सर्व सरकारी कर्मचार्‍यांना कामावर हजर राहण्याचे आदेश

0
84

>> ५० टक्के उपस्थितीची सवलत सरकारकडून मागे

कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने आपल्या कर्मचार्‍यांना कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थितीची जी सवलत दिली होती, ती सवलत सरकारने काल मागे घेतली. मंगळवार दि. १ जूनपासून सर्व सरकारी कर्मचार्‍यांना पूर्वीप्रमाणे कामावर हजर राहण्याची सूचना केली आहे. दरम्यान, सरकारने कर्मचार्‍यांना १५ जूनपर्यंत बायोमेट्रिक हजेरीतून सूट दिली आहे.
सरकारने ५० टक्के उपस्थितीची सवलत मागे घेतली असली, तरी ताप, सर्दी, खोकला आणि श्‍वसनासंबंधीचे त्रास अशी कोविडसदृश्य लक्षणे असलेल्या कर्मचार्‍यांनी कामावर येऊ नये, अशी सूचनाही सरकारने केली आहे. सरकारी खाती, महामंडळे, स्वायत्त संस्था व अनुदानित संस्थांमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी सर्वसाधारण प्रशासन विभागाने हा आदेश काढला आहे. विभागाने कोविडच्या पार्श्‍वभूमीवर कडक सूचना व मार्गदर्शक तत्त्वेही लागू केलेली आहेत. येत्या १५ जूनपर्यंत ती लागू असतील.

कोविडमुळे बैठकांचे आयोजन करू नये. अत्यंत गरज असल्यास आभासी पद्धतीने संवाद साधावा. तसेच उपहारगृहात व लिफ्टमध्ये गर्दी न करण्याची सूचना देखील कर्मचार्‍यांना करण्यात आली आहे.