सायना, सिंधू दुसर्‍या फेरीत

0
105

संघर्षपूर्ण लढतीत डेन्मार्कच्या मॅट पॉलसन हिचा २१-१९, २३-२१ असा पराभव करत सायनाने हॉंगकॉंग सुपर सीरिज स्पर्धेत विजयी सलामी दिली. द्वितीय मानांकित पी.व्ही. सिंधूला विजयासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही. पात्रता फेरीतून आगेकूच केलेल्या ल्युंग युएट यी या यजमान देशाच्या खेळाडूला तिने २१-१८, २१-१० असे हरविले.

पुरुष एकेरीत एच.एस. प्रणॉय याला विजयासाठी तीन गेमपर्यंत संघर्ष करावा लागला. अटीतटीच्या ठरलेल्या या सामन्यात पहिला गेम १९-२१ असा गमावल्यानंतर प्रणॉयने पुढील दोन्ही गेम २१-१७, २१-१५ असे जिंकत हॉंगकॉंगच्या हू यू याला हरविले. पारुपल्ली कश्यप याची मात्र मुख्य स्पर्धेतील खराब प्रदर्शनाची मालिका कायम राहिली. मंगळवारी झालेले पात्रता फेरीतील दोन्ही सामने जिंकून मुख्य फेरीत स्थान मिळविल्यानंतर त्याला काल ले डॉंग क्यून याच्याकडून १५-२१, २१-९, २२-२० असे पराभूत होऊन स्पर्धेबाहेरचा रस्ता धरावा लागला. इंडोनेशियाच्या टॉमी सुगियार्तोकडून १५-२१, ८-२१ असे पराजित झाल्याने सौरभ वर्माला गारद व्हावे लागले. साई प्रणिथ याचेदेखील आव्हान आटोपले. द्वितीय मानांकित सोन वान हो याने प्रणिथला २१-८, २१-१६ असे नमविले. महिला दुहेरीत अश्‍विनी पोनप्पा व सिक्की रेड्डी यांना चीनच्या हुआंग डोंगपिंग व ली वेनमेई यांनी ११-२१, २१-१९, १९-२१ असे हरविले.