सलग तिसर्‍या दिवशी ५०० पेक्षा कमी रुग्ण

0
110

>> नव्या ४७३ कोरोनाबाधितांची नोंद; सक्रिय रुग्णसंख्या ६ हजारांच्या खाली

राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आता हळूहळू घट होत चालली आहे. गेल्या २४ तासांत पुन्हा एकदा ५०० पेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, नवे ४७३ रुग्ण सापडले आहेत. राज्यात सलग तिसर्‍या दिवशी ५०० पेक्षा कमी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापूर्वी रविवारी ४०३, तर सोमवारी ४१८ कोरोनाबाधित सापडले होते. तसेच राज्यात कोरोनामुक्त होणार्‍यांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा देखील ६ हजारांच्या खाली आला आहे.

मंगळवारी सापडलेल्या नव्या रुग्णांची संख्या मागील दोन दिवसांपेक्षा किंचित जास्त असली, तरी ती ५०० पेक्षा कमीच आहे. त्यामुळे राज्याला दिलासा मिळाला आहे.

कोरोनाने १४ जणांचा बळी
राज्यात कोरोनामुळे गेल्या २४ तासांत आणखी १४ जणांचा बळी गेला असून, आतापर्यंत कोविडमुळे बळी गेलेल्यांची संख्या २८५९ एवढी झाली आहे. १४ मृतांपैकी १० जणांचा मृत्यू गोमेकॉत झाला, तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ व अन्य एका खासगी इस्पितळात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला. एका रुग्णाचा लोटली येथील आरोग्य केंद्रात आणण्यापूर्वीच मृत्यू झाला, तर अन्य एका रुग्णाचा मृत्यू हा मडगाव येथील ईएसआय इस्पितळात झाला.

सक्रिय रुग्णसंख्या ५८९९वर
राज्यात कोरोनामुक्त होणार्‍या रुग्णांच्या संख्येत भर पडत चालली आहे. काल आणखी ९५७ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ८६ जणांना इस्पितळांतून डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५४ टक्के एवढे आहे. सध्या राज्यात ५ हजार ८९९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

मृत कोरोनाबाधितांमध्ये आणखी ५ जणांची उशिरा नोंद
खासगी इस्पितळात कोविडमुळे मृत्यू झालेल्या आणखी ५ जणांची काल उशिरा नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी विविध खासगी इस्पितळात कोविडमुळे मृत्यू झालेल्या एकूण ६७ रुग्णांची कोविडचे बळी म्हणून उशिरा नोंद करण्यात आल्याचे सोमवारी समोर आले होते. त्यात आता आणखी ५ मृतांची भर पडली आहे.