमरकंटक, २) भीमबेटका, ३) ग्वाल्हेर किल्ला, ४) जबलपूर, ५) सांची, ६) खजुराहो, ७) पंचमढी.
२६. छत्तीसगड ः १) रायपूर.
२७. तेलंगणा ः १) गोवळकोंडा किल्ला, २) वरंगळ किल्ला.
२८. तामिळनाडू ः १) कोर्तालेम धबधबा, २) कांचीपूरम, ३) कन्याकुमारी, ४) तंजावर, ५) येरकूड.
२९. केरळ ः १) कुंभकोणम, २) कोची किल्ला, ३) बेकल किल्ला.
३०. दीव ः १) दीव किल्ला.
३१. चंदीगड ः १) चंदीगड.